The film Me Captain was screened at the 54th IFFI
यशवंत पाटील
प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर कोणतीही जबाबदारी पेलून यशस्वी करून दाखवता येते याचे ज्वलंत उदाहरण ‘मी कॅप्टन’ या चित्रपटातून दिसते. ५४ व्या ‘इफ्फी’त मी कॅप्टन हा चित्रपट दाखविण्यात आला.
इटलीतील मॅटिओ गॅरोन दिग्दर्शित क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. व्हेनीस फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट दिग्दर्शक’ आणि सॅन सेबेस्तियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट युरोपियन फिल्म’ पुरस्कार या चित्रपटाला मिळाले आहेत.
पश्चिम आफ्रिकेमधील सेनेगल देशातील दोन अल्पवयीन मुलांची नोकरीच्या शोधात गेल्यानंतर होणारी फरफट, तसेच त्यांना कोणत्या खडतर स्थितीला तोंड द्यावे लागते याच्या चित्रणासह स्थलांतरित कामगारांची व्यथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
सेनेगलच्या मध्यभागी असलेल्या डाकार या गजबजलेल्या शहरातील गरीब कुटुंबातील इदोयूह (सेयदोयू सार) हा १६ वर्षांचा मुलगा घरची गरिबी दूर करण्याच्या हेतूने युरोपमध्ये नोकरी करण्याचा निश्चय करतो. तसे तो आपल्या आईला सांगतो. यावेळी आई त्याच्यावर रागावते व युरोपमध्ये नोकरीसाठी गेलेले अनेकजण पुन्हा परतलेच नाहीत, त्यांचे मृतदेहही मिळाले नाहीत.
असे सांगून त्याला युरोपला न जाण्याचा सल्ला देते. परंतु इदोयूह आणि त्याचा चुलत भाऊ माऊस्सा (मॉस्टेफ फॉल) दोघेही आपल्या गावातच काम करून पैसे गोळा करतात व घरात कोणालाही न सांगता ते युरोपला जाण्यासाठी निघतात.
या प्रवासात त्यांना अनेक ठिकाणी पैसे देऊनही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बेकायदेशीरपणे कामगारांना युरोपला पाठविण्यासाठी एका बोटीत शेकडो कामगारांना कोंबून ती बोट चालविण्याची जबाबदारी इदोयूह याच्यावर टाकण्यात येते.
बोटीत जागा नसल्याने अनेकांना इंजिन रूममध्येही कोंबलेले असते. तिथे ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांचा कोंडमारा होता. यावेळी इदोयूह आपला चुलत भाऊ माऊस्सा याच्या हातात बोटीचे स्टिअरिंग देऊन इंजिन रूममध्ये बेशुद्ध पडलेल्या कामगारांना बाहेर काढून त्यांना जीवदान देतो.
अनेक समस्यांवर मात करत ती बोट अखेर इटलीला पोचते आणि सर्वांचा एकच जल्लोष होतो आणि सर्व कामगारांना आपण सुखरूप किनाऱ्यावर आणल्याचा आनंद इदोयूहच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो. अशी या चित्रपटाची कथा असून त्यात स्थलांतरित कामगारांची होणारी ससेहोलपट अधोरेखित केली आहे, ती प्रत्यक्ष पडद्यावरच पाहणे योग्य ठरेल.
अन् इदोयूह बनतो कॅप्टन!
घरच्या गरिबीमुळे चार पैसे कमविण्याची मनीषा उराशी बाळगून युरोपमध्ये जाणाऱ्या या अल्पवयीन मुलाला स्वतः बोट चालवून त्यातून अनेक कामगारांना घेऊन जाण्यास सांगितले जाते. अनेक कामगारांसह इदोयूह आणि माऊस्सा यांना बोटीत कोंबले जाते. कोणतीही माहिती नसलेल्या इदोयूह याच्यावर बोट चालविण्याबरोबरच बोटीतील कामगारांचीही जबाबदारी येऊन पडते आणि तो त्या बोटीचा कॅप्टन बनतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.