Dr. Juliao Menezes: क्रॉसची मोडतोड झाली अन् असोळणात पोर्तुगीजांनी कर्फ्यु लावला, 18 जूनचे अनसंग हिरो डॉ. ज्युलियांव मिनेझिस

Dr. Juliao Menezes: लोहिया आणि ज्युलियांव यांनी जिनिव्हा येथे बिकानेरच्या महाराजांना मुजरा केल्याने त्यांची बाहेर हकालपट्टी करण्यात आली होती.
Dr. Juliao Menezes
Dr. Juliao MenezesDainik Gomantak

Dr. Juliao Menezes

पोर्तुगीज जुलमी राजवटीविरोधात डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीचा एल्गार देण्यात आला. 18 जून 1946 रोजी मडगाव येथे झालेल्या सभेने गोमंतकीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुलिंग जागे केले.

सविनय कायदेभंगाच्या या चळवळीने गोव्यातील पोर्तुगीज हुकूमशाही राजवटीला धक्का देण्याचे काम केले. या चळवळीतील एक महत्वाचे गोमंतकीय नाव म्हणजे डॉ. ज्युलियांव मिनेझिस!

सात ऑगस्ट 1909 रोजी असोळणा येथे जेफेरिनो पीदादे मिनेझिस आणि सालवाकाव मिनेझिस यांच्या पोटी डॉ. ज्युलियांव मिनेझिस यांचा जन्म झाला. एका जहाजावर कामाला असणाऱ्या जेफेरिनो यांचे अकाली निधन झाले. डॉ. ज्युलियांव मिनेझिस यांनी असोळणा आणि पणजी येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी बर्लिन गाठले.

पणजीत शिक्षणाला असताना त्यांच्यावर मिनेझिस ब्रागांझा यांच्या लिखाणाचा मोठा प्रभाव होता. बर्लिनमध्ये डॉ. ज्युलियांव मिनेझिस यांनी त्वचारोगतज्ज्ञ विषयात शिक्षण पूर्ण केले. याचवेळी बर्लिन विद्यापीठात शिक्षणासाठी असणाऱ्या राम मनोहर लोहिया यांच्याशी ज्युलियांव यांची ओळख झाली. राम मनोहर लोहिया या विद्यापीठात अर्थशास्त्र विषयात शिक्षण घेत होते. भारतीय विद्यार्थ्यांच्या युनियनमध्ये राम मनोहर लोहिया यांच्यासोबत ज्युलियांव यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला.

जिनिव्हा येथे 1930 रोजी झालेल्या बैठकीला भारताकडून बिकानेरच्या महाराजांनी हजेरी लावली होती. बैठकीत महाराजा शांतता या विषयावर बोलत होते. यावेळी लोहिया आणि ज्युलियांव यांनी महाराजांना मुजरा केल्याने त्यांची बाहेर हकालपट्टी करण्यात आली होती.

1933 साली लोहिया पीएचडी पूर्ण करुन भारतात माघारी आले. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 1938 साली ज्युलियांव त्यांचे बर्लिनमधील शिक्षण पूर्ण करुन भारतात माघारी आले.

डॉ. ज्युलियांव मिनेझिस असोळणा येथे आल्यानंतर त्यांनी जुवेनाईल क्लब (ग्रंथालय) पुन्हा सुरु केला. या क्लबच्या माध्यमातून त्यांनी सुधारणावादी आणि राष्ट्रप्रेमाच्या विचारांचा प्रसार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, एक दिवस असोळणा येथील एका क्रॉसची मोडतोड केल्याचा प्रकार समोर आला आणि याबाबत मिनेझिस यांच्यावर शंका उपस्थित करण्यात आली.

पोलिसांनी मिनेझिस यांच्या ग्रंथालयावर छापा टाकून तो बंद केला, एवढेच नव्हे तर त्यातील साहित्याची महसूल विभागाने विक्री केली. त्यानंतर असोळणा मार्केट परिसरात कर्फ्यु लागू करण्यात आला.

या प्रकारानंतर 1939 रोजी डॉ. ज्युलियांव मिनेझिस त्यावेळच्या बॉम्बेमध्ये आले आणि 'गोमंतक प्रजा मंडळा'ची स्थापना केली. तर, 1942 साली त्यांनी कोकणी आणि इंग्रजी भाषेतील 'गोमंतक' साप्ताहीक सुरु केले.

Dr. Juliao Menezes
Goa Revolution Day 2024: लोहिया मैदान, डॉ. मिनेझिस; गोवा क्रांती दिनानिमित्त आलेमाव यांच्या सरकारकडे दोन मागण्या

ऑगस्ट 1942 साली महात्मा गांधींनी करो या मरोचा नारा दिल्यानंतर भूमीगत असलेल्या लोहियांनी यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. पण, ब्रिटिशांचा सर्वदूर असलेला धोका विचारात घेता ज्युलियांव यांनी यास विरोध केला.

नेपाळला गेलेल्या लोहियांना 1943 साली पोलिसांना अटक केली. सुटकेनंतर 1944 साली मुंबईत आलेल्या लोहियांना अटक करुन लाहोरच्या तुरुंगात पाठवण्यात आले. दरम्यान, 1946 साली सुटकेनंतर पुन्हा मुंबईत आलेल्या लोहियांना काहीदिवस आराम करण्याचा सल्ला ज्युलियांव यांनी दिला. ज्युलियांव यांच्या सल्लानंतर लोहिया 10 जून 1946 रोजी असोळणा येथे मुक्कामास आले. लोहिया गोव्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वदूर पसरली.

लोहिया आल्यानंतर ज्युलियांव यांचे असोळणा येथील घर बैठकांचे ठिकाण झाले. पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटी विरोधात लढण्याचा निर्धार लोहिया यांनी केला. याकाळात ज्युलियांव आणि लोहिया यांनी गोव्यातील क्रांतीकारक आणि सर्व नेत्यांशी बैठका घेऊन चर्चा केली. आणि 18 जून 1946 हा दिवस उजाडला.

18 जून 1946 रोजी गोव्यातील हजारो लोक (महिला, पुरुष) मडगाव येथे गोळा होण्यास सुरुवात झाली. सभेची जबाबदारी पुरुषोत्तम काकोडकर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. दरम्यान, पोर्तुगीजांनी हा प्रयत्न हाणून पाडत ज्युलियांव आणि लोहिया यांना अटक करुन पणजी पोलिस ठाण्यात आणले.

दोघांच्या अटकेची बातमी गोव्यात पसरताच गोमंतकीयांनी अटकेचा निषेध केला. व जय हिंद, डॉ. लोहिया को छोड दो! डॉ. ज्युलियांव को छोड दो! अशा घोषणा दिल्या. दरम्यान, दुसऱ्या दिवशी लोहिया यांची कुळे येथील सीमेजवळ तर ज्युलियांव यांची मडगाव येथे सुटका करण्यात आली. पण, या उठावामुळे गोमंतकीयांच्या मनात क्रांती ज्योत प्रज्वलित झाली. व प्रत्येकजण स्वातंत्र्यांसाठी प्रेरित झाला. हाच दिवस गोव्यात क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो.

या उठावात गोमंतकीय डॉ. ज्युलियांव मिनेझिस यांचे मोठे योगदान आहे. डॉ. ज्युलियांव यांचे 2 जुलै 1980 रोजी मुंबईत निधन झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com