Ganesh Chaturthi 2021: कुडणेतील गणपतीचा गौरवमयी इतिहास

कृषीप्रदान गोव्यात एकेकाळी गणपती पूजनाची जी समृध्द परंपरा होती, त्याचाशी स्नेहबंध राखणाऱ्या मूर्ती ठिकठिकाणी आढळलेल्या आहेत.
Ganesh Chaturthi 2021: कुडणेतील गणपतीचा गौरवमयी इतिहास
Ganesh Chaturthi 2021: कुडणेतील गणपतीचा गौरवमयी इतिहासDainik Gomantak
Published on
Updated on

कृषीप्रदान गोव्यात एकेकाळी गणपती पूजनाची जी समृध्द परंपरा होती, त्याचाशी स्नेहबंध राखणाऱ्या मूर्ती ठिकठिकाणी आढळलेल्या आहेत. त्यात डिचोली तालुक्यातल्या कुडणे गावातल्या गणपतीच्या पाषाणी मूर्तींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. आज झपाट्याने कुडणेचा कायापालट होत असून, भौगोलिक परिवर्तन ही मोठ्या प्रमाणात उद्‍भवलेले आहे. आज या गावात जी स्थळनामे आहेत, शिल्पकलेची, वास्तुकलेची जी संचिते आढळलेली आहेत, त्याद्वारे कुडणेच्या गौरवमयी इतिहासाची प्रचिती येते. लोह खनिजाच्या उत्‍खननासाठी या गावातल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची काडीमात्र दखल न घेता ऱ्हास करण्यात आला आणि त्यामुळे एकेकाळी जैन, सूर्य, शिव, गणपती आदी संप्रदाय आपल्या पूजन परंपराचे पालन करून गुण्यागोविंदाने राहात होते. सत्तरीतील भूईपालच्या सह्याद्रीत उगम पावणारी कुडणे नदी जल वाहतुकीसाठी वापरली जात होती. आणि पश्‍चिम किनारपट्टीवरती व्यापार उद्योगाशी निगडित लोकांचा कुडणेशी संबंध होता. नाना जाती, जमाती, पंथ, धर्मांच्या लोकांचे इथे वास्तव्य होते. प्राचीन काळापासून हा गाव व्यापारी, यात्रेकरू यांना ज्ञात होता आणि त्यासाठी त्यांचे वास्‍तव्य कुडणेत होते. फकीरबाग, गुजीरवाडा, गुरववाडा आदी नावांनी परिचित असलेले कुडणतले वाडे आणि धुप्याचे टेंब, सतीचे भाट ही स्थळनामे कुडणेच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पैलूचे दर्शन घडवतात.

गणपती हा पार्वतीपुत्र असून, त्याच्या गजानन स्वरूपाला भारतीय उपखंडातल्या लोकमानसाने शेकडो वर्षांपासून आपलेसे केलेले आहे, त्याचा प्रत्यय कुडणे नदी किनारी वसलेल्या कृषीप्रदान गावात येतो. पार्वतीची उपासना गोव्यातल्या भूमिपुत्रांनी अज्ञात काळापासून सांतेर, भूमका म्हणून केलेली आणि तिच्या आवडत्या पुत्राची गजमुखी रूपात मूर्ती पहायला मिळते. कुडणे नदीच्या डाव्या काठावरती जो लोहगड आहे, त्याद्वारे इथल्या लोहखनिजसंपत्तीच्या श्रीमंताची कल्पना येते. त्यामुळे बौद्ध, जैन, स्कंद- कार्तिकेय, गुजराती, अरबी आदी धर्मपंथ, समुदायांची इथे वर्दळ होती. इसवी सनाच्या सहाव्या शतकातल्या ताम्रपटात कुंडीवाटक असा जो उल्लेख आढळतो, त्या ग्रामनामाचा कुडणेशी संबंध असल्याचा इतिहासकारांचा दावा आहे.

