पणजी: गोव्याच्या सीनियर पुरुष क्रिकेट (Goa senior mens cricket team) संघाला बलाढ्य पंजाबला आव्हान देणे अजिबात जमले नाही. त्यामुळे सय्यद मुश्ताक अली करंडक (Syed Mushtaq Ali Trophy) टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात 81धावांनी हार पत्करावी लागली. लखनौ येथे भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर शनिवारी सामना झाला. आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्जकडून खेळणारा पंजाबचा 21 वर्षीय सलामीवीर प्रभसिमरन सिंग याच्या तुफानी फलंदाजीचा तडाखा गोव्याला सहन करावा लागला. या यष्टिरक्षक-फलंदाजाने अवघ्या 61 चेंडूंत नाबाद 119 धावा करताना 11 चौकार व 6 षटकारांची आतषबाजी केली. पंजाबने 4 बाद 197 धावा केल्यानंतर गोव्याला 8 बाद 116धावाच करता आल्या.
फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर प्रभसिमरन आणि कसोटीपटू शुभमन गिल (40) यांनी गोव्याच्या गोलंदाजांची धुलाई करताना 13 षटकांत 118 धावांची सलामी दिली. फिरकीपटू अमित यादवने शुभम रांजणे याच्याकरवी शुभमनला झेलबाद केले. नंतर प्रभसिमरन याने कर्णधार अभिषेक शर्मा (25) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली.
सिद्धार्थ कौल (3-21), हरप्रीत ब्रार (2-12), मयांक मार्कंडे (2-29) यांनी प्रभावी मारा करताना गोव्याच्या फलंदाजांना सावरू दिले नाही. गोव्याच्या फक्त दोघांनाच दुहेरी धावसंख्या नोंदविता आली. सुयश प्रभुदेसाईने 30, तर शुभम रांजणे याने 19 धावा केल्या. पंजाबचा हा तीन सामन्यातील दुसरा विजय ठरला, तर गोव्याला तीन लढतीत दुसरा पराभव पत्करावा लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.