आषाढच्या पावसात फुलली 'रानफुले'

रानफुलांच्या ऋतूचा क्रम असतो, तो लक्षात ठेवून त्यांची गळाभेट घेतली की पुढचे आठ महिने आनंदात जातात.
Goa |Monsoon
Goa |MonsoonDainik Gomantak

-आसावरी कुलकर्णी

कोंब हळू मोठे होऊन आकार घेऊ लागलेत. रानमित्रांना भेटायला भ्रमंती सुरू झाली आहे. एव्हाना काही रोपट्यानी ओळख दाखवायला सुरवात केलीये.. ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे, त्या त्या वेळचे हे औट घटकेचे सोबती जीवनचक्र सुरू करतात.

दरवर्षी काय तेच तेच फोटो घालते ही असा विचार मित्र मैत्रिणींना पडतो. हल्ली कुठल्याही रस्त्यावरच्या कडेला करंगळी एवढं पाणी पडत असलं तरी लोक बिअर बाटल्या घेऊन तिथे झिंगत असतात त्यामुळे ही कुठे येड्यासारखं फुल शोधत फिरते ही अश्या प्रतिक्रिया असतात. पण कसं आहे, सृष्टीचे नियम चुकत नाहीत. चक्रात मात्र बदल असतो,

कवच नावाची रोपटी दरवर्षी ज्या प्रमाणात उगवतात, त्यावरून पाऊस या वर्षी कमी आहे का जास्त त्याचा अंदाज बांधता येतो. कुडा, नागलकुडा, मालकांगिणी वेवेगळ्या ठिकाणी फळत असतात, सडे दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येतात, आणि जरी जुने सवंगडी असले तरीही त्यांच्या जागा बदलतात, नसल्या तर त्या का नाही उगवल्या, त्यांचं प्रमाण कमी जास्त झालं का यावरून निसर्गचक्राचा अंदाज बांधता येतो, त्या परिचक्राचे आडाखे बांधून त्याचा उपयोग, खराब झालेल्या जमिनीच्या पुनर्बांधणीत करता येतो, थोडक्यात निसर्गाची सृजन करण्याची शक्ती आपल्यात येते.

Goa |Monsoon
'Tourism of Goa' ॲप तुमच्या मोबाईलमध्ये हवेच

मी राहत असलेली जागा सुदैवाने सडे असलेला भाग आहे, त्यामुळे एरव्ही कोरडा ठणठणीत असलेला भाग (काही महाभागांच्या मताप्रमाणे निरुपयोगी) पावसाळ्यात (Monsoon) जिवंत होतो, आणि माझ्यासारखे भटके प्राणीही पुनर्जीवित होतात. भटकंती करताना, या दरवर्षी येणाऱ्या सोबत्याना, पुनर्भेटीच्या ‘झील’ने मी भेटत राहते, कोण कोण आलंय, कोण गायब झालंय, कोण नवीन रूप घेऊन आलंय इ. रानफुलांच्या ऋतूचा क्रम असतो, तो लक्षात ठेवून त्यांची गळाभेट घेतली की पुढचे आठ महिने आनंदात जातात, ही रानफुलं बोलत राहतात, गुजगोष्टी करतात सुख-दुःखाच्या, मी बोललेलंही कळत असेल त्यांना. अगदी दिवाळीपर्यंत चालेल हा संवाद..

ओलेती जमीन बोलते. अगदी जिवंत होते हिरव्या कोंबातून, दगड धोंडेही हिरवा अवतार घेतात, ब्रम्हांडात फिरत असलेली शक्ती आपल्यासमोर वेगवेगळी रूप घेताना दिसते. अशा दिवसांत एखाद्या देवराईत गेलं की अभूतपूर्व अशा जादुई नगरीत फिरल्याचा भास होतो, स्वतः पेटणारी बुरशी- हिरवं मॉस, एखाद्या हॉलीवूड (Hollywood) , गूढ चित्रपटाची (Movie) जाणीव करून देतात, त्याचबरोबर, कान्ट म्हणजे जळू, साप, बेडूक, कुर्ल्या, कोळी हे वेगवेगळे जीव अजून भर घालतात.

निसर्ग (Nature) भरभरून देतो, सृजनाचा सोहळा, जीवनचक्र, विविध रंगसंगती, पावसाबरोबर निर्माण होणारं संगीत आणि आपली अशी गूढ भाषा...ही भाषा मी शिकतेय त्यांबरोबर बागडून. लेखाच्या पुढच्या काही भागात आपण भेटूच या रानमित्रांना. तोपर्यंत तुम्हीही प्रयत्न करा. निसर्ग बोलतोय तुमच्याशी- एका वेगळ्याच भाषेत, फक्त डोळे कान उघडे ठेवून फिरा, जमलंच नाही तर जे फिरतायत त्यांना ऐका. बघा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल...कराल ना??

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com