Panjim News ताळगाव पंचायतीत येणारा आणि पणजी महापालिकेचे कर्मचारी वास्तव्य करणाऱ्या कामराभाट या झोपडपट्टीचे पुनर्वसनाचा प्रश्न पावसाळ्याच्या तोंडावर सालाबादप्रमाणे येतच राहतो.
त्यामुळे या झोपडपट्टीचे पुनर्वसन होणार कधी? असा प्रश्न पडतो. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील हा परिसर असल्याने पुनर्वसनाचा प्रश्न महानगरपालिकेलाच सोडवावा लागणार आहे.
ताळगाव मतदारसंघातील एकगठ्ठा व निर्णायकी मतदार संख्या येथे आहे. या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून थिजत पडलेला आहे.
पावसाळ्यात या परिसरात पाणी साचल्यानंतर येथील लोकांना मदत करण्यासाठी धावणारे लोकप्रतिनिधी दिसून येतात. परंतु त्यांच्या कायमच्या पुनर्वसनाचा विचार होत नसल्याचे दिसून येते.
सांतिनेज खाडीला लागून असलेल्या या वस्तीत खाडी पावसाळ्यात भरून गेली की या वस्तीत पाणी जाण्याच्या घटना नित्याच्या बनल्या होत्या. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी खाडीला संरक्षक भिंत उभारली गेल्याने पावसाळ्यात या परिसरात खाडीचे पाणी शिरण्याला अटकाव झाला आहे.
महापौर रोहित मोन्सेरात यांनी पहिल्या टर्मला या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाबाबतचा विषय चर्चेला घेतला होता. परंतु पुढे त्याचे काय झाले, हे त्यांनाच माहीत. येथे वास्तव्य करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही पुनर्वसनाची आशा आहे.
परंतु काही व्यक्तींनी काही ठिकाणी जागाही इतर ठिकाणी खरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे. पुनर्वसनात जर घर मिळाले तर मिळाले, म्हणून जागा खरेदी करणारे ती जागा सोडत नाहीत, असे येथील कर्मचारी सांगतात.
कामराभाट येथील झोपडपट्टीचे