Mandovi Bridge: पणजी - पर्वरीला जोडणारा मांडवी पूल 38 वर्षापूर्वी का कोसळला, रेगे आयोगाचा अहवाल काय?

Mandovi Bridge Collapsed: गेल्या ३८ वर्षांत पूल बांधण्याच्या विज्ञानात क्रांतिकारी बदल झाला आहे. पण गोव्याने मात्र नेहमीप्रमाणे यातून कोणताही धडा घेतला नाही.
Picture Of Mandovi Bridge Collapsed in 1986
Picture Of Mandovi Bridge Collapsed in 1986Dainik Gomantak

1971 साली लोकार्पण केलेल्या मांडवी पुलाला जलसमाधी मिळाल्यास आज ३८ वर्षे होत आहेत. त्याची चौकशी करण्यास नेमलेल्या रेगे आयोगाचा अहवाल गोवा सरकारने दाबला. त्याची एकही प्रत आजमितीस उपलब्ध नाही. हे एक खूप मोठे षड्यंत्र आहे. त्यावर प्रकाशझोत टाकणारा हा विशेष लेख...

रशियन डिझाइन आणि फ्रेंच फ्रेसिनेट स्ट्रक्चरल कन्स्ट्रक्शन तंत्रज्ञानासह बांधलेल्या ‘प्री-स्ट्रेसड् कॉंक्रीट’ पुलांच्या इतिहासातील ५ जुलै १९८६ ही महत्त्वाची तारीख आहे. जुन्या मांडवी पुलापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कालापूर येथील बोंदीर येथील आमचे शंभर वर्षे जुने घर आहे.

मातीच्या भिंतींचे हे घर त्यादिवशी भूकंप झाल्यागत मिनिटभर हादरले. पुलाचे दोन गाळे (स्पॅन) कोसळल्यामुळे झालेला आवाज आम्हालाही स्पष्टपणे ऐकू आला. गाळ्यांच्या कोसळण्याचा कंप आमच्यासह घराच्या भिंतींनाही जाणवला. ‘ऐकलेस का?’, मी आईला विचारले. ‘हो, गावात एखादा मोठा वटवृक्ष उन्मळला असेल!’, ती बिचारी भाबडेपणाने उत्तरली.

दि. ५ जुलै १९८६ रोजी कोसळलेल्या ‘मांडवी’ किंवा ‘नेहरू पुला’च्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त लिहिलेला हा लेख म्हणजे आपल्याकडे बांधकाम तंत्राविषयी नसलेल्या गांभीर्याचे केलेले पुण्यस्मरण आहे.

केवळ गोव्यासाठीच नव्हे तर भारतासाठीही ही एक मोठी ‘अभियांत्रिक आपत्ती’ होती. गेल्या ३८ वर्षांत पूल बांधण्याच्या विज्ञानात क्रांतिकारी बदल झाला आहे. पण गोव्याने मात्र नेहमीप्रमाणे यातून कोणताही धडा घेतला नाही. नाही म्हणायला इंग्रजीतल्या ‘टी’ आकाराचे प्रक्षेपी (टी शेप्ड कॅन्टिलीव्हर) पूल ही संरचना त्यागून त्या जागी तुळईच्या आधारावर स्थिरावणारी ‘सिंपली सपोर्ट’ पूल संरचना स्वीकारणे सुरू झाले.

आपत्तीच्या कारणांची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी गोवा सरकारने १९८६साली दिवंगत न्यायमूर्ती देविदत्त मंगेश रेगे (१९२३-२०१३) आयोग नेमला. या आयोगाच्या अहवालाचा सरकार, लोक आणि अभियांत्रिकी व्यावसायिकांना विसर पडला आहे.

तमिळनाडू पाणी वितरण आणि निस्सारण मंडळाचे (टीडब्ल्यूएडी) निवृत्त सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि नागरकोइल येथील वरिष्ठ स्थापत्य अभियांत्रिकी सल्लागार अरुलप्पन अमृतनाथन यांनी नंतर मांडवी पूल कोसळण्याचा अभ्यास केला.

Picture Of Mandovi Bridge Collapsed in 1986
PWD अधिकारी काम सोडून गाणे ऐकण्यात मग्न, काँग्रेसचा आरोप; सरकारी इमारतींच्या सेफ्टी ऑडिटची पाटकरांची मागणी

त्यांनी नोंदवलेले निरीक्षण

प्री-स्ट्रेस्ड हाय टेन्साइल स्टील केबल्स गंजल्या होत्या. काही केबल झुकल्या होत्या. डेक कॉंक्रिटचा थर पातळ होता. त्यामध्येच केबल्स जोडल्या होत्या. त्यातील बहुतांश तारांना सांधण्यासाठी आवश्यक असलेले सिमेंट वापरलेच गेले नव्हते.

उच्च दाब सहन करण्याची क्षमता असलेल्या तारा (केबलमधून ७ मिमी व्यासाचे १२ तारांचे बंडल) आणि त्या शीथिंग पाईपला जिथे जोडल्या जातात तिथे पोकळी होती. बांधल्यापासून पूल कोसळेपर्यंत जवळपास १६ वर्षे कॉंक्रीट डेकमधून पाणी गळत होते.

त्यामुळे, अनेक ठिकाणी गंजलेल्या तारांची पूड तेवढी शिल्लक राहिली होती आणि प्रीकास्ट कॉंक्रीट भाग जागी धरून ठेवण्याचे काम गंज चढलेल्या पातळ तारा करत होत्या. आधुनिक इमारतींमधून होणाऱ्या छत-गळतीसारखीच गळती होत असल्याच्या अनेक तक्रारी त्यावेळी पुलाखालून जाणाऱ्यांनी केल्या होत्या.

