वाळपई: सत्तरी तालुक्यात सोमवारी दुपारपासून आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विविध भागात झाडे कोसळून वीजवाहिन्या आणि काही घरांचे मोठे नुकसान झाले. धावे, सातोडे, होंडा, नानेली, रेडीघाट आदी परिसरात या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. अधूनमधून पावसाचा जोर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वादळी वारे वाहत असल्याने दर दिवशी झाडांची पडझड सुरू असून नुकसान होत आहे.
धावे-सत्तरी येथे धावे-उस्ते रस्त्यावर जंगली झाड कोसळून वाहतूक काही काळ बंद झाली होती. सातोडे येथे फणसाचे झाड थेट वीजवाहिनीवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. सुंदरम हॉल, होंडा येथे झाडाझुडपांमध्ये गुरे अडकली होती, ती वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढली. नानेली-सत्तरी येथे काजूचे झाड वीजवाहिनीवर तसेच घरावर पडल्याने घराचे नुकसान झाले. रेडीघाट येथील श्री गणेश मंदिराजवळ जंगली झाड पडण्याची घटना घडली.
वाळपई अग्निशमनची तत्परता
वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेवर घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले. जवानांनी झाडे तोडून रस्त्यावरून बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. या मदतकार्यात अग्निशमन दलाचे कृष्णा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी सक्रिय सहभाग घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.