IFFI 2024: इफ्फीमध्ये 'एंटरटेनमेंट, सबका हक'! तिकीट न घेता Picture Time; सिनेमागृहाची आगळीवेगळी संकल्पना जाणून घ्या

Picture Time Theatre: या इफ्फीत आणखी अशा एका सिनेमागृहाची उभारणी झालेली आहे, ज्यात सिनेमा पाहण्यासाठी प्रतिनिधी बनण्याची किंवा तिकिटाची आवश्यकता नाही. हे सिनेमागृह आहे कला अकादमीच्या संकुलात तात्पुरते उभारण्यात आलेले इन्फ्लेटेड सिनेमागृह.
Picture Time Theatre
IFFI 2024 Inflated Picture Time TheatreDainik Gomantak
Published on
Updated on

IFFI 2024 Inflated Picture Time Theatre

इफ्फीमध्ये अनेक सिनेमा वेगवेगळ्या सिनेमागृहांत सुरू आहेत. सिनेमांचा आनंद घेण्यासाठी प्रतिनिधी लगबग करून या सिनेमागृहातून त्या सिनेमागृहात धावताना दिसतात. परंतु या इफ्फीत आणखी अशा एका सिनेमागृहाची उभारणी झालेली आहे, ज्यात सिनेमा पाहण्यासाठी प्रतिनिधी बनण्याची किंवा तिकिटाची आवश्यकता नाही. हे सिनेमागृह आहे कला अकादमीच्या संकुलात तात्पुरते उभारण्यात आलेले इन्फ्लेटेड सिनेमागृह.

‘पिक्चर टाईम’ या आस्थापनाचे हे सिनेमागृह वातानुकूलित व्यवस्था, स्वच्छतागृह अशा आधुनिक सोयींनी सुसज्ज आहे. तसेच या सिनेमागृहात दाखवण्यात येणारे सिनेमा देखील आधुनिक अशा डिजिटल माध्यमातून स्पष्टपणे दिसणारे आणि उत्कृष्ट ध्वनिव्यवस्थेतून ऐकू येणारे आहेत.

‘पिक्चर टाईम’ हे आधुनिक काळातील एक वैशिष्ट्यपूर्ण असे इन्फ्लेटेबल आणि फिरते डिजिटल सिनेमागृह आहे. आपल्या भारतात ‘तंबू’ पद्धतीच्या फिरत्या सिनेमागृहांची परंपरा राहिली आहे. परंतु पिक्चर टाईमचे हे सिनेमागृह तात्पुरते असले तरी तंबू पद्धतीच्या सिनेमागृहाशी तुलना करता येणार नाही इतके ते विकसित आहे. सुशील चौधरी यांनी संशोधन करून हे सिनेमागृह विकसित केले आहे. तेच पिक्चर टाईम या आस्थापनाचे मुख्य कार्याधिकारी असून या पद्धतीच्या सिनेमागृहाचे दोन पेटंट (विशेषाधिकार) त्‍यांच्याकडे आहेत. 

आज भारतातली सिनेमागृहे मल्टिप्लेक्स विशेषतः ही सामान्य लोकांच्या आर्थिक आवाक्यात नाहीत. मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहायला जाणे म्हणजे प्रतिमाणसासाठी सरासरी पाचशे रुपये खर्च असतो. सिनेमा हा आपल्या देशात प्रत्येकासाठी जणू दुसरा धर्मच आहे. अशावेळी ‘पिक्चर टाईम’ इन्फ्लेटेबल सिनेमागृहाची संकल्पना घेऊन अवतरले आहे. त्यांचे घोषवाक्यच आहे - ‘एंटरटेनमेंट, सबका हक!’ 

पिक्चर टाईमचे टेक्निकल हेड राजेश चौहान सांगतात, गावातील माणसाला सिनेमा पाहायचा असेल तर त्याच्यासाठी तिथे मल्टिप्लेक्स उभारले जाऊ शकत नाही. कारण त्यांची गुंतवणूकच कोट्यवधींच्या घरात असते. त्यामुळे गावातील माणसाला सिनेमा पाहता यावा यासाठी ‘कॉस्ट इफेक्टिव्ह’ सिनेमागृहाची निर्मिती करणे गरजेचे होते, जे काम सुशील चौधरी यांनी केले आहे.

हे सिनेमागृह दोन दिवसांत सहजपणे उभारले जाऊ शकते. आर्थिकदृष्ट्या हे सिनेमागृह लोकांना परवडण्याजोगे व्हावे याचा विचार करतानाच आस्थापन देखील कशी बचत करू शकेल याचा सारासार विचार करूनच या सिनेमागृहाची रचना तयार करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, ज्यावेळी सिनेमागृहात कमी माणसे असतील त्यावेळी विशिष्ट विभागातील वातानुकूलित व्यवस्थाच काम करेल अशी योजना आहे. या सिनेमागृहातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटक ही स्‍थलांतरीत करण्यासाठी सोपी राहील अशा प्रकारे रचली गेली आहे.

आपली ७५ टक्के जनता सिनेमाच्या तिकिटासाठी ४०० ते ५०० रुपये खर्च करू शकत नाही. काही छोट्या शहरांमध्ये तर सिनेमागृहेही नसतात आणि जर असलीच तर त्यात स्वच्छता नसते. अशा ठिकाणी पिक्चर टाईम सिनेमागृह हे सोयीस्कर ठरते. ‘हम लोग इसे फॅमिली फ्लेक्स भी कहते है .... जहा पे फॅमिली आये. गावातील महिलांनी पिक्चर टाईम सिनेमागृहात यावे यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत असतो, असे राजेश चौहान पुढे बोलताना म्हणाले.

Picture Time Theatre
Kriti Sanon In IFFI: 'चित्रपटात महिलांचे खरे रूप दाखवणे...'; अभिनेत्री क्रिती सेनॉनने पुरुषप्रधान संस्कृतीबद्दल मांडले मत

अनेक स्वतंत्र निर्माते आपला सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये रिलीज करू शकत नाहीत. त्यांचे सिनेमा पिक्चर टाईममधून रिलीज झाले आहेत. अरुणाचल प्रदेश, हिमाचल येथील सिनेमा निर्मात्यांसाठी पिक्चर टाईम एक प्रकारे, त्यांचा सिनेमा प्रकाशित करण्याचे माध्यम ठरले आहे. अनेक सिनेमांनी पिक्चर टाईममधून आपला प्रीमियर साजरा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com