Goa Tourism: नवीन शॅक्‍स धोरण पर्यटनाला मारक; व्यावसायिकांचा दावा

70च्‍या दशकापासून शॅक्‍स बनलेय गोवा पर्यटनाचे अविभाज्‍य अंग
Goa Shack Policy
Goa Shack PolicyDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्‍याच्‍या पर्यटन मोसमाला आलेला जोर आणि पर्यटकांच्‍या गर्दीत त्‍यांचे आदरातिथ्‍य करणारे किनाऱ्यांवरील लहान-लहान शॅक्‍स ही आजवरच्‍या गोव्‍याच्‍या पर्यटनाची एक न पुसता येण्‍यासारखी ओळख.

मात्र यंदापासून ही ओळख पुसून तर जाणार नाही ना, अशी भीती खुद्द पारंपरिक शॅकव्‍यावसायिकांमध्‍ये निर्माण झालेली आहे. गोवा पर्यटन खात्‍याने येऊ घातलेले नवीन शॅक्‍स धोरण या व्‍यवसायाला मारक ठरण्याची शक्‍यता आहे.

या पारंपरिक व्‍यावसायिकांना देशोधडीला लावण्‍याचे सरकारचे हे कारस्‍थान, अशा प्रतिक्रिया जागतिक पर्यटनदिनाच्‍या पूर्वसंध्‍येला शॅक्‍सव्‍यावसायिकांकडून ऐकू येऊ लागल्‍या आहेत.

शॅक्‍स म्‍हणजे खरे तर झोपडीवजा दुकान, जिथे पर्यटकांना पारंपरिक खाद्यपदार्थ उपलब्‍ध असतात. गोव्‍यात समुद्रकिनाऱ्यांवर शॅक्‍स उभारण्‍याची परंपरा अगदी मुक्तिकाळाच्‍या पूर्वीपासूनची आहे.

मात्र सत्तरीच्‍या सुरूवातीला गोव्‍यात जे हिप्‍पी आले, त्‍यांनी या शॅक्‍सना उचलून धरल्‍याने त्‍यानंतर ही खानपान आस्‍थापने राज्‍याच्‍या पर्यटनाचे एक वेगळेच आकर्षण ठरले.

Goa Shack Policy
CM Pramod Sawant: राज्याला टी. बी. कुन्हांसारख्या देशभक्ताची गरज, मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पर्यटन खात्‍याने जे नवे धोरण जाहीर केले आहे, त्‍यात शॅक्‍स उभारण्‍यासाठी यापूर्वी जी ५० हजार रुपये फी घेतली जात होती ती आता २ लाख रुपयांवर नेली आहे. शिवाय शॅक्‍समध्‍ये पोटमाळा बांधण्‍यास मनाई केली आहे.

शॅक्‍स उभारण्‍यासाठी स्‍टीलच्‍या खांबांचा वापर न करता बांबू किंवा इतर लाकडी सामानाचा वापर करावा अशी अट घातली आहे. तर, ६० वर्षांवरील व्‍यक्‍तींना या व्‍यवसायातून बाहेर ठेवण्‍याची अट यापूर्वीच घातली होती. मात्र शॅक्‍सव्‍यावसायिकांनी आवाज उठविल्‍यानंतर ती मागे घेण्‍यात आली.

कुठल्‍याही शॅक्‍सव्‍यावसायिकाने शॅक्‍स चालविण्‍याचा परवाना घेतला आणि मध्‍येच त्‍याचा मृत्‍यू झाला तर हा व्‍यवसाय त्‍यांच्‍या नातेवाईकांना देण्‍यासही या नव्‍या धोरणात प्रतिबंध आहे. या सर्व अटी जाचक असल्‍याचे मत शॅक्‍समालक कल्‍याण संघटनेचे अध्‍यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी व्‍यक्‍त केले.

