Naik Desai Of Cuncolim: कुंकळ्ळीचे नाईक देसाई नक्की कोण?

Naik Desai Of Cuncolim: शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीचे मंदिर व महाजन यांच्याविषयी निर्माण झालेल्या वादाच्‍या पार्श्वभूमीवर नाईक देसाई घराण्यांच्या इतिहासाचा एक संक्षिप्त मागोवा ...
shantadurga temple cuncolim
shantadurga temple cuncolimDainik Gomantak

Naik Desai Of Cuncolim

समस्त गोवेकरांच्या धार्मिक आस्थेचे तसेच गोमंतकीय संस्कृतीचे व इतिहासाचेही महत्वाचे  केंद्र असलेले श्री शांतादुर्गा कुंकळकरीण मंदिर गेल्या काही दिवसांत एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहे.  

स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या म्हणवणाऱ्या व सोशल मीडियावरून असभ्य भाषेत व्हिडिओ काढण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रेया धारगळकर परेरा नामक महिलेने आपल्या फेसबूक अकाऊंटवर मंदिर समिती आणि महाजनांची बदनामी करणारा व्हिडिओ प्रसारित केला.

त्या व्हिडिओत मंदिराची जागा ही नमिता  फातर्पेकर या  व्यक्तीची असल्याचा दावा करत, मंदिरांविषयी अनेक अपमानास्पद शब्दांचा वापर करत, महाजनांवर खालच्या पातळीचे आरोप करण्यात आले.

मंदिराचे महाजन असलेले हे नाईक देसाई कोण?, हे नाईक गोमंतकीय कसे असू शकतात? ते देसाई कसे काय झाले? असे प्रश्न विचारून महाजनांच्या आडनावांविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले. 

आपल्याच मायभूमीच्या इतिहासाची समज  व जाणीव नसली की, असे काही उपटसुंभ बिनबुडाचे प्रश्न उपस्थित करतात. गोव्याच्या मातीचे सुपुत्र असलेल्या कुंकळ्ळीच्या नाईक-देसाईंचे गावाशी अनेक पिढ्यांचे ऋणानुबंध राहिले आहेत.

१५८३ मध्ये पोर्तुगीज सत्तेविरुद्ध कुंकळ्ळीचा उठाव झाला त्यामध्ये या नाईक देसाईंचे अमूल्य योगदान आहे. त्यामुळे नाईक देसाई गोवेकर कसे असू शकतात, हा प्रश्नच उद्भवत नाही. 

दुसरा मुद्दा ‘नाईक-देसाई’ या विशिष्ट आडनावाचा. या आडनावापाठी देखील असाच इतिहास आहे व सध्या उफाळलेला वाद समजून घेण्यासाठी हा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. 

पोर्तुगीज पूर्वकाळापासून कुंकळ्ळीची गावकारी व श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरिणीच्या मंदिराची महाजनी १२ क्षत्रिय कुळांकडे होती. हीच बारा कुळे गावाचा नित्य कारभार बघत असत. या बारा कुळांना वांगड, असे संबोधतात.

या बाराही कुळांची क्रमशः नावे पुढील प्रमाणे आहेत.

१) महाल, २) शेटकर, ३) नाईक,

४)मोंगरो, ५) शेट/ सोंबरो, ६) थोंबडो, ७) परब / पोरबो, ८) सिद्धकाली,

९) लोकोकाली, १०) बांधकार, ११) रवणो, १२) भेकलो

ही बाराही कुळे आज शांतादुर्गा कुंकळ्ळीकरिणीचे महाजन आहेत व आपले पारंपरिक कुळाचे नाव ते मोठ्या गर्वाने धारण करतात, तसेच हे बारा वांगड नाईक - देसाई  हे उपनाम धारण करतात. पोर्तुगीजपूर्व काळात कुंकळ्ळीचे गावकार हे सैन्यात नाईक पदावरती रुजू होत असल्यामुळे नाईक हे उपनाम रूढ झाले.

२७ मार्च १५८५ च्या (joao Da Silva )जुवांव दा सिल्वा यांना दिलेल्या पोर्तुगीज अनुदानात कुंकळ्ळी चे गावकार पोर्तुगीज विरुद्ध आदिलशहा तर्फे नाईक म्हणून सैन्यात लढले, असा उल्लेख मिळतो.

एर्मिलिंदा स्टुआर्ट गोम्स (Ermilinda stuart Gomes) यांनी त्यांच्या एका पुस्तकात कुंकळ्ळी भागातील अनेक तरुण तत्कालीन सैन्यात असल्याचे लिहून ठेवले आहे. मध्यकालीन इतिहासात नाईक हे पायदळात एक अधिकारीपद होते. जे छोट्या पायदळ तुकडीचे नेतृत्व करायचे.

गोवा प्रदेश बहामनी पूर्वकाळात विजयनगरच्या अधिपत्याखाली असल्याने हे ‘नायक’ ही उपाधी विजयनगर साम्राज्यातील नायका व्यवस्था पद्धतीशीही संबंधित असू शकते. आजही सैन्यात व पोलिस दलात हे पद आहे. पोर्तुगीजपूर्व काळात कुंकळ्ळीच्या या  बारा घराण्यांना कर वसुलीचा अधिकार होता. करवसुलीचा अधिकार असलेले घराणे त्याकाळी देशाधिकारी, अशी उपाधी लावायचे.

