Video Viral: रोहितनं 'बर्थडे बॉय' ईशानकडेच मागितलं गिफ्ट, तर सेलिब्रेशनवेळी विराटची लपाछपी

सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने ईशान किशनचा वाढदिवस दणक्यात साजरा केला.
Ishan Kishan Birthday Celebration
Ishan Kishan Birthday CelebrationDainik Gomantak

Ishan Kishan Birthday Celebration: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील डॉमिनिकाला झालेल्या पहिल्या कसोटीतून ईशान किशनने भारताकडून कसोटी पदार्पण केले. त्यानंतर 18 जुलैला त्याने त्याचा 25 वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, त्याच्या वाढदिवसाच्या दिवसाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये दिसते की 18 जुलैला भारतीय संघ दुसऱ्या कसोटीसाठी सराव करत होता. त्यामुळे ईशाननेही नेट्समध्ये फलंदाजी आणि यष्टीरक्षणाचा सराव केला. तसेच वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज ब्रायन लारा यांचीही भेट घेतली.

याबरोबर त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला काय गिफ्ट देणार याबद्दल भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला विचारल्यानंतर ईशानच्या समोरच रोहित म्हणाला, 'संघाला विचारावं लागेल, त्यात संपूर्ण संघाचं योगदान हवं. तुला काय पाहिजे, सर्व आहे तुझ्याकडे. तूच आम्हाला गिफ्ट दे भाई शतक करून.'

दरम्यान, सरावानंतर ड्रेसिंग रुममध्ये ईशानचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्याने केक कापल्यानंतर तो भरवण्यासाठी कोणालातरी शोधत असतानाच विराट कोहली लपत बाजूला झाल्याचेही व्हिडिओमध्ये दिसते.

साधारणत: भारतीय संघात कोणाचाही वाढदिवस असल्यानंतर सेलिब्रेशनवेळी केक कापल्यावर तो चेहऱ्याला लावण्याची पद्धत आहे. त्यामुळेच कदाचीत आपल्याला केक लागू नये, म्हणून विराट लपत असल्याचा कयास अनेकांनी व्यक्त केला, तर काहींनी विराट त्याचे डाएट काटेकोर पाळत असल्याने केक खाण्यापासून वाचत असल्याचाही अंदाज लावला.

ईशान किशनचे कसोटी पदार्पण

ईशानने 12 ते 14 जुलैदरम्यान झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून पदार्पण केले होते. या सामन्यात त्याला फलंदाजीला उशीरा संधी मिळाली. त्याने एक धाव काढल्यानंतर भारताने पहिला डाव घोषित केला. त्याला या सामन्यात फलंदाजीत फारशी संधी मिळाली नसली, तरी त्याने यष्टीरक्षण करताना आपली छाप पाडली होती.

हा सामना भारताने एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. आता भारत आणि वेस्ट इंडिज संघात दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना 20 जुलैपासून त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com