पणजी : प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा. याची जाणीव देऊन ब्रह्मकुमारी सरिता राठी यांनी श्रेष्ठ कर्मांचा समुच्चय करणे, सहनशक्ती वाढवणे, परिस्थितीशी जुळवून घेणे, योग्य पारख करणे, योग्य निर्णय घेणे, परिस्थितीला सामोरे जाणे, सहयोगाची भावना दृढ करणे व घडलेल्या गोष्टींचा पश्चाताप न करता या सोडून देणे. ह्या आठशक्ती यशासाठी मंत्र आहेत हे सोदाहरण स्पष्ट केले.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे कांपाल पणजी येथे दयानंद बांदोडकर मैदानावर सुरु असलेल्या ८४ व्या महाशिवरात्री महोत्सवाच्यानिमित्त आयोजित केलेल्या आध्यात्मिक व्याख्यान मालेत समारोपाचे पुष्प गुंफताना सरिता राठी बोलत होत्या. यशस्वी होण्यासाठी आठशक्ती या विषयावर त्यांनी आज व्याख्यान दिले व प्रत्येक शक्ती विषयी उद्बोधक विवेचन करुन उपस्थित जनसमुदायाला प्रभावित केले.
सरिता बेहन म्हणाल्या, कोणताही अवगुण नसलेला माणूस तुम्ही शोधत राहाल तर शेवटपर्यंत एकटेच राहाल. एखाद्या गोष्टीची चिंता करून त्यावर सारखा विचार करतो तेव्हा आपल्या वाट्याला दुःख येते. आपल्या विचारांच्या श्रेष्ठतेवर आपले भविष्य बनेल हे लक्षात घ्यायला हवे. ज्या गोष्टी जीवनात गरजेच्या नसतात त्या वगळायला हव्यात. रागाचा एक क्षण तुम्ही शांत राहून स्वीकारलात तर पुढचे शंभर क्षण चांगले जातात.
रागामुळे नाती बिघडतात. सहनशक्ती माणसाला नेहमीच फलदायी ठरते. स्वतःमधील गुण कमी होतात तेव्हा दुसऱ्यातील अवगुण दिसत असतात. आपल्यासमोरील व्यक्ती जसा आहे तसा स्वीकारायला हवा. परिस्थिती जुळवून घेण्याने आपल्याला समाधान लाभते याबद्दल सांगून सरिताबेहन यांनी सांगितले की समोरच्या माणसाला गुणदोषांसह स्वीकारणे याला ‘ॲडजेस्टमेंट’ म्हणतात. आपल्या समोर जे पर्याय असतात त्यापैकी योग्य पर्याय शोधणे गरजेचे असते. चुकीचे निर्णय पश्चात्ताप करायला लावतात.
ज्याच्याकडे मनोबल असेल तो जिंकेल. ध्यानधारणा करून ज्ञानाद्वारे मनोबल वाढवता येतात. असे स्पष्ट करून सरिता बेहन म्हणाल्या, शुध्द भावनेने सहकार्य केले तर फलदायी होते. मनात घृणा, द्वेष, दुःख भरुन ठेवले तर त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. सहन करणे ही शक्ती आहे भेकडपणा नव्हे. अनावश्यक गोष्टींना नाकारायला हवे.
समन्वयक एकनाथ अंकलेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या गोवा व सिंधुदुर्ग प्रांत प्रमुख शोभा बेहन यांच्या हस्ते यावेळी सरिता राठी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.सिताकांत घाणेकर व प्राचार्य पं. कमलाकर नाईक यांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या.
हे पाहा : देशाचे वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी अध्यात्माचा प्रसार व्हावा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.