Goa Art: कॉमर्समधून पदवी घेतलेल्या आशिषचा चित्रकारापर्यंतचा प्रवास, कला क्षेत्रात आर्थिक स्थैर्य असते का?

Ashish Phal Dessai Interview: विविध स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर या तरुणाची आता गोव्यात कलादालनत चित्रप्रदर्शनं भरतात
Ashish Phal Dessai Interview:  विविध स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर या तरुणाची आता गोव्यात कलादालनत चित्रप्रदर्शनं भरतात
Ashish Phal Desai Interview Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Art Painting Ashish Phal Desai Success Story

दक्षिण गोव्यातील काणकोण या गावातला तरुण...त्याचं लहानपण काणकोणच्या शांत वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात गेलं. शाळेत असताना वहीवर रेघोट्या ओढून चित्र काढायचा, कदाचित त्यालाही माहिती नसेल याच रेघोट्या त्याच्या आयुष्याचा भाग बनणार आहेत... कॉमर्समध्ये पदवी घेतलेला हा तरुण मित्रासोबत कलाप्रदर्शनात गेला आणि तिथून परतला तो चित्रकार होण्याच्या जिद्दीने... विविध स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर या तरुणाची आता गोव्यात कलादालनत चित्रप्रदर्शनं भरतात... गोव्यातली कलाप्रेमी त्याच्या चित्रांना भरभरून दाद देतात.. या तरुणाचं नाव आहे आशिष फळदेसाई.

आजोबांकडून कलेचा वारसा

आशिष फळदेसाई सांगतो, त्याचे वडील चतुर्थीच्या काळात त्याला चिकण माती आणून द्यायचे आणि आशिष त्याच्या लहानग्या हातांनी सुंदर गणपतीची मूर्ती घडवायचा. आजोबा जुन्या काळात बऱ्यापैकी मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध होते, ते गणेश मूर्ती बनवायचे आणि कदाचित हीच पिढीजात जपलेली कला आशिषच्या अंगी उतरली असेल.

कलेऐवजी कॉमर्समध्ये पदवी

आपल्याला एखादी गोष्ट आवडत असते मात्र त्यात करियर होऊ शकतं याची खात्री नसते, आशिषच्या बाबतीत काहीसं हेच घडलं आणि चित्रकलेची आवड असून सुद्धा त्याने 2016 पासून मडगावच्या दामोदर कॉलेजमधून कॉमर्सचा अभ्यास सुरु केला. दरम्यान प्रकल्प नाईक नावाच्या मित्रासोबत त्याची चित्रकलेच्या क्षेत्रात बरीच ये-जा असायची.

प्रकल्पमुळे चित्रकलेचा करिअर म्हणून विचार केला जाऊ शकतो असा पहिला विचार माझ्या मनात आला होता आणि चित्रकलेसोबत मला कायमचं जोडल्याबद्दल मी त्याचा आभारी आहे.

आशिष फळदेसाई

भीतीवर आत्मविश्वासाने केली मात

चित्रकलेची आवड आणि सतत चित्रकलेशी होणारा परिचय यामुळे एकेदिवशी आशिषचा निर्णय पक्का झाला, कॉमर्स नाही तर चित्रकलेतच करिअर घडवायचं. पण हा निर्णय घेणं सोपं नव्हतं. आशिषने निर्णय बदलला असला तरीही त्याच्या घरून नेहमीच या निर्णयाचा आदर केला गेला, त्याला हवं असलेलं पाठबळ दिले. आशिषचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते आणि सोबतच त्यांचं रेस्तराँ देखील आहे.

Ashish Phal Dessai Interview:  विविध स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर या तरुणाची आता गोव्यात कलादालनत चित्रप्रदर्शनं भरतात
Sattari News: ...आणि सभा तापली! सत्तरी शेतकरी सोसायटी आमसभेत आरोप प्रत्यारोपांमुळे गोंधळ

आई-वडिलांचा सपोर्ट असताना देखील आशिषच्या मनात धाकधूक होतीच. आपण नवीन काम हाती घेतोय, ते मार्गी लागेल का? अशी भीती मनात घर करून होती. मग या भीतीवर अशी मात केली? या प्रश्नाला आशिषने दिलेलं उत्तर त्याचा कॉन्फिडन्स दाखवतो.

