Akhil bhartiya Konkani Parishad: इथे होणारी साहित्यनिर्मिती अभिमानास्पद! अखिल भारतीय कोंकणी परिषदेत डॉ. देवी यांचे उद्गार

Goa Latest News: अखिल भारतीय कोकणी परिषदेच्‍या ३३व्‍या अधिवेशनाची सुरवात आज मडगावात झाली. या अधिवेशनाच्‍या उद्‍घाटनानंतर डॉ. देवी बोलत होते. रवींद्र भवनात सुरू झालेल्‍या या अधिवेशनाच्‍या उद्‍घाटन समारंभाला मंगळुरुच्‍या विश्‍‍व कोकणी केंद्राचे अध्‍यक्ष नंदगोपाळ शणै हेही उपस्‍थित होते.

Akhil bhartiya Konkani Parishad Inaugeration

मडगाव: अखिल भारतीय कोकणी परिषदेच्‍या ३३व्‍या अधिवेशनाची सुरवात आज मडगावात झाली. या अधिवेशनाच्‍या उद्‍घाटनानंतर डॉ. देवी बोलत होते. रवींद्र भवनात सुरू झालेल्‍या या अधिवेशनाच्‍या उद्‍घाटन समारंभाला मंगळुरुच्‍या विश्‍‍व कोकणी केंद्राचे अध्‍यक्ष नंदगोपाळ शणै हेही उपस्‍थित होते. परिषदेचे अध्‍यक्ष फा. मोउझिन आताईद यांच्‍या हस्‍ते अधिवेशनाचे उद्‍घाटन झाले.

जगात कित्‍येक भाषा मृत्‍यूपंथाला आलेल्‍या असताना काही भाषा लक्षणीय प्रगती करत आहेत. त्‍यात कोकणी भाषेचाही समावेश आहे. कोकणी भाषकांची लोकसंख्‍या पाहिल्‍यास या भाषेतून जे साहित्‍य निर्माण होते, ते भारतातील सर्वांत जास्‍त लोकसंख्‍येची भाषा असलेल्‍या हिंदीपेक्षाही अधिक आहे आणि ही अभिमानास्‍पद बाब आहे, असेही डॉ. देवी यांनी सांगितले.

अध्‍यक्ष म्‍हणून बोलताना फा. मोउझिन आताईद यांनी कोकणी भाषेवर इंग्रजी आणि हिंदी या भाषांकडून आघात होत आहेत असे सांगितले. अशा परिस्‍थितीत कोकणी भाषिक संघटित राहण्याऐवजी लिपीच्‍या राजकारणावरून विखुरले जातात, ही अत्‍यंत दुर्दैवी गोष्‍ट आहे. विशेषत: गोव्‍यातील ख्रिस्‍ती समाजाची मन:स्‍थिती पाहिल्‍यास त्‍यांना कुठल्‍याही भाषा चालतील, पण कोकणी नको असेच वाटते. यासाठीच आपल्‍या मुलांना लहानपणापासून हा समाज कोकणीऐवजी इंग्रजीचे ज्ञान देण्‍यास धन्‍यता मानतो आणि त्‍यातूनच आपली अस्‍मिता गमावून बसतो.

यावेळी कार्याध्‍यक्ष अनंत अग्‍नी आणि आयोजन संस्‍थेच्‍या प्रभारी अध्‍यक्ष रत्‍नमाला दिवकर यांचीही भाषणे झाली. कोकणी परिषदेचे सरचिटणीस गौरीश वेर्णेकर यांनी आभार मानले.

समाजाच्‍या एकसंधतेसाठी ॲपची गरज; नंदकुमार शणै

कोंकणी विश्‍‍व केंद्राचे अध्‍यक्ष नंदकुमार शणै यांनी कोकणी समाज जगात वेगवेगळ्‍या ठिकाणी विखुरला गेल्‍यामुळे काही प्रमाणात तो आपल्‍या अस्‍मितेपासून दूर जाऊ लागला आहे, असे सांगितले. अशा परिस्‍थितीत अखिल भारतीय कोकणी परिषदेने या सर्व कोकणी भाषिकांना एकत्र आणण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची गरज व्‍यक्‍त करताना त्‍यासाठी एक ॲप तयार करता येणे शक्‍य आहे, ज्‍याद्वारे जगातील सर्व कोकणी भाषिकांची त्‍यात नोंद करता येईल आणि त्‍यामुळे विखुरून गेलेला हा कोकणी समाज एकसंध राहण्‍यास फायदा होईल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

स्‍पेनमधील बास्‍क या भाषेशी तुलना कोकणीशी करता येणे शक्‍य आहे. या दोन्‍ही भाषांवर अनेक आघात झाले. मात्र ते सोसूनही दोन्‍ही भाषा पूर्ण ताकदीने उभ्‍या राहिल्‍या. बास्‍क भाषेनेही स्‍वातंत्र्याची मूल्‍ये जपली आणि तीच ताकद कोकणीतही आहे. लोकांशी सौहार्द ठेवण्‍याची क्षमता ज्‍या भाषांमध्‍ये आहे, त्‍याच भाषा जगाला घृणास्‍पद स्‍थितीतून बाहेर काढू शकतात.

डॉ. गणेश देवी, प्रसिद्ध भाषाशास्‍त्रज्ञ

कुणालाही आपली लिपी पुढे न्‍यायची असेल तर त्‍याला कुणी अडविणार नाही. खरे तर प्रत्‍येकाने आपापल्‍या आवडीच्‍या लिपीत साहित्‍य निर्माण करण्‍याबरोबरच इतर लिपींमध्‍यें ज्ञान जाणून घेतल्‍यास त्‍याचा कोकणीला फायदाच होईल. यासाठी कोकणी परिषदेने लिप्‍यांतर करणारे केंद्र सुरू करावे. कोकणी भाषेच्‍या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य केले पाहिजे.

फा. मोउझिन आताईद, अध्‍यक्ष, अखिल भारतीय कोकणी परिषद

सर्व धर्मांचा आणि संस्‍कृतींचा सन्‍मान करून त्‍यात मिळून मिसळून राहणे ही गोव्‍याची खरी संस्‍कृती. मात्र अलीकडे काहीजण त्‍यात बाधा आणण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. अशी प्रवृत्ती आताच ठेचून काढणे गरजेचे आहे. लिपीवाद समोरासमोर बसून सोडविता येणे शक्‍य आहे. मात्र काहीजणांना ते मान्‍य नाही. त्‍यामुळे ते बहिष्‍काराची भाषा करतात. अशामुळे कोकणीचे नुकसान होत आहे.

प्रशांत नाईक, स्‍वागताध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com