Ruturaj Gaikwad Marriage: भारतीय क्रिकेट संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड जूनच्या पहिल्या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चंना उधाण आले आहे. पण तो कोणाबरोबर लग्न करणार हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार ऋतुराज 3-4 जून दरम्यान लग्न करणार आहे. त्याचमुळे 7 ते 11 जून दरम्यान होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी त्याच्याऐवजी यशस्वी जयस्वालची भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली.
दरम्यान, ऋतुराज ज्या मुलीबरोबर लग्न करणार आहे, त्या मुलीचे नाव उत्कर्षा पवार असल्याची चर्चा होत आहे. उत्कर्षा पवार ही वेगवान गोलंदाज असून महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळते. 24 वर्षीय उत्कर्षा देखील ऋतुराजप्रमाणे पुण्यातच रहाते.
तसेच सध्या सोशल मीडियावरील चर्चांनुसार ऋतुराज आणि उत्कर्षा गेली अनेक वर्षे एकमेकांना ओळखत असून बऱ्याच वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पण त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा होत असली, तरी त्यांच्या नात्याबद्दल किंवा लग्नाबद्दल त्या दोघांनीही कोणतेही उघड भाष्य केलेले नाही.
ऋतुराज सध्या आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत असून त्याने या संघाकडून नुकताच 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 50 वा आयपीएल सामना खेळला. यानिमित्ताने त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने उत्कर्षाचा उल्लेख केला असून तिचा फोटोही पोस्टमध्ये शेअर केला आहे.
ऋतुराजने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'चेन्नई सुपर किंग्ससाठी 50 वा सामना. चेन्नई सुपर किंग्सचा भाग झाल्याचा अभिमान वाटतो. आम्ही प्लेऑफला गेल्याने आपल्यासाठी हा खास सामना होता. चेपॉकमध्ये भेटू.' या कॅप्शनमध्येच त्याने शेवटी लिहिले आहे की 'सरप्राईज भेटीसाठी थँक्यू @utkarshaaa13'.
तसेच त्याने शेअर केलेल्या या पोस्टच्या शेवटच्या फोटोमध्ये डेवॉन कॉनवेची पत्नी किम असून तिच्यासह एक मुलगी चेन्नईची जर्सी घातलेली दिसून येत आहे. तिला त्याने टॅग केले असल्याने ती उत्कर्षा असल्याचे स्पष्ट होत आहे.
त्याचमुळे त्यांच्यातील नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातच आता ऋतुराजच्या लग्नाचे वृत्त समोर येत असल्याने या चर्चांना अधिक उधाण आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.