Ashish Phal Desai Interview
Ashish Phal Desai Interview Dainik Gomantak

आशिष म्हणतो कि त्यांचा जन्म हा चित्रकलेसाठीच झालाय आणि तो बाकी कोणतंही काम हाती घेऊच नाही शकणार. 'काम करो फल की अपेक्षा ना कारो!' गीतेतल्या याच शिकवणीवर त्याने वाटचाल कायम ठेवली आणि आज त्याला मिळणारं यश त्याचा स्वतःवरचा विश्वास सार्थ असल्याची खात्री पटवून देतो.

आशिष फळदेसाई हा गोव्यातील तरुण लँडस्केप चित्रकारांपैकी एक आहे. लहानपणापासूनच आशिषची नाळ चित्रकलेशी जोडली गेली होती त्यामुळे गोवा कॉलेज ऑफ आर्टस् मधून ‘फाईन आर्टस्’चे शिक्षण मिळवून त्याने चित्रकलेप्रती असलेली आवड सिद्ध करून दाखवली. कॉलेजमध्ये असतानाच आशिषने तीन वेळा राज्य कला पुरस्कार पटकावला, एवढंच नाही तर कलाकारांच्या गटातून कला अकादमीचा पुरस्कार मिळवणारा देखील आशिषच होता.

पहिलं चित्र विकलं गेलं

आत्ताच्या घडीला गोव्यातील पाणथळ प्रदेशात आणि खारफुटी (Mangrove) भागात रमणाऱ्या आशिष याच्या करियरची सुरुवात ‘गोवा ओपन आर्ट फेस्टिव्हल’मधून झाली. हा क्षण त्याच्यासाठी खास आहेच, मात्र सुनापरांत आर्ट गॅलरीमधून पहिल्यांदा चित्रं विकली गेल्याची आठवण आशिष विशेष भर देऊन सांगतो. आशिष तो दिवस आठवताना प्रचंड खुश होत म्हणतो, "पहिली कमाई प्रत्येकासाठी खास असते, माझी चित्रं त्यादिवशी पहिल्यांदा विकलं गेलं आणि मला सुख आणि समाधान दोन्ही मिळालं".

कलेची आवड आणि कलेप्रती निष्ठा असणाऱ्या माणसाचा नेहमीच आदर केला जातो. कलेमध्ये कलाकाराला विविध व्यासपीठं उपलब्ध करून देण्याची ताकद आहे.

Ashish Phal Desai Interview
Ashish Phal Desai Interview Dainik Gomantak

आशिष देखील याला अपवाद नाही म्हणूनच त्याला 2020 मध्ये गोवा ओपन आर्ट फेस्टिव्हलच्या पहिल्या आवृत्तीत, कोचीमधील स्टुडंट्स बिएनाले (2021 आणि 2023), सुनापरंता आर्ट इनिशिएटर लॅब (2021) यासारख्या प्रमुख कला प्रदर्शनांमध्ये आणि महोत्सवांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. आर्क्विव्ह व्हिजनच्या गोवा ओपन आर्ट फंडरेझर एक्झिबिशन सारख्या उल्लेखनीय कलाप्रदर्शनांमध्ये भाग घेतला असल्याचं आशिष अभिमानाने सांगतो.

चित्रकलेमुळे घडली परदेशवारी

कोचीमधील स्टुडंट्स बिएनाले याला भारतातील सर्वात मोठा आर्ट फेस्टिव्हल म्हटलं जातं, इथे देशातील अनेक चित्रकार सामील होतात. आशिषला याच स्पर्धेत आंतरराष्ट्रीय बक्षीस मिळाल्यामुळे पहिल्यांदा समुद्र ओलांडून परदेशात जाणायची संधी मिळाली होती. बक्षिस मिळाल्याने ही ट्रिप आयोजकांकडून स्पॉन्सर करण्यात आली आणि दरम्यान आपण मोनालिसाचं जगप्रसिद्ध चित्र पहिल्यांदा समोरासमोर बघितल्याची गोड आठवण आजही त्याच्या मनात ताजी आहे.

चित्रकाराचं आर्थिक उत्पन्न समाधानकारक असतं का?

