प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. प्रत्येकाच्या आवडीनिवडी व काम करण्याची पद्धत वेगळी असते हे आपण आम आदमी बहुतेकवेळा विसरतो. युरी आलेमाव यांनी आमदार म्हणून काल आपला तिसरा वाढदिवस साजरा केला. आमदार युरींचे तिन्ही वाढदिवस सुके सुके गेले असे त्यांचे समर्थक सांगतात. युरी आपल्या वाढदिनी घरी नसतात ते परिवारासह एकांतात वाढदिन साजरा करतात. मात्र, युरीचे वडील ज्योकीम आलेमाव आमदार व मंत्री असताना आपला वाढदिवस जंगी साजरा करायचे. ज्योकीम यांच्या वाढदिनी कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर सगळ्या मतदारांना जंगी मेजवानी असायची. वर्तमानपत्रात खास पुरवण्या छापल्या जायच्या. मात्र, युरी तसे काही करत नाहीत. ‘लॉ प्रोफाईल इज की ऑफ माय सक्सेस’ असे युरी मानतात. मात्र, कार्यकर्ते म्हणतात ज्योकीम आलेमावच बरे होते. ∙∙∙
काँग्रेसमधून भाजप पक्षात प्रवेश करताना आमदार दिगंबर कामत यांनी ‘देवा’शी बोलून निर्णय घेतला होता असे स्वतः सांगितले. त्यानंतर सरकारमधील घटक पक्षाचे आमदार जीत आरोलकर यांनी ‘देव’ आपल्या स्वप्नात येतो असे विधानसभेत सांगितले होते. सरकारकडे देवाशी बोलणारे आमदार असताना सरकारने उगाच पोलिसांना ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात मुख्य सूत्रधार पकडण्याची जबाबदारी दिली आहे. खोडकर स्वरूपाची ही चर्चा असली तरी या चर्चेमुळे लोकांचे मनोरंजन होत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दोन्ही आमदारांना बोलावून एकदा काय तो निकाल लावावा आणि हे प्रकरण संपवावे अशी चर्चा रंगत आहे. ∙∙∙
गोव्यात परवा पाचजणांना बोगस शाळा व पदवी शैक्षणिक प्रमाणपत्रे विकण्याच्या प्रकरणात अटक झाली. नेमके त्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेस भवनात आयोजित ‘कॅश फॉर जॉब’ व ‘बोगस डिग्री’ विषयावरील पत्रकार परिषदेला दक्षिण गोव्याचे माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची उपस्थिती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. ऐंशीच्या दशकात गोव्यात गाजलेल्या ‘मार्क स्कॅंडल’चे प्रणेते तत्कालीन काँग्रेस सरकारचे शिक्षणमंत्री सार्दिनबाबच होते हे कदाचित त्यांच्या लक्षातही नसावे. ∙∙∙
फोंड्यात नुकत्याच झालेल्या ‘उटा’च्या द्विदशकपूर्ती कार्यक्रमात कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सभापती रमेश तवडकर यांच्यावर तोफ डागली होती. त्यांनी केलेली टीका तवडकर यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी पदाचा त्याग करण्याचा पक्षाला इशारा दिला. या प्रकरणावरून आदिवासी समाजातील दोन्ही नेत्यांचा वाद पुन्हा उफाळून समाजासमोर आला. भाजपचे वरिष्ठ नेते या दोन्ही नेत्यांतील वाद मिटवणार असल्याचे सांगत होते, पण तेही अजून मुहूर्त शोधताहेत. दोन्ही नेत्यांच्या वादामुळे आदिवासी समाजात उभी फूट पडली असल्याचे नाकारता येणार नाही. पणजीत ‘उटा’च्यावतीने आयोजित बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमात मंत्री गावडे यांनी पुन्हा एकदा आदिवासी समाजातील नेत्यांवर (कोणाचे नाव न घेता) तोफ डागली. त्यांनी सत्तेला लागलेले मुंगळे आहेत, असा उल्लेख केला. त्यांचा हा राग कोणावर होता किंवा आहे, हे काही लपून राहिलेले नाही. ‘उटा’च्या नेत्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गावडे गोळ्या झाडत आहेत. प्रकाश वेळीप मात्र तवडकर व गावडे यांना एकत्र आणण्याची भाषा करीत आहेत, यासाठी वेळीप यांनी केपे अर्बनच्या कार्यक्रमाचा मुहूर्त शोधला आहे अशी चर्चा आहे. ∙∙∙
