World Disabled Day 2024: माेस्‍ट एबल्‍ड 'श्रद्धा'! ‘मल्‍टिपल स्‍क्‍लेराेसिस’शी लढा देणाऱ्या युवा कोकणी साहित्यिकेची प्रेरणादायी वाटचाल

Shraddha Garad Goa: श्रद्धा गरड ही आता पुन्‍हा एकदा चर्चेत आली आहे, ती तिच्‍या ‘माणकुलीं आनी शिस्‍त’ या मथळ्‍याखाली प्रसिद्ध झालेल्‍या तीन पुस्‍तकांमुळे. मूळ कोकणी पुस्‍तकाबरोबर या पुस्‍तकाचे मल्‍याळम भाषेत अनुवाद आणि हेच पुस्‍तक ब्रेल लिपीत आल्‍यामुळे.
World Disabled Day 2024 | Shraddha Garad Goa
World Disabled Day 2024 | Shraddha Garad GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: २०१४ चे हरमल येथे भरलेले ‘कोकणी युवा संमेलन’ एका वेगळ्याच कारणामुळे अगदी भारून गेले होते आणि त्‍याला कारणीभूत होती युवा कोकणी साहित्यिक श्रद्धा गरड.

मल्‍टिपल स्‍क्‍लेराेसिस या असाध्‍य अशा दुखण्‍यामुळे तिच्या खांद्याखालील सर्व भाग लुळा पडला होता. त्‍यामुळे तिला चालताही येत नव्‍हते; पण अशाही परिस्‍थितीत रुग्‍णवाहिकेतून ती मडगावहून हरमल येथे आपल्‍या पहिल्‍या पुस्‍तकाच्‍या प्रकाशनासाठी आली होती. त्‍यावेळी तिने या संमेलनातील विद्यार्थ्यांना एक मंत्र दिला आणि तो म्‍हणजे, कितीही अडचणी येवाेत; पण स्‍वत:वरील विश्‍वास ढळू देऊ नका. त्‍यावेळी ती म्‍हणाली हाेती, मी जरी सध्‍या दिव्यांग झाले असले तरी माझ्‍या प्रतिभेला मी कधीच अपंग होऊ दिले नाही.

श्रद्धा गरड ही आता पुन्‍हा एकदा चर्चेत आली आहे, ती तिच्‍या ‘माणकुलीं आनी शिस्‍त’ या मथळ्‍याखाली प्रसिद्ध झालेल्‍या तीन पुस्‍तकांमुळे. मूळ कोकणी पुस्‍तकाबरोबर या पुस्‍तकाचे मल्‍याळम भाषेत अनुवाद आणि हेच पुस्‍तक ब्रेल लिपीत आल्‍यामुळे. बालदिनानिमित्त राजभवनवर झालेल्‍या प्रकाशन सोहळ्यात श्रद्धाचे ब्रेल लिपीतील या पुस्‍तकाचे वाचन केपेतील गजानन वेळीप या दृष्‍टीहिन मुलाने केले. हा अनुभव कथन करताना श्रद्धा म्‍हणते, हा माझ्‍यासाठी एक आनंदाचा क्षण होता. माझे जे स्‍वप्‍न होते ते माझ्‍यासमोर साकार होताना मी स्‍वत:च्‍या डोळ्‍याने पाहिले. हा माझ्‍यासाठी एक विलक्षण अनुभव होता.

खरे तर श्रद्धा ही तशी ऑलराऊंडर. महाविद्यालयात शिकत असतानाच ती कविता करायची. त्‍यानंतर दूरदर्शनवर ती बातम्‍या सांगू लागली. आणखी काही टीव्‍ही माध्‍यमांसाठी ती कार्यक्रम करायची. करंजाळे येथील एका शाळेत ती शिकवीतही होती; पण एक दिवस काय झाले कुणास ठाऊक, तिला चालण्‍याचा त्रास होऊ लागला. आणखी एक दिवस तर असा आला की, रात्रीच्‍यावेळी झाेपलेली श्रद्धा सकाळी उठू लागली तर तिला उठताच येईना. तिचे सर्व शरीर बधिर झाले होते. तिला तातडीने इस्‍पितळात हलविण्‍यात आले. डॉक्‍टरांनी निदान केले की तिला ‘मल्‍टिपल स्‍क्‍लेराेसिस’ हे मज्‍जातंतूचे असाध्‍य असे दुखणे जडले आहे. ज्‍यावर काहीच उपाय नाही, फक्‍त हे दुखणे कसे वाढायला द्यायचे नाही एवढाच काय तो उपाय.