याचाच पुढे अपभ्रंश होऊन ‘देसाई’ आडनाव झाले. सैनिकी व कारभारी अशा दोन्ही जवाबदऱ्या असलेली ही कुंकळ्ळीची १२ क्षत्रिय घराणी नाईक देसाई या  पदव्या धारण करू लागले.

नाईक देसाई व शांतादुर्गा मंदिर  १५८३ साली याच १२ क्षत्रिय कुळांनी शांतादुर्गा कुंकळ्ळीकरिणीचे मंदिर उद्‍ध्वस्त करण्यासाठी आलेल्या जेजूईट पादऱ्यांचा वध करून पोर्तुगीज सत्तेविरुद्ध पहिला सशस्त्र उठाव केला. हा इतिहास समस्त गोमंतकीयांना परिचित आहेच, शिवाय तो नववी व अकरावीच्या पाठ्यक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.

याच उठावादरम्यान बारा नाईक देसाई कुळांनी श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरिणीची मूर्ती आपले मूळस्थान कुंकळ्ळीहून फातर्पा- केपे येथे स्थापन केली. त्या जागेला स्थल कुटबण, आरसोनाचे मरड किंवा हासनामड्डी व उदयामळ, असे म्हणतात.

शांतादुर्गेचा आणि आकार उदेंगीच्या मंदिराचा शिलान्यास समारंभ इ.स.१६०६ साली पार पडला. १६१५ साली मंदिराचे काम पूर्ण होऊन छोटे- मोठे मठ उभारण्यात आले. काही काळानंतर मंदिराची जागा अपुरी पडू लागल्यावर १८२२ साली मंदिर बांधणी सुरू होऊन १८२५. ला पूर्ण झाले.

दि. ५ जानेवारी १९१५ रोजी देवस्थानची नियमावली ज्याला ‘कोप्रामिस’ (COMPROMISSO DE DEVALAIA) तयार करून राज्यपालातर्फे ती मंजूर करण्यात आली. ज्यात मंदिर कारभाराचे सर्व हक्क बारा नाईक देसाई कुटुंबीयांना देण्यात आले.

इ.स. १९८४ साली श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरिणीच्या मंदिराचा नव्याने शिलान्यास समारंभ शनिवार दि. ८ डिसेंबर १९८४ रोजी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी झाला. संपूर्ण मंदिराचे नव्याने बांधकाम करण्यात आले. त्याच बरोबर २००५ साली आकार उदेंगीचे मंदिर नव्याने बांधण्यात आले.

हा इतिहास लक्षात घेता हे पुरातन मंदिर आपल्या मालकीच्या जागेवर असल्याचा दावा करणे व त्या आधारे नाईक देसाई घराण्यांना उद्देशून अपशब्द उच्चारणे म्हणजे केवळ विक्षिप्तपणाच आहे. 

या बाराही क्षत्रिय कुळांची अपार श्रद्धा त्यांचे ग्रामदैवत शांतादुर्गा कुंकळ्ळीकरिणीवरती आहे. रॉबर्ट न्यूमन हे मानववंश शास्त्रज्ञ असे म्हणतात की, कुंकळ्ळी चे गांवकार (नाईक देसाई)  स्वतःला देवीचे पुत्र मानतात.

या गावाची उत्पत्ती शांतादुर्गेने केली आहे आणि शांतादुर्गा कुंकळ्ळीकरिण व आपला गाव एकरूपच आहे, अशी त्यांची भावना आहे. देवीने आपल्याला गावाच्या व मंदिराच्या रक्षणासाठी निवडले आहे, गावावर आलेल्या कुठल्याही प्रकारच्या संकटाला तोंड देणे हे आपलं कर्तव्य आणि धर्म आहे, असे ते मानतात. 

अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या शांतादुर्गा कुंकळ्ळीकरिण देवळाभोवती वाद निर्माण करून व कुंकळ्ळी गावचा अविभाज्य भाग असलेल्या नाईक देसाई परिवारांना अपशब्द उच्चारून श्रेया धारगळकर काय साध्य करू पाहात होती? 

हा वाद उफाळताच हजारोंच्या संख्येने कुंकळ्ळीकरांनी पोलिस स्थानकाला घेराव घालून राष्ट्रीय महामार्ग ठप्प केला, तसेच बाजार समितीने कुंकळ्ळी बाजार बंद केला. जमावाने वरील सर्व दोषींना अटक करण्याचा पोलिसांवर दबाव संख्येने होते. कुंकळ्ळीचे मंदिर हे आपल्या सामाजिक सलोख्यासाठी प्रसिद्ध आहे.

मंदिरात सर्व समाजबांधवांना एक विशिष्ट मान आहे. सर्व जाती- धर्माचे लोक देवीचे भक्त आहेत. अशा या  मंदिरात महाजन व सेवेकरी समाजामध्ये जाणूनबुजून दुरावा निर्माण करण्याचा हा श्रेया धारगळकर परेरा व नामिता फातर्पेकर यांचा प्रयत्न गावकऱ्यांनी एकजुटीने हाणून पडला, त्याबद्दल समस्त कुंकळीवासीयांचे अभिनंदन.  

Edited By - अभिदीप विष्‍णू नाईक देसाई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com