गोव्याच्या 'फुलराणी' चा फुलला फुलांचा व्यवसाय

गायत्रीच्या मते गोव्यात (Goa) फुलांच्या व्यवसायाला खूप वाव आहे.
Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

फुलांचो पाटलो विकून तू कितले जोडटलो? तिच्या कॉलेजमधल्या प्राचार्यांनी तिच्या वडलांना उद्देशून हे वाक्य म्हटले आणि या मानी मुलीने कॉलेज सोडण्याचे ठरवले. गोव्याच्या 'फुलकांर समाजात' अनेक जण स्वयंभू कलाकार आहेत. पण ‘कले’चे औपचारिक शिक्षण मात्र त्यांच्यापैकी कुणी सहसा घ्यायला जात नाहीत. त्याला अनेक कारणे आहेत.

पण गायत्री नाईक हिने ‘गोवा कॉलेज ऑफ फाईन आर्टस’ मध्ये प्रवेश घेतला होता. घरची परिस्थिती यथातथाच होती. चित्रकला शिक्षणाचा खर्च अफाट असतो. गायत्रीच्या आवाक्याबाहेर ते सारे होत चालले होते. तशी ती पार्ट-टाईम कामे करून काही पैसे मिळवित होतीच. पण समस्या तर होतीच. ती तिसऱ्या वर्षाला होती आणि वडलांना उद्देशून म्हटलेले प्राचार्यांचे ते वाक्य जणू उंटावरच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली. तिने कॉलेज सोडण्याचे ठरवले.

त्यानंतर ती आपल्या पारंपरिक व्यवसायातच उतरली आणि ‘गायी-3’ ( Gayi-3) या नावाने तिने आपल्या व्यवसायास औपचारिकपणे सुरुवात केली. सुरुवातीच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ती आता आपल्या व्यवसायात स्थिर बनली आहे. ज्यावेळी खऱ्या फुलांची आरास करून एखादा सोहळा वा धार्मिक कार्य करायचे असते त्यावेळी गायत्री हेच नाव अनेकांच्या डोळ्यांसमोर येते. गोमंतकीय पारंपरिक पध्दतीने मग फुलांची मांडणी होते आणि घरच्या स्त्रिया फुलांनी नटतात. बारसा, डोहाळजेवण, अशा समारंभात फुलांचे (Flowers) महत्त्व खूप असते. गायत्री अशा समारंभांना फुलांनी सजवते.

फुलांसंबंधी गायत्रीचा अभ्यास फार चांगला आहे हे तिच्या बोलण्यावरून लगेच लक्षात येते. स्थानिक फुले आणि बाजारात मिळणारी शोभिवंत फुले यांचा मेळ जरी ती आपल्या सजावटीत घालत असली तरी स्थानिक फुलांबद्दल तिला अधिक ममत्व आहे हे देखील जाणवते. फुलांची सजावट करताना ती ग्राहकांची इच्छा लक्षात घेऊन, त्या अनुसार आपल्या संकल्पना तयार करते. कुणाला फुलांनी सजवायचे असल्यास त्यांच्या कपड्यांचा जो रंग असेल त्यानुसार फुले वापरते. परदेशी फुलांना वास नसतो हे जरी खरे असले तरी गायत्री म्हणते, ती फुले रंगानी मात्र देखणी असतात.

त्यामुळे त्यांचा सजावटीत उपयोग करताना रंगाबरोबर जणू खेळण्याचा आनंद मिळतो. प्लास्टिकची फुले आपल्या रचनेसाठी वापरणे ती कटाक्षाने टाळते. बारशासारख्या सणांत मात्र पाळणा सजवताना कागदी फुले वापरणे आवश्‍यक असते कारण पाळण्यात बाळ झोपलेले असते. फुलांची ॲलर्जी किंवा त्या फुलांमध्ये असलेल्या सूक्ष्म कीटकांमुळे बाळाला अपाय होऊ शकतो. अशावेळी कागदी फुलांशिवाय पर्याय नसतो.

गायत्रीच्या मते गोव्यात (Goa) फुलांच्या व्यवसायाला खूप वाव आहे. गोव्यातली असंख्य देवळे, गोव्यात होणारे सण-समारंभ यामुळे फुलांना सतत मागणी असते. मात्र यासाठी अधिकाधिक जमीन फुलझाडांच्या लागवडीखाली यायला हवी, लोकांनी फुलझाडे लावायला हवीत असे तिला वाटते. गोव्याचा केवडा, बकुळ, सुरंगी, सोनचाफा, गुलाबी चाफा ही फुले एकेकाळी सारीकडे मिरवत होती.

पण आता बाजारात इतक्या प्रकारची फुले यायला लागली आहेत की त्यामुळे आपलीच ही फुले दुय्यम बनून गेली आहेत. गायत्री आपल्या ग्राहकांना फुलासंबंधी सल्लाही देते. कोणत्या मोसमात कुठली फुले मिळतात याचे तिला ज्ञान आहेच, परंतु एखाद्या प्रकारची फुले त्या काळात मिळणे शक्य नसल्यास फुलांचा दुसरा पर्याय काय असू शकतो याचीही कल्पना ती आपल्या ग्राहकांना देते.

गोव्याचा फुलकार समाज जाईच्या फुलांबरोबर वाढलेला आहे. म्हार्दोळच्या म्हाळसेवर त्यांची खूप श्रद्धा आहे. देवी म्हाळसा आपल्या पोटाला देते असे त्यांना वाटते. गायत्रीची पण तीच श्रध्दा आहे. 'जाईचे फूल’ हे फक्त कौटुंबिक उत्पन्नाचेच नव्हे तर राज्याच्याही आर्थिक स्रोतांचे माध्यम होऊ शकते असेही गायत्रीला ठामपणे वाटते. गोव्याचे हे फुल फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते अर्थकारणाला मदतही करू शकते असे गायत्री आत्मविश्‍वासाने सांगते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com