ते म्‍हणाले, एक चांगला शॅक्‍स उभारण्‍यासाठी किमान २५ लाख रुपये खर्च येतो. एकदा या व्‍यवसायासाठी परवाना घेतला तर तो तीन वर्षांपर्यंत वैध असतो. मात्र त्‍यानंतर हा व्‍यवसाय चालू ठेवण्‍यास त्‍यांना मिळणारच की नाही याची शाश्‍‍वती या नव्‍या धोरणात नाही.

त्‍यामुळे शॅक्‍स उभारण्‍यावर २५ लाख रुपये खर्च केले आणि तीन वर्षांनंतर त्‍या व्‍यावसायिकाला शॅक्‍सची लॉटरी लागली नाही तर त्‍याची ही गुंतवणूक व्‍यर्थ जाऊ शकते.

तीन वर्षांत २५ लाखांचा खर्च कसाच भरुन येऊ शकत नाही, असेही ते म्‍हणाले. म्‍हणूनच आमचा या नव्‍या धोरणाला विरोध आहे, असे शॅक्‍सव्‍यावसायिकांनी सांगितले.

शॅक्‍स आणि हिप्‍पी; कोलवा, कळंगुट, मिरामारला होती पसंती

जगरहाटीला फारसे न मानणारा आणि आपल्‍याच धुंदीत मस्‍त रहाणारा हिप्‍पी हा समूह १९६०चे दशक संपता संपता गोव्‍यात आला आणि याच हिप्‍पींनी गोव्‍याच्‍या समुद्रकिनाऱ्यांवर जे झोपडीवजा शॅक्‍स होते, ते डोक्‍यावर घेतले.

त्‍यावेळी कळंगुट, मिरामार, कोलवा यासारख्‍या काही नावाजलेल्‍याच किनाऱ्यांवर असे शॅक्‍स असायचे.

गोवा मुक्तिपूर्व काळात पोर्तुगीज अधिकारी आणि सैनिक तेथे आपली सायंकाळ घालविण्‍यासाठी यायचे. हिप्‍पी गोव्‍यात आले ते सर्वप्रथम कळंगुट आणि कांदोळी या किनारपट्टीवर पसरले.

त्‍यावेळी हे शॅक्‍स त्‍यांचे जॉईंट्‌स होते. पूर्वी हिप्‍पींचे जॉईंट्‌स‌ असलेले हे शॅक्‍स १९७०चे दशक संपता-संपता इतर देश-विदेशी पर्यटकांच्‍याही गळ्‍यातले ताईत बनले, अशी माहिती शॅक्‍समालक कल्‍याण समितीचे अध्‍यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी दिली.

या शॅक्‍सवर मिळणारे खाद्यपदार्थ आणि सी-फूड यासाठी पर्यटक आवर्जून तेथे यायचे. सुरूवातीला गोव्‍यातील किनारपट्टीवरील शॅक्‍सचे वाटप स्‍थानिक पंचायतींतर्फे केले जायचे. नंतर पर्यटन खात्‍याने या व्‍यवसायाचे नियंत्रण आपल्‍या हाती घेतले अशी माहिती कार्दोझ यांनी दिली.

"शॅक्‍सव्‍यवसाय हा गोव्‍यातील पारंपरिक व्‍यवसायांपैकी एक आहे. मात्र आता गोवा सरकारला एक तर हा व्‍यवसाय नामशेष करायचा आहे किंवा त्‍यात राज्‍याबाहेरच्‍या व्‍यावसायिकांना घुसवायचे आहे. त्‍यामुळेच नव्‍या शॅक्‍स धोरणात एवढ्या जाचक अटी घातल्‍या आहेत की पारंपरिक शॅक्‍सव्‍यावसायिकांना हा व्‍यवसाय पुढे चालविणे शक्‍यच होणार नाही."

- क्रुझ कार्दोझ, अध्‍यक्ष, शॅक्‍समालक कल्‍याण संघटना

Goa Shack Policy
Canacona Fort : तेरेखोल किल्ल्यावर आल्फ्रेड आफान्सोंचा पुतळा उभारावा ; पैंगीण पंचायतीची मागणी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com