ISL Football: फातोर्डा येथील ‘होम ग्राऊंड’वरील वर्चस्व एफसी गोवाने शनिवारी पुन्हा एकदा सिद्ध केले. यंदा या मैदानावर पाचपैकी चौथा सामना जिंकताना त्यांनी कमजोर नॉर्थईस्ट युनायटेडवर 2-1 फरकाने मात केली. या निकालासह कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पाचवा क्रमांकही मिळविला.
फातोर्ड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एफसी गोवाने पूर्वार्धात दहा मिनिटांच्या अंतराने दोन गोल करून स्थिती बळकट केली. एदू बेदिया याने 10 व्या, तर इकेर ग्वोर्रोचेना याने 20 व्या मिनिटास गोल करून एफसी गोवा संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. 90+4 व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर विल्मार जॉर्डन याने नॉर्थईस्टची पिछाडी एका गोलने कमी केली.
एफसी गोवाचा हा स्पर्धेतील सहावा विजय ठरला. त्यांचे आता 10 लढतीतून 18 गुण झाले आहेत. केरळा ब्लास्टर्सचेही तेवढेच गुण आहेत, मात्र गोलसरासरीत +5 असे सरस ठरल्याने गोव्यातील संघाला पाचवा क्रमांक मिळाला. नॉर्थईस्ट युनायटेडवर ओळीने दहावा पराभव पत्करण्याची नामुष्की आली. त्यांनी स्पर्धेत तब्बल 27 गोल स्वीकारले आहेत.
यजमानांची दमदार आघाडी
एफसी गोवाने पूर्वार्धात नॉर्थईस्ट युनायटेडवर पूर्ण वर्चस्व राखले. रेड कार्डमुळे एका सामन्याचे निलंबन संपवून संघात पुनरागमन केलेल्या एदू बेदियाने दहाव्या मिनिटास यजमान संघाचा पहिला गोल केला. नोआ सदावी याने मैदानाच्या डाव्या भागातून दिलेल्या शानदार पासवर एदू याने चेंडूला गोलनेटची दिशा दाखविली. दहा मिनिटानंतर सेटपिसेसवर इकेर ग्वोर्रोचेना याने एफसी गोवाची आघाडी बळकट केली. नॉर्थईस्टचा गोलरक्षक मिर्शाद मिचू याने गोलक्षेत्राबाहेर नोआ याला पाडण्याची चूक केली. त्यावेळी मिळालेल्या फ्रीकिक फटक्यावर एफसी गोवाने प्रतिस्पर्ध्यांच्या कमजोर बचावाचा लाभ घेत लक्ष्य साधले. उत्तरार्धात नोआ सदावी याला दोन वेळा गोल करण्याची संधी होती, परंतु तो यशस्वी ठरला नाही, त्यामुळे एफसी गोवाची आघाडी दोन गोलपुरती मर्यादित राहिली.
बंगळूर विजयी
स्पर्धेत शनिवारी झालेल्या आणखी एका सामन्यात बंगळूर येथे बंगळूर एफसीने जमशेदपूर एफसीवर 1-0 असा निसटता विजय मिळविला. दानिश फारुख याने पाचव्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. बंगळूरचे आता 10 लढतीत 10 गुण झाले असून ते आठव्या क्रमांकावर आहेत. 10 लढतीतील आठव्या पराभवामुळे जमशेदपूर संघ चार गुणांसह दहाव्या क्रमाकांवर राहिला.
दृष्टिक्षेपात...
- एफसी गोवाचे नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध 17 लढतीत 6 विजय
- यंदा आयएसएल स्पर्धेत एदू बेदियाचे 2, तर इकेर ग्वोर्रोचेना याचे 3 गोल
- यावेळच्या स्पर्धेत फातोर्डा येथे एफसी गोवाचे 5 सामने, 4 विजय व 1 पराभव
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.