पूल कोसळण्याचे कारण

घाट १ (पणजीच्या बाजूने) असलेल्या वरील प्री-स्ट्रेस्ड तारा पूर्णपणे गंजलेल्या होत्या. वरून लटकणाऱ्या व पडलेल्या तारा यांनी हीच बाब तपासणीमध्ये स्पष्ट केली होती. पर्वरीच्या दिशेने असलेल्या प्रक्षेपीवरील (कॅन्टीलिव्हर) प्रीकास्ट कॉंक्रीटचे पाच खंड कोसळले.

त्यामुळे पणजीच्या बाजूने असलेल्या प्रीकास्ट कॉंक्रिट सेगमेंटवर आणि प्रचंड काउंटरवेट कॉंक्रीट ब्लॉकमुळे पिअर १वर सहन करण्यापलीकडचा दबाव निर्माण झाला. परिणामी तो कोसळून खाली बोटीत असलेले लोक चिरडले गेले.

पर्वरीच्या बाजूने असलेल्या प्रक्षेपीतील प्रीकास्ट घटकांनी स्वत: खाली कोसळताना, पणजीच्या बाजूने असलेल्या प्रक्षेपीवरील डेक कॉंक्रीटद्वारे जोडलेले प्रीकास्ट घटक आपल्यासोबत खेचले. पिअर २ वरील प्री-स्ट्रेस्ड तारा आधीच गंजल्या होत्या व त्यात हा अतिरिक्त भार त्यांच्यावर पडल्याने व्हायचा तोच परिणाम झाला.

रेगे कमिशनने सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटला पुलाच्या गंजलेल्या सामग्रीची तपासणी करण्यास सांगितले होते. त्या तपासात, कॉंक्रीट मिक्समध्ये समुद्रकिनार्यावरील वाळू आणि खाऱ्या पाण्याचा वापर शुद्धीकरणासाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुलाचे उद्घाटन करण्यापूर्वी, पुलाची भार-वहन क्षमता तपासणीच झाली नव्हती. वास्तविक, पूल वापरात आणण्यापूर्वी त्याचे ‘लोड टेस्टिंग’ करणे अनिवार्य आहे. पीडब्ल्यूडीच्या मुख्य अभियंत्याला न्यायमूर्ती रेगे यांनी त्याबाबत विचारणा केली असता, ‘लोड टेस्टिंग’ केल्यास पूल कोसळण्याची भीती वाटत होती’ हे त्यांनी मान्य केले.

तरीही, भार-वहन क्षमता तपासणी न झालेल्या पुलाने १६ वर्षे तग धरला हा एक चमत्कारच होता. ज्या संरचनेने हा कोसळलेला मांडवी पूल बांधला होता, त्याच संरचनेने बांधलेला झुआरी पूल अधिक गंजलेला आहे. क्षमतेपलीकडचे भार-वहन आणि कंपन असतानाही तो कसा तरी तग धरून राहिला आहे.

उष्णकटिबंधातील आत्यंतिक आर्द्रता, खारटपणा यांवर गोव्यातील पुलांचे आयुष्य ठरते. त्यातही ते खराब होऊ नयेत यासाठी उपलब्ध असलेल्या विज्ञानानुसार बांधलेले नाहीत. भौतिक, रासायनिक, वातावरणीय आणि जैविक घटकांमुळे पुलांची होणारी संभाव्य झीज या कारणांचे परीक्षण ‘ब्रिज डिटेरिओलॉजिस्ट’ करतात आणि त्यावर उपाय सुचवतात. झुआरी, बोरी येथील पूल आधीच धोक्यात आले आहेत.

Picture Of Mandovi Bridge Collapsed in 1986
तेरेखोल, शापोरा, मांडवी, झुआरीत 5 दशलक्ष घनमीटर रेती; रेतीसाठा काढण्यासाठी परवाने देण्याची मागणी

गोव्यातील कोणत्याही प्रबलित सिमेंट कॉंक्रीट (आरसीसी) पुलाला मानक डिटेरिऑलॉजिकल चाचण्या उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. खारटपणामुळे गंजण्याविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय तयार करणे आवश्यक आहे. गंज प्रतिरोधक सिमेंट वापरणे आवश्यक आहे. नवीन ‘गंज अवरोधक’ समाविष्ट करणे आवश्यक आहे.

आरसीसी मिश्रणासाठी आणि संरचना सुदृढ करण्यासाठी वापरलेले पाणी, विरघळलेले क्षार आणि क्लोरीन यांपासून पूर्णपणे मुक्त असणे आवश्यक आहे. संरचना सुदृढ होण्यासाठी कालावधी कमी करता कामा नये. जेणेकरून अंतिम रचना कोणत्याही सूक्ष्म फटींशिवाय व अधिक मजबूत बनते.

सर्व धातूंच्या जोड्यांसह पुलांना गंजरोधक पेंटाचे जाड थर देणे आवश्यक आहे. पण मांडवी पूल कोसळून ३८ वर्षे उलटली तरी रेगे आयोगाच्या अहवालाची अद्याप अंमलबजावणी होत नसल्याचे पाहून वाईट वाटते. कला अकादमीसारख्या मोठ्या संरचनेला रेगे आयोगाने अधोरेखित केलेल्या त्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

बांधकामातील तांत्रिक चुकांवर नेमके बोट ठेवणाऱ्या या अहवालाची एकही प्रत राज्यात उपलब्ध नाही, यापेक्षा दुर्दैव ते कोणते? अभियंत्यांना, कंत्राटदारांना वाचवण्यासाठी आणि इतर पुलांबाबत डोके वर काढत असलेले असेच अनेक गंभीर मुद्दे लपवण्यासाठी सर्व प्रती नष्ट करण्यात आल्याची वदंता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com