राज वैद्य
शंभर वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन (International Pharmaceutical Federation|FIP), जगभरातील सर्व औषधालय व्यावसायिकांची आघाडीची संस्था आहे. जगभरातील सर्व राष्ट्रीय फार्मसी संस्था या संस्थेच्या सदस्य आहेत. जगभरातील ४० लाखांहून अधिक फार्मासिस्टचे प्रतिनिधित्व करणारी ही संस्था, जागतिक आरोग्य संघटनेच्या हातात हात घालून रुग्णांचे आरोग्य आणि सुरक्षितता यांच्या कल्याणासाठी विविध आरोग्यविषयक धोरणे ठरवते.
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (Indian Pharmaceutical Association|IPA) ही भारतातील फार्मसी व्यावसायिकांची सर्वांत मोठी संस्था आहे आणि एफआयपीची सदस्य आहे. एफआयपी दरवर्षी दि. २५ सप्टेंबर रोजी ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ आणि जागतिक फार्मासिस्ट सप्ताहाचे आयोजन करते. या वर्षीची थीम ‘फार्मसिस्ट : मीटिंग ग्लोबल हेल्थ नीड्स’ आहे.
जगभरातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी औषधविक्रेत्यांनी दिलेल्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे ‘वर्ल्ड फार्मसिस्ट डे’! औषधालय, फार्मासिस्ट, त्यांची भूमिका आणि त्यांचे योगदान याविषयी जागरुकता निर्माण करण्याचा हा दिवस. जागतिक पातळीवर रुग्ण आणि सामान्य व्यक्तींचे आरोग्य राखण्याची त्यांची क्षमता, यांसोबतच आरोग्यसेवा क्षेत्रात असलेले सर्व अधिकारी, राजकारणी, धोरणकर्ते आणि नेते यांनाही अधोरेखित करणारा हा दिवस.
सर्वांचे आरोग्य चांगले राखण्याच्या प्रयत्नांत, फार्मासिस्ट (Pharmacist) हा आरोग्याच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा दुवा आहे. आजाराने ग्रस्त असणारे रुग्ण आणि त्रस्त असलेले नातेवाईक यांना समजून घेत शांतपणे आपली सेवा देणारे फार्मसिस्ट आरोग्य सेवा प्रणालीचे अविभाज्य भाग आहेत.
जगभरात मौल्यवान मानव संसाधन विकासाचे महान कार्य औषधशास्त्र शिकवणारे ज्ञाते करतात. औषधे, लस आणि अन्य आवश्यक वस्तू तयार करणे आणि जगभरात वाजवी दरात उपलब्ध करून देणे यासाठी औषधक्षेत्रातील शास्त्रज्ञ संशोधन आणि विकासात आपले योगदान देतात.
‘प्रॅक्टिसिंग फार्मासिस्ट’ यांचा रुग्णांशी थेट संबंध येतो. आवश्यक औषधे उपलब्ध करणे आणि त्यांचा योग्य पद्धतीने वापर होईल, याची काळजी घेणे ही फार्मसिस्टची जबाबदारी आहे. रुग्णांच्या प्राथमिक आरोग्यविषयक गरजांसाठी, सल्ला घेण्यासाठी सामान्य लोक सहसा फार्मासिस्टकडे पहिल्यांदा संपर्क साधतात.
रोगाचा प्रादुर्भाव, प्रतिबंध होण्यात फार्मसिस्टचा मोठा हात असतो. आरोग्य प्रचार, लसीकरण, आरोग्य तपासणी सेवा उदाहरणार्थ रक्तदाब, रक्त ग्लुकोज, बीएमआय इत्यादी सेवा देणे, त्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि रुग्णांना शिक्षित करणे हे कार्यही फार्मसिस्ट करतात. विविध सार्वजनिक आरोग्य मोहिमा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कामही ते करतात. कोविड-१९ (Covid 19) महामारीच्या काळात औषधे उपलब्ध करणे, वितरण, लसीकरण, सल्ला देणे आणि समुपदेशन करणे यात फार्मासिस्ट आघाडीवर होते.
प्रभावी आरोग्यसेवा देण्यासाठी भारतातील फार्मासिस्ट सतत अद्ययावत होत आहेत, त्यांच्या कौशल्यात कमालीची सुधारणा होत आहे. समाजाने त्यांचे कार्य, योगदान, समस्या समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे. चांगल्या, निरामय भविष्यासाठी त्यांना योग्य पद्धतीने समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
एफआयपी आणि आयपीए या दोन्ही संस्था भारतातील फार्मासिस्टना लसीकरणासाठी (Immunization) सक्षम बनविण्यावर एकत्रितपणे काम करत आहेत आणि त्यासाठी फार्मासिस्टच्या प्रशिक्षणाची सुरुवात झाली आहे. औषध वितरीत करताना फार्मासिस्ट नेहमी उपस्थित राहावेत, नोंदणीकृत फार्मासिस्टच्या देखरेखीखाली प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषधे वितरीत केली जावीत यासाठी असलेल्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी होतेय की नाही, हे पाहण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कायम दक्ष राहण्याची गरज आहे.
औषध हे दुधारी शस्त्र आहे. योग्य वापर झाल्यास फायदेशीर ठरते आणि बेजबाबदारपणे वापरल्यास धोकादायक. काही प्रतिजैवकांचा अतिवापर झाल्यामुळे ती निकामी ठरत आहेत. औषध किती प्रमाणात, किती काळासाठी घ्यावे याचा योग्य निर्णय डॉक्टर रुग्णाचे निदान करून ठरवत असतात. त्यामुळे प्रिस्क्रिप्शनवर नेलेली औषधे दिलेल्या कालावधीत संपली की, डॉक्टरांना भेटणेच योग्य ठरते.
औषधाची मात्रा, कालावधी ते पुन्हा ठरवतील त्याप्रमाणे प्रिस्क्रिप्शनही देतील; ते घेऊन फार्मसीत जाणे केव्हाही चांगले. स्वत:च औषध घेणे किंवा देण्याचा आग्रह धरणे आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे, लोकांनीही औषध खरेदी करत असताना सोबत नेहमी प्रिस्क्रिप्शन घेऊन येणे अत्यंत गरजेचे आहे. प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देण्याचा दबाव फार्मसिस्टवर आणू नये. तसे करणे घातक ठरू शकते.
चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी जसा फार्मासिस्ट आपली भूमिका चोख बजावतो, तशीच चांगल्या आरोग्यसवयी जाणीवपूर्वक लावून घेण्याची भूमिका सर्वांनी चोखपणे निभावणे तितकेच आवश्यक आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.