एक चित्रकार म्हणून आशिष निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवतो आणि आपल्या कलेतून भावना, संवेदना प्रकट करण्याच्या प्रयत्नांमध्ये गुंतलेले असतो. त्याच्या मते एखाद्या कलाकारासाठी आर्थिक आव्हानं असणं ही खूप सामान्य गोष्ट आहे, कारण त्याच्याजवळ महिन्याच्या शेवटी एक निश्चित पगार देणारी नोकरी नसते. सुरुवातीला जी काही कमाई करायची ती केवळ कमिशनच्या कामातून करावी लागते. वेळेनुसार पुढे अनुभव वाढतो आणि केवळ चित्रकलेच्या भरवश्यावर जगणं शक्य होतं.

Ashish Phal Desai Interview
Ashish Phal Desai Interview Dainik Gomantak

आशिष स्वतः दरवर्षी 6-7 लाख रुपये मिळवतो. कमिशनची कामं, काही एक्झिबिशन आणि ओळखीने चित्रं विकून ते पैसे कमावतो आणि लँडस्केपची चित्रं विकण्यासाठी 15,000 ते 1,00,000 पर्यंत रुपये आकारतो.

गोव्यात चित्रकारांसाठी संधी आहेत का?

एखाद्या क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर नवनवीन गोष्टी शिकत राहणं गरजेचं आहे, आशिषच्या बाबतीत इंटरनेट त्याला अपडेटेड राहण्यात फारच मदत करतो असं त्याचं म्हणणं आहे. एखाद्या नवशिक्याला चित्रकलेत करिअर घडवायचं असेल तर त्यांने नक्कीच एखादी पदवी मिळवावी कारण या कोर्समधून विदयार्थ्यांना चित्रकलेचे अनेक पैलू समजतात आणि पाया पक्का व्हायला मदत मिळते.

Ashish Phal Desai Interview
Ashish Phal Desai Interview Dainik Gomantak

चित्रकलेची पदवी मिळवणं एवढं महागडं काम नसलं तरीही चित्रकलेची उपकरणं काहीवेळ महाग ठरू शकतात आणि दरवर्षी गरजेनुसार कोणती उपकरणं विकत घ्यावी लागतील याचा अंदाज बांधला जाऊ शकत नाही अशी माहिती आशिषने दिली.

आजकाल तरुण कलाकारांना परदेशात काम करण्याची संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे काम चांगलं असल्यास तिथे निवड होण्याची शक्यता अधिक असते. दिल्ली आणि मुंबई सारख्या बड्या शहरांप्रमाणे गोव्यात सुद्धा चित्रकलेची अनेक प्रदर्शनं भारावली जातात यामुळे गोव्यातील चित्रकारांना त्यांची कला सादर करण्याची उत्तम संधी मिळतेय. गोव्यात कलाप्रेमींची कमतरता नाही, फक्त ते चित्रं विकत घेताना बराच विचार करतात अशी खंत त्याने व्यक्त केली.

आशिष हा गोव्यातील एक पूर्णवेळ चित्रकार म्हणून ओळखला जातोय. चित्रकलेशिवाय त्याला फोटोग्राफी आणि नाट्यकलेची आवड आहे. तो याला निसर्गाशी एकरूप होण्याचं साधन म्हणतो. आशिष त्याच्या चित्रकलेमधून केवळ भौतिक सौंदर्यच टिपत नाही तर त्यातला नाजूकपणा जपण्याचा प्रयत्न करतो, भावी पिढीने भूदृश्यांचे संरक्षण आणि जतन करावं म्हणून. त्याच्या मते जर का तुम्ही एखादं स्वप्न जगत असाल तर येणाऱ्या कठीणाईची चिंता करू नका,पुढे जात राहा आणि स्वतःला सिद्ध करा. कारण हे शक्य आहे.

कला माणसाला अनेक गोष्टी शिकवत असते, पैकी एक म्हणजे कितीही लांब झेप घेतली तरीही स्वतःचं घरटं न विसरणं. आशिष या संपूर्ण यशासाठी त्यांचे आई-वडील, भाऊ आणि मित्रपरिवाराचे आभार मानतो. आजकाल पैश्यांच्या मागे धावत अनेकवेळा कला जोपासण्याची इच्छा असून देखील मनाविरुद्ध एखादी पदवी मिळवत पैश्यांचं झाड रोवलं जातं, मात्र आशिष सारख्या तरुण कलाकाराकडे पाहिलं की कला जपणाऱ्याला कधीही मरण नाही याची खात्री पटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com