Aleixo Sequeira: 'कधी कधी अशी स्थिती निर्माण केली जाते'! Cash For Job Scam प्रकरणी काय म्हणाले मंत्री सिक्वेरा...पहा
Aleixo Sequeira About Cash For Job scam In Goa
मडगाव: सध्या गोव्यात सरकारी नोकरी घोटाळ्यासंदर्भात जी प्रकरणे उघड होत आहेत, या सर्व प्रकरणांची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे. काहीवेळा अशाप्रकारचे घोटाळे होणे कठीण असते. कधी कधी अशाप्रकारची स्थिती निर्माणसुद्धा केली जाते, असे पर्यावरण व कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज मडगावात पत्रकारांना सांगितले.
सध्या जो घोटाळा सुरू आहे, त्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. आपल्या मंत्रिपदाच्या पूर्वीच्या कार्यकाळात आपण १२०० नोकऱ्या दिल्या, पण कुणाकडूनही एक पैसा घेतला नाही. जर कोणाकडून घेतला असेल, तर त्याने आपल्या समोर यावे असे आपले आव्हान आहे. आपल्या नावाने काही लोकांनी पैसे उकळले. जेव्हा आपल्याला ही माहिती मिळाली, तेव्हा प्रत्येकाला बोलावून तंबी देण्यात आली व ज्यांच्याकडून पैसे घेतले आहेत, त्यांना ते ताबडतोब देण्यास भाग पाडले, असे मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले.
एकदा एक व्यक्ती आपल्याकडे आली. त्याची डॉक्टर मुलगी आरोग्य खात्यातील नोकरीसाठी निवडली होती. मात्र, कोणीतरी त्यांच्याकडे ३० लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी आपल्याला ही माहिती दिली व त्यांना एकही पैसा न देण्याचा सल्ला दिला. या घटनेस एक वर्ष उलटले. त्यांनी एकही पैसा दिला नाही व गेले वर्षभर त्यांची मुलगी आरोग्य खात्यात नोकरी करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री आलेक्स सिक्वेरा आज दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आले होते. यावेळी अनेकांनी त्यांच्यासमोर म्युटेशन, सर्वे प्लॅन आदींसंदर्भात समस्या मांडल्या. काहीजणांच्या समस्या सोडविल्या, तर काहींना पुढील आठवड्यात बोलावल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
मलनिस्सारणाचा प्रश्न सुटणार
मडगाव एसजीपीडीए मार्केटमधील मलनिस्सारणाचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यास मान्यता दिल्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले. सेंट फ्रान्सिस झेवियर प्रदर्शनाची तयारी पूर्णत्वाकडे जात असून १६ नोव्हेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील. या सर्व कामांमध्ये मुख्यमंत्री जातीने लक्ष घालत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.