हे दुखणे वाढल्‍याने श्रद्धा ज्‍या शाळेत शिकवीत होती तेथील नोकरी तिला सोडावी लागली. दूरदर्शनवरही तिचे जाणे बंद झाले. तरीही तिने आपला धीर खचू न देता वृत्तवाहिनीत बैठे काम करण्‍याचे स्वीकारले; पण श्रद्धा म्‍हणते, फक्‍त दोनच महिन्‍यांनी माझी प्रकृती एवढी खालावली की, मला तेही काम करता येणे शक्‍य नव्‍हते. शेवटी अक्षरश: मी खाटेवर खिळून पडले. तो काळ श्रद्धासाठी अतिशय खडतर असा होता.

‘डिझेबल्‍ड’ नाही ‘माेस्‍ट एबल्‍ड’

‘बिंब’ या मासिकासाठी श्रद्धाने फोनवरून महिला साहित्यिकांच्‍या मुलाखती घेण्‍यास सुरुवात केली. त्‍यानंतर ‘अस्‍तुरगाथा’ हे पुस्‍तक बिंब प्रकाशनने प्रकाशित केले आहे आणि आता प्रकाशित झालेली ही तीन नवीन पुस्‍तके जी संजना प्रकाशनने प्रकाशित केलेली आहेत. आपले पुस्‍तक ब्रेल लिपीत प्रकाशित व्‍हावे, अशी श्रद्धाची इच्‍छा होती. ही इच्‍छा कोकणी साहित्‍यिक सुनेत्रा जोग यांच्‍यामुळे पूर्ण होऊ शकली, असे ती म्‍हणते. अशी वाटचाल असलेल्‍या श्रद्धाला कुणी ‘डिझेबल्‍ड’ असे म्‍हणू शकतील का, की तिला ‘माेस्‍ट एबल्‍ड’ असे म्‍हणणार, तुम्‍हीच ठरवा.

कवितासंग्रह, पुस्‍तकांचे लेखन

श्रद्धाने पूर्वी ज्‍या कविता रचल्‍या होत्‍या त्‍या केवळ एका बोटाने मोबाईलवर टाईप करून ठेवल्‍या. त्‍याचवेळी तिचा संपर्क आणखी एक युवा साहित्‍यिक नमन धावस्‍कर यांच्‍याशी आला. नमनच्‍या माध्‍यमातून कोकणी अकादमीने श्रद्धाचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध केला, त्‍या कवितासंग्रहाचे नाव होते ‘काव्‍य परमळ’. पुढे या संग्रहाला केंद्रीय साहित्‍य अकादमीचा युवा साहित्यिकांसाठी असलेला पुरस्‍कारही प्राप्‍त झाला. त्‍यानंतर राजहंसच्‍या आग्रहावरून तिने लहान मुलांसाठी एक पुस्‍तक लिहिले, त्‍या पुस्‍तकाचे नाव होते ‘क्रिकेटमय मंथन’.

World Disabled Day 2024 | Shraddha Garad Goa
Indian Navy Goa: 'त्या' अपघातात नौदलाच्या पाणबुडीचे 10 कोटीचे नुकसान; 2 मृत्यूप्रकरणी मासेमारी बोटीवरील कॅप्टनला अटक

...आणि साक्षात्‍कार झाला

श्रद्धा म्‍हणते, त्‍यावेळी निराशेने मी ग्रासले होते. माझ्‍या मनात आत्‍महत्‍या करण्‍याचे विचार यायचे; पण आत्‍महत्‍या तरी कशी करणार, कारण ती करण्‍यासाठी उठता तर आले पाहिजे ना. पण त्‍यावेळी तिला एक वृद्ध समुपदेशक मिळाली. तिने श्रद्धाला धीर देताना, तू इस्‍कॉन संस्‍थेने प्रकाशित केलेली ‘भगवद्‌गीता’ वाच. तुझ्‍या प्रश्‍नांची सर्व उत्तरे तुला आपाेआप सापडतील.

खरे तर श्रद्धाला उठून बसता येत नव्‍हते आणि पुस्‍तक वाचायचे म्‍हणजे, पुस्‍तक हातातही धरायला येत नव्‍हते. त्‍याही परिस्‍थितीत तिने या पुस्‍तकातील गीतेचे १८ अध्‍याय वाचले आणि हे अध्‍याय तिच्‍यासाठी जीवनाचे नवीन सार घेऊन येणारे होते. त्‍यावेळी तिला साक्षात्‍कार झाला की, ज्‍याने तिला या विश्‍वात आणले तोच तिची काळजी घेणार. त्‍यानंतर एक नवी उमेद घेऊन श्रद्धा मनाने खंबीर उभी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com