वास्को: बायणा येथून उड्डाण पुलावर ये-जा करण्यासाठी असलेल्या अंतर्गत रस्त्यावर उभारण्यात आलेली फाटके येत्या आठ दिवसांमध्ये हटविण्यात आली नाहीत, तर आम्ही ती मोडून टाकू असा इशारा नगरसेवक दीपक नाईक यांनी दिला. याप्रकरणी मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांना निवेदन देण्यात आले. सदर फाटकांसंबंधी आपण मुरगाव बंदर प्राधिकरणाला यापूर्वी लेखी सूचना केल्याचे करमली यांनी सांगितले. या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्र्वासन त्यांनी दिले.
फाटकांसमोर बायणातील विविध भागांतील रहिवासी जमा झाले. त्यांनी ‘एमपीए दादागिरी बंद करो’ अशी घोषणा देण्यात आली. त्यापैकी काही जणांच्या हातात घोषणा लिहिलेले फलक होते. सदर फाटके तेथून हटलीच पाहिजेत, असा सूर जमलेल्या नागरिकांमध्ये उमटत होता. आम्ही येथील बायणा वेश्यावस्ती हटविली. तेथे आता रवींद्र भवन उभारण्यात आले आहे, शिवाय नागरिक आता बायणा किनाऱ्यावर फिरण्यासाठी येतात. बायणा किनारा हळूहळू फुलू लागला आहे. उड्डाण पुल झाल्याने बायणावासियांची सोय झाली होती, शिवाय पर्यटकांना सहजपणे बायणा किनाऱ्यावर येण्यास मदत होत होती. परंतु ती फाटके उभारण्यात आल्याने ते अंतर्गत रस्ता बंद होण्याची भीती असल्याचे दीपक नाईक यांनी सांगितले. ती फाटके तेथून हटलीच पाहिजेत, असा त्यांनी इशारा दिला. याप्रसंगी विजय केळूस्कर, सुकूर फर्नांडिस, बाबू कामत, डॉ. निखील परुळेकर, माजी नगराध्यक्ष क्रिस्तीन कुयेलो, प्रशांत नार्वेकर, किरण नाईक, वास्को भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुप्रिया नाईक, जयंत जाधव इत्यादीची भाषणे झाली. सर्वानी ती फाटके तेथून हटलीच पाहिजेत अशी मागणी केली आहे. याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तेथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बायणा ते मुरगाव बंदराला जोडणाऱ्या स्टेड केबल तसेच उड्डाण पुलाचे उद्घाटन ता. २१ जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुरगाव बंदर प्राधिकरणाने बायणा येथे उड्डाण पुलावर ये-जा करण्यासाठी असलेल्या अंतर्गत रस्त्यांवर मोठी लोखंडी फाटके उभारली. सुरक्षेसाठी ती फाटके उभारण्यात आल्याचा दावा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार यांनी केला होता.
तथापि भविष्यात तेथून वाहतूक बंद करण्याचा डाव प्राधिकरण खेळत असल्याचा दावा करून बायणाविसायांनी ती फाटके हटविण्याची मागणी केली होती
आमदार दाजी साळकर, नगरसेवक दीपक नाईक यांनी याकामी पुढाकार घेतला होता. याप्रकरणी आमदार संकल्प आमोणकर यांनी डॉ. विनोदकुमार यांची भेट घेतल्यावर त्यांनी सदर फाटके बंदराच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आली आहेत, चोवीस तास वाहतुकीसाठी रस्ता खुला असेल, असे स्पष्ट केले होते. तथापि ती फाटके हटलीच पाहिजेत, अशी भूमिका आमदार साळकर व नगरसेवक नाईक यांनी घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीही भेट घेऊन निवेदन दिले. अद्याप ती फाटके हटविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सदर प्रकरण थंडावले की काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.