Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघाला काही दिवसांपूर्वीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषकातील उपांत्य सामन्यात पराभवाचा धक्का बसला. तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये बऱ्याचदा भारताच्या नेतृत्व गटात बदल होत असलेले दिसत आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात भारतीय संघाच्या भविष्यातील संभाव्य कर्णधाराबद्दल नेहमीच चर्चा होताना दिसते. आता यावर गौतम गंभीरनेही आपले मत मांडले आहे.
दिल्लीतील एका कार्यक्रमात भारताच्या भविष्यातील कर्णधाराबद्दल बोलाताना गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला, 'हार्दिक पंड्या नक्कीच शर्यतीत आहे. पण रोहित शर्मासाठी हे दुर्दैवी ठरेल. कारण केवळ आयसीसी स्पर्धेतील त्याच्या नेतृत्वावरून त्याची पारख करणे योग्य ठरणार नाही.'
हार्दिकने यापूर्वी रोहितच्या अनुपस्थितीत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 5 सामन्यांत नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली नुकतेच भारताने न्यूझीलंडमध्ये टी20 मालिकाही जिंकली. तसेच त्यापूर्वी त्याने आयपीएल 2022 स्पर्धेत गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना संघाला विजेतेपदही जिंकून दिले होते. त्यामुळे अनेकांनी तो भारताचा भविष्यातील पूर्णवेळ कर्णधार (India's future captain) होऊ शकतो, असे मत मांडले होते.
गंभीरचा पृथ्वी शॉवर देखील विश्वास
गौतम गंभीरने हार्दिकशिवाय पृथ्वी शॉचे देखील भविष्यातील संभाव्य कर्णधारासाठी नाव घेतले आहे. पण गंभीरने कोणत्या क्रिकेट प्रकारासाठी हे मात्र स्पष्ट केले नाही.
गंभीर म्हणाला, 'मी पृथ्वी शॉला निवडेल, कारण मला माहित आहे अनेक लोक त्याच्या मैदानाबाहेरील गोष्टीबद्दल चर्चा करत असतील; परंतु, हेच प्रशिक्षक आणि निवरकर्त्यांचे काम असते. निवडकर्त्यांनी केवळ 15 खेळाडूंची निवड करायची नसते, तर त्यांना योग्य मार्गावर देखील आणायचे असते.'
'पृथ्वी शॉ हा खूप आक्रमक कर्णधार असेल आणि यशस्वी असेल, असे मला वाटते. कारण, त्याच्या खेळण्यात ती आक्रमकता दिसते.'
साल 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या पृथ्वी शॉ सध्या पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचे दिसत आहे. खरंतर 2019 मध्ये प्रतिबंधात्मक पदार्थ सेवन केल्याच्या कारणामुळे त्याला बंदीला सामोरे जावे लागले होते. तेव्हापासून त्याची लाईफस्टाईल आणि फिटनेसच्या कारणामुळे तो सातत्याने चर्चेत येत असतो. तसेच तेव्हापासून त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.
पण, नेतृत्वाच्या अनुभवाबद्दल बोलायचे झाले, तर शॉने 2018 साली भारताचे 19 वर्षांखालील विश्वचषकात नेतृत्व केले होते. त्याच्या नतृत्वाखाली भारताने हा विश्वचषकही जिंकला होता. तसेच त्याने देशांतर्गत स्पर्धेत मुंबई संघाचेही नेतृत्व केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.