आजचे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण जरी ते भारतात दिसू शकणार नसले तरी, त्यासंबंधीचे इशारे भरपूर पसरून झाले आहेत. कुठल्या राशीच्या लोकांनी काय काय काळजी घ्यायला हवी याच्या याद्या प्रसृत झाल्या आहेत. ग्रहण ही केवळ एक खगोलशास्त्रीय घटना असल्याचे वैज्ञानिक कंठारव करून सांगत असले तरी अनेकांचे अंधश्रद्धाळू मन ते मान्य करायला आढेवेढे घेतच असते. (International Day Of Light 2022)
योगायोगाने उद्या ‘आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन’ (International Day Of Light) ही साजरा होतो आहे. या प्रकाश दिनाचे उद्दिष्ट आहे- प्रकाश आणि प्रकाशसंबंधित तंत्रज्ञान, प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाला कसे स्पर्श करते व जगाच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी ‘तंत्रज्ञान’ कसे केंद्रस्थानी बनून आहे याबद्दल जनसामान्यात जागृती निर्माण करणे.
आज 16 मे रोजी हा विरोधाभास आमच्या समोर उभा ठाकला आहे. जग एका बाजूला प्रकाशाचे स्त्रोत गाते आहे तर न दिसणाऱ्या चंद्रग्रहणाच्या तथाकथित धोक्यांचा बागुलबुवा समोर उभा करून काहीजण काळोखाची आरती गात आहेत. ‘चंद्रग्रहणामागचे शास्त्रीय सत्य समजून घ्या’, हे सांगण्याऐवजी, ‘गर्भवती स्त्रियांनी या काळात बाहेर पडू नये’ किंवा ‘या काळात झाडांना देखील स्पर्श करू नये’ अशा प्रकारच्या, काळाच्या ओघात चुकीच्या ठरलेल्या समजांना आजही ठणठणात करून सांगितले जात आहे.
16 मे 1960 या दिवशी, लेझर किरण वापरून जगातली पहिली शस्त्रक्रिया पार पाडली गेली. दळणवळण, आरोग्य (Health) आणि इतर अनेक क्षेत्रात विज्ञानाचे समाजाला काय फायदे होऊ शकतात व समाज कसा प्रगती करु शकतो याचे ‘लेझर’ हे उत्तम उदाहरण आहे. त्याशिवाय या दिवसाबद्दल हे समजून घेणे देखील आवश्यक आहे की ‘प्रकाश दिना’चे साजरे होणे हे केवळ लेझर किंवा विज्ञानासंबंधी नाही तर आपल्या जीवनात प्रकाश आणणाऱ्या कला-संस्कृती आणि इतर साऱ्या गोष्टी, जिथे प्रकाश अस्तित्वात आहे, साजरा करणारा हा दिन आहे.
योगायोगाने या प्रकाश दिनी ग्रहणांचे इंगित समजून घेण्याची संधी लाभली आहे. जसा प्रकाश अनेक गोष्टीची संबंधित असतो तसेच ग्रहणही चंद्राबरोबरच (Moon) इतर गोष्टींशीही संबंधित असते. आज आपल्यासमोर ग्रहण म्हणून उभ्या राहिलेल्या साऱ्याच गोष्टींवर, साऱ्याच अडथळ्यांवर मात करून, प्रकाशाला सामोरे जाणे आजच्या ‘आंतरराष्ट्रीय प्रकाश दिनी’ औचित्याचे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.