अंदाजे पाचव्या-सातव्या शतकाशी नाते सांगणाऱ्या ब्राह्मी लिपीतले जे शिलालेख हरवळे येथील शैलगृहात आढलेले आहे. त्यात ‘साम्बलूर वासी रवीः’ असा जो उल्‍लेख आढळतो, त्याचा अर्थ सांबळूर गावाचा रवी असल्याचे मत रूढ आहे. सांबळूर शिवापूर याचा संदर्भ काही इतिहास अभ्यासकांनी शिवोपासकाचे केंद्र असणाऱ्या कुडणेशी जोडलेला आहे. शेकडो वर्षाच्या इतिहासाचा वारसा सांगणारे इथले ग्रामदैवत शिवलिंग स्वरूपातला कुडणेश्‍वर असून, बदामी चालुक्यांचा शिल्पकलेशी साधर्म्य सांगणारी उमा-महेश यांची एकत्रित देखणी मूर्ती आढळलेली आहे. शिवचित्त पेरमाडी देव या गोवा कदंब राजाशी संबंधित आढळलेली सुवर्णनाणी, कुशाण शिल्पकलेची स्मृती जागवणारी सूर्यनारायणाची मूर्ती, जैन तीर्थंकराची भग्न मूर्ती आणि मंदिर कालभैरव, सांतेर, केळबाय, बेताळ, रवळनाथ, विठ्ठल आदी दैवतांची ऐतिहासिक संचिते कुडणेच्या गतवैभवाची साक्ष देतात. लोहखनिज उत्खनन सुरू होण्यापूर्वी कुडणेत बारामाही पेयजल आणि सिंचनाची विपूल उपलब्धता होती. कासारतळी, सतीभाटातली तळी साळकाची तळी, सकयली तळी इथल्या सुजलाम् तेवरती प्रकाशझोत टाकतात. फाळ, शेळ, कुणगो, खाजन ही नावे सुफलाम् तेची प्रचिती देतात. खोचरी, नवान्नसारख्या भातांची शेंद्री, मुटलोसारख्या नाचण्यांची, कुळीथ, पारवडासारख्या धान्यांची इथे पैदास व्हायची. भरती-ओहोटीद्वारे खारे पाणी घुसून शेती, बागायतीचे नुकसान होऊ नये म्हणून इथल्या आदिवासी गावड्यांनी चिखलाचे बांध घातले होते.

Ganesh Chaturthi 2021: कुडणेतील गणपतीचा गौरवमयी इतिहास
Goa Ganesh Chaturthi: गोव्यात घरोघरी बाप्पांचे आगमन

त्यामुळे शेताभाटात राबणाऱ्या कष्टकरी जाती-जमातींचे कुडणेत पूर्वापार वास्तव्य होते. आपण जे जमिनीत पेरतो, त्याला अंकुरण्याची किमया जी माती प्रदान करते, तिला सृजन आणि सर्जनाचा अंश मानून सांतेर म्हणून पूजणाऱ्या लोक मानसाला तिच्या प्रियपुत्राचे गणपती रूप भावले आणि त्यासाठी द्विहस्त आणि चनुर्हस्त स्वरूपात त्याच्या पाषाणीमूर्तीची स्थापना करण्याला प्राधान्य दिले. कुडणेत आज जरी गणपती देवताची स्वतंत्र मंदिरे नसली तरी इथे त्याच्या ज्या पाषाणी मूर्ती आढळलेल्या आहेत त्याद्वारे गणपतीच्या लोकमान्यतेची प्रचिती येते. गणपतीची गुप्त कालखंडातल्या शिल्पकलेशी नाते सांगणारी द्विहस्तमूर्ती आढळलेली असून या मूर्तीवरून गोव्यातल्या गणेश पूजनाच्या परंपरेच्या प्राचीन इतिहासाचे दर्शन घडते. सोंडद्वारे मोदकाचा आस्वाद घेताना गणपतीचे चित्रण केलेल्या या मूर्तीत त्याचे प्रिय वाहन असणारा उंदीर दाखवलेला नाही. मस्तकी मुकुट परिधान केलेला नाही. आणि त्यामुळे ही मूर्ती गोव्याच्या प्राचीन धर्म- संस्कृतीचे महत्त्वपूर्ण असे संचित मानण्यात येते. या मूर्तींशिवाय आणखीन एक छोटेखानी चतुर्हस्त गणपतीची मूर्ती कुडणेश्‍वराच्या दैवत परिवारात समाविष्ट होते. आज या दोन्ही मूर्ती एकल ठिकाणी प्रदर्शित केलेल्या असल्यातरी त्यांच्या निर्मितीच्या कालखंडात भिन्नता आहे. या दोन गणपतीच्या मूर्तीशिवाय आणखी एक प्रेक्षणीय मूर्ती २०१५ साली कुडणेतल्या डिंगणे येथील शैलेश हजारे याला खणताना सापडलेली आहे. खाण व्यवसायामुळे अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या डिंगणेला जुन्या काळी समृध्द इतिहासाची पार्श्‍वभूमी लाभली होती. इथे घनदाट जंगलाच्या ठिकाणी महादेवाचे मळ अशी जागा असून, तिथे शिवलिंग, नंदी आढळले होते. याच परिसरात विठ्ठल, रुक्मिणी, व्यंकटेश आणि चिंदबर यांची श्रध्दास्थाने

