म्हापसा: आगामी राज्य विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून भारतीय जनता पार्टी (BJP) युवा मोर्चाने चाळीसही मतदारसंघासाठी मुख्यमंत्री चषक क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले. पेडे-म्हापसा येथील भाऊसाहेब बांदोडकर क्रीडा संकुल मैदानावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मंत्री-आमदारांचा संघ आणि भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांच्या नेतृत्वाखालील संघात प्रदर्शनीय फुटबॉल सामना झाला, ज्यात युवा मोर्चा संघाने गोल करून सामना जिंकला.
एकूण 13 क्रीडा प्रकार व विविध सांस्कृतिक स्पर्धांचे 30 ऑक्टोबर ते 13 डिसेंबर या कालावधीत आयोजन होईल. मुख्यमंत्री चषक स्पर्धेच्या उद्घाटनास मुख्यमंत्री सावंत यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर व मनोहर (बाबू) आजगावकर, मंत्री, आमदार, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या, पक्षाचे संघटनमंत्री सतीश धोंड, भाजपा युवा मोर्चा गोवा अध्यक्ष समीर मांद्रेकर, सचिव अखिल पर्रीकर यांची उपस्थिती होती.
22 पेक्षा जास्त जागावर जिंकू ः मुख्यमंत्री
स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, राज्य विधानसभेच्या 2022 मधील निवडणुकीत भाजपास 22 पेक्षा जास्त जागा मिळतील व सरकार स्थापन करण्याचा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला.
पाच वर्षांतून एकदा सामना नको ः लोबो
प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यानंतर मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले, की ‘‘अशाप्रकारचे सामने वर्षातून दोन वेळा होणे आवश्यक आहे, पाच वर्षांतून एकवेळ सामना घेऊन फायदा होणार नाही. आरोग्य तंदुरुस्तीसाठी फुटबॉल सामने खेळायला हवेत.
मुख्यमंत्री चषक स्पर्धेची क्रीडाज्योत प्रज्वलित केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, बाबू आजगावकर, मंत्री नीलेश काब्राल, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या व उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.