गोव्यात उद्भवलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात महिलांच्या मोठ्या प्रमाणावरील सहभागामुळे महिला सक्षमीकरणाची सरकारची संकल्पना यशस्वी झाल्याची चर्चा आहे. एकीकडे, सरकार महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवत असताना दुसरीकडे काही महिलांनी स्वतःच्या वेगळ्या योजना राबविल्या. या प्रकरणात एका महिलेचे नाव गुप्त चर्चेत घेण्यात येते. या महिलेला या संपूर्ण प्रकरणाची मास्टरमाईंड मानले जात आहे. विरोधी पक्षांनी या महिलेवर गंभीर आरोप देखील काही महिन्यांपूर्वी केले होते. मात्र, पोलिस अद्याप या महिलेविरुद्ध कोणतीही कारवाई करू शकलेले नाहीत. यामुळे विरोधी पक्ष विशेष पथक आणि न्यायालयीन समितीची मागणी करत असावे अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. ∙∙∙
आपली जात आपल्या खिशात आहे असा समज काही राजकीय नेते करून घेतात. मात्र, आपले जातभाई अनाडी नाहीत त्यांना खरे खोटे समजते कोण स्वार्थी व कोण समाजासाठी हे समाजबांधवांना आता कळायला लागले हे नेत्यांना कळत नाही हेच खरे दुर्दैव. एसटी समाजाचे दोन बडे नेते गोविंद गावडे व रमेश तवडकर यांच्यात जो संघर्ष व लढाई सुरू झाली आहे, त्यातून समाजाचा फायदा नव्हे, तर नुकसानच होत असल्याची प्रतिक्रिया एसटी समाजाचे युवक व्यक्त करतात. या लढाईत प्रकाश वेळीप यांच्यासारखे बुजुर्ग नेते शिष्टाई करण्याऐवजी त्यात आणखी फोडणी घालतात म्हणून एसटी युवक संतप्त झाला आहे. एका तरुण नेत्यांनी आपला इगो व मतभेद बाजूला सारून समाजाच्या उद्धाराचा विचार करावा अन्यथा समाजालाच वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा आता एसटीचा शिक्षित युवक समाज माध्यमावर द्यायला लागला आहे. आता पाहुया गोविंद व रमेश काय विचार करतात. ∙∙∙
मंत्री गोविंद गावडे यांचा नाद आपण केव्हाच सोडला असे जाहीरपणे सभापती रमेश तवडकर यांनी म्हटले आहे. असे असतानाही बिरसा मुंडा सांस्कृतिक यात्रेत तवडकर यांच्या समक्ष सहभागी होण्याची वेळ गोविंद गावडे यांच्यावर आली. बलराम युवक संघ काणकोण क्षेत्रापुरती अशी यात्रा दरवर्षी काढत असे. यंदा राज्यव्यापी यात्रेची जबाबदारी सरकारने स्वीकारली. त्यातही ती यात्रा मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्यातर्फे काढण्यात आली. सभापती त्याचे प्रत्यक्षात संयोजन करत असले तरी तो खऱ्या अर्थाने सरकारी कार्यक्रम ठरतो. त्यामुळे प्रियोळ मतदारसंघात ती यात्रा आल्यानंतर त्यात सहभागी न होणे गावडे यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महागात पडणारे ठरले असते. त्यामुळे मुकाट्याने त्यात सहभागी होण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अखेर ते यात्रेत सहभागी झाले. सर्वांबरोबर देवदर्शन घेतले आणि म्हार्दोळपर्यंत दुचाकीवरून प्रवासही केला. नाइलाज कसा असतो याचे दर्शन यातून घडल्याची चर्चा मात्र सुरू झाली आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.