आहेत.

Ganesh Chaturthi 2021: कुडणेतील गणपतीचा गौरवमयी इतिहास
Goa Ganesh Festival: वैशिष्ट्यपूर्ण गोमंतकीय 'चवथ'

डिंगणे येथे आढळलेली गणपतीची चतुर्हस्त मूर्ती असून, एका हाती परशु, दुसऱ्या हाती धारदार शस्त्र आणि मोदकांचे पात्र धारण केलेले आहे. आसनावरती विराजमान झालेल्या मूर्तीच्या अंगावरती पवित्र असे यज्ञोपवित असून, नाग, हार यांनी अलंकृत केलेली आहे. गणपती हा ज्ञान, विद्या, बुध्दी याबरोबर कला, संस्कृती; अधिष्ठात्रादेव असल्याकारणाने त्याच्या पायी पैंजण दाखवलेले आहेत. गणपतीची ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे. मूर्तीचा एकंदर शिल्पकामावरून पुरातत्त्व अभ्यासकांच्या मते ती बाराव्या-तेराव्या शतकातल्या इतिहासाशी नाते सांगणारी आहे. कधीकाळी कुडणे गावातला डिंगणेचा परिसर मुख्य गावाच्या परंपरेला साजेल असा होता. परंतु कालांतराने तेथील ऐतिहासिक, सांस्कृतिक संचिते आलेल्या आपत्तीमुळे विस्मृतीत गेली. विसाव्या शतकात कुडणेतल्या खनिज उत्खननाच्या त्यावेळी झालेल्या विध्वंसात मूर्तीशास्त्राच्या विलोभनीय पैलूंचे दर्शन घडवणारीही ही कलाकृती लोकमानसाच्या स्मृती कप्प्यातून गायब झाली. कुडणेश्‍वराच्या मुख्य मंदिरात, बेताळ मंदिराच्या शेजारी आणि डिंगणे येथे असलेल्या गणपती मूर्तींतून कौडिण्यपूर, कुंदनपूर, कुंडीवाटक अशा नावांनी परिचित असलेल्या कुडणे गावातल्या भाविकांची लोकदेवता वरच्या श्रध्दा, भक्तीचा प्रत्यय येतो. गोवा मुक्तीनंतर लोहखनिजाच्या उत्खनन, वाहतूक आणि निर्यातीच्या उद्योगाने कुडणेची कृषीप्रधान अशी असलेली मूळ ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु असे असताना कृषी संस्कृतीचा अधिष्ठाता देव असणाऱ्या गणपतीचे महात्म्य मात्र कायम टिकून राहिले. खाण व्यवसायाच्या बेकायदेशीरपणामुळे सध्या खनिज उत्खननावरती बंदी आलेली आहे. आणि त्यामुळे जल, जंगल, जमीन, जैविकसंपदा आणि जनजीवनाची आपल्या अस्तित्वासाठी चालू असलेली धडपड गणपतीच्या कृपेमुळे जणू पाहायला मिळते.

राजेंद्र केरकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com