देशातील अनेक भागात सध्या डेंग्यू रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. साधारणतः पावसाळा सुरू झाली की डेंग्यु, मलेरियाची साथ सुरू होते. परंतु सध्या शहरीकरण, स्वच्छतेचा अभावअशा गोष्टींमुळे डेंग्यू रोग जलदगतीने फैलावत आहे. गोव्यातील बार्देश तालुक्यातही डेंग्यू रोगाचा प्रसार जलद गतीने होतोय. गेल्या वर्षाच्या तुलनेत गोव्यात यंदा डेंग्यू नियंत्रणात असला तरी जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान एकूण 382 रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य संचालनालयाकडून खबरदारीचे उपाय करूनही डेंग्यूचा संसर्ग काही भागांमध्ये झाला आहे. (Home remedies)
• डेंग्यू तापाची लक्षणे-
डेंग्यूचा डास चावल्यानंतर त्याची लक्षणे तीन ते चार दिवसांत दिसू लागतात. या रोगाचा ताप खूप तीव्र असतो. तापामुळे बाधित व्यक्ती लवकर अशक्त होतो. संसर्ग झाल्यानंतर थंडी वाजून ताप येणे तसेच घसा, डोके आणि सांधे दुखणे, अशक्तपणा, शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे, मळमळ, उलट्या, शारीरिक वेदना अशी लक्षणे प्रामुख्याने दिसू लागतात. रुग्णाच्या शरीरावर लाल पुरळ देखील उठतात. अशा परिस्थितीत ताप बराच काळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
• डेंग्युच्या तापासाठी घरगुती उपाय -
डेंग्यू तापावर आपण प्राथमिकरीत्या घरगुती उपाय करू शकतो. जसे कि,
• लिंबाचा रस - लिंबाचा रस नियमित सेवन करावा. लिंबाच्या रसात व्हिटॅमिन 'सी' असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
• पपईचे पान - पपईचे पान हे डेंग्यू बरा करणारा पदार्थ आहे. पपईच्या पानांचा रस पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे प्लेटलेट्स वाढून प्रतिकारशक्ती देखील वाढते.
• बीटाचा रस- ३ ते ४ चमचे बीटाचा रस, एक ग्लास गाजराच्या रसात मिसळून प्यावा. त्यामुळे रक्तपेशींची संख्या झपाट्याने वाढते.
• तुळस- तुळशीची पाने पाण्यात उकळा, नंतर हे पाणी प्या.
• नारळपाणी - नारळ पाण्याला अमृत म्हटलं गेलंय. आजारी माणसाला प्रमाणात जर नारळ (शहाळे) पाणी दिल्यास त्याला तरतरी येते. अंगात उत्सहीपणा येतो.
• प्रतिबंध-
डेंग्यू रोग पसरण्यातला महत्वाचा घटक म्हणजे डास. डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोग प्रसरण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साचू न देणे; कचरा, फुटक्या वस्तूंचा पसारा न करणे; खराब टायर, फुटक्या वस्तू यात पाणी साठू न देणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. मोकळी मैदाने तसेच घराच्या आवारातील खड्ड्यांमध्ये पाणी साचले तर ते खड्डे मातीने भरावेत. असे करणे शक्य नसेल तर त्यात रॉकेलचे थेंब टाकावे. तसेच अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते. घरात मच्छरदाणी वापरणे, सकाळी- तिन्हीसांजेला घराबाहेर पडणे टाळावे असे उपाय केल्यावरही आपल्याला या रोगापासून दूर राहता येईल.
• वैद्यकीय काळजी घेणे योग्यच -
ताप असेपर्यंत आराम करावा. ताप ३-४ दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिल्यास पेशंटला डॉक्टरांकडे घेऊन जावे. शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. रुग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात. निरोगी शरीरात दीड ते दोन लाख प्लेटलेट्स असतात. डेंग्यू तापामध्ये रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होऊ लागतात. प्रमाणापेक्षा प्लेटलेट्स कमी होणे हे जीवघेणे देखील ठरू शकते. जर प्लेटलेट्स एक लाखाच्या खाली आल्या तर त्वरित रुग्णालयात दाखल करावे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.