गणपती ही निसर्ग देवता. गोवा, कोकणात गणपतीची जेथे प्रतिष्ठापना केली जाते तेथे मूर्तीच्या डोक्यावर मौसमी फुलांची आणि फळांची आरास केली जाते त्याला माटोळी असे म्हणतात. माटोळीची सजावट कल्पकतेने करण्याची परंपरा इथे रूढ आहे. माटोळीमध्ये परिसरातील वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांचा उपयोग केला जातो ज्यात वेली, कंद, मूळ, पाने, फुले, फळे यांचा समावेश होतो.
माटोळीमध्ये बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म असतात. हे ज्ञान कोणत्याही पुस्तकात लिहिलेले नसल्याने ते माटोळीच्या निमित्ताने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक रूपाने हस्तांतरित होत असते. हीच गोष्ट ध्यानात घेऊन गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याचे पूर्व संचालक प्रसाद लोलयेकर यांनी गणेशोत्सवातील माटोळी सजावटीच्या वारशाचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे आणि नव्या पिढीला जैविक संपदेच्या वैविध्यपूर्ण वनौषधींचे आणि त्यांच्या उपयुक्ततेचे दर्शन व्हावे म्हणून राज्यस्तरीय माटोळी स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यास प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे पेडणे ते काणकोण या परिसरातील स्पर्धक माटोळी स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या परिसरातील जैवविविधतेचे दर्शन घडवतात.
या स्पर्धेमुळे पूर्वापार चालत आलेल्या वारशाचे काही प्रमाणात का असेना संवर्धन होताना दिसतेय. माटोळी बांधण्यासाठी फक्त केवणीच्या दोरांचा उपयोग केला जातो, माटोळी बांधण्यासाठी कुम्याचे दोर वापरता कामा नये. माटोळी बांधल्यानंतर तिच्यावर करमळाची पाने घालावीत, कुठली वनस्पती विषारी, एखाद्या वनस्पतीचा उपयोग औषध म्हणून कसे करावे, प्रमाण किती घ्यावे अशा अनेक गोष्टी समजत आणि उमजत जातात. वनस्पतींची ओळख पटायला लागते. त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजायला लागते.
गेली अनेक वर्षे मी माझ्या मित्रपरिवाराबरोबर या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांच्या माटोळीना भेट देते. त्यांच्या त्या सुंदर, सुबक, आणि कल्पक माटोळीना पाहून आवक व्हायला होते. प्रत्येक माटोळी ज्ञानाचा खजिनाच असते. नेत्रावळीच्या तलेवाड्यावर असणारे वयोवृद्ध महादेव गावकर असो अथवा म्हादई अभयारण्याच्या कुशीतील सट्रेवासीय दीपक धानु गावकर असो किंवा अगदी तरुण पिढीची तृप्ती पालकर असो, या साऱ्यांनीच पर्यावरणीय परंपरेचे श्रद्धेने जतन करण्याला महत्त्व दिलेले आहे. या स्पर्धेत काणकोणातील रुपेश पैंगीणकर, सत्तरीचे दीपक धानु गावकर, राम ओझरकर, फोंड्याचे श्रीकांत सतरकर, दत्ता नाईक, विशांत गावडे आदींनी राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून आपल्या पर्यावरणीय वारशाची ओळख करून देण्यात महत्त्वाचा वाटा उचललेला आहे.
दरवर्षी चतुर्थीत या सर्व कलाकारांच्या माटोळीची गोमंतकीय आतुरतेने वाट तर पहात असतातच, परंतु सर्वांची नजर असते ती फोंडा-कुर्टी येथील श्रीकांत सतरकर यांच्या माटोळीकडे. कारण माटोळीत बांधलेल्या मौसमी फळफुलांचे जास्तीत जास्त नग, माटोळीच्या सजावटीत आणि बांधण्यातील कल्पकता आणि समयसूचकता आदी पैलूंनी या स्पर्धेला श्रीकांत सतरकर आणि त्यांच्या संयुक्त कुटुंबियांनी विशेष योगदान केलेले आहे. माटोळीतून त्यांनी चक्क गणपती, लक्ष्मी, मारुती, विठ्ठल यासारख्या कलाकृती साकारल्या. त्यामुळे अनेक पर्यावरण आणि संस्कृती चाहत्यांची पावले त्यांच्या घराच्या दिशेने वळतात. दरवर्षी माटोळीच्या माध्यमातून नवनवीन कलाकृती आणि माहिती प्रस्तुत करऱ्याण्यात त्यांना त्यांच्या सम्पूर्ण कुटुंबाचे आर्थिक, भावनिक, सामजिक पाठबळ लाभल्यामुळे घरातील माटोळी लक्षवेधक आणि प्रबोधनात्मक होत असल्याचे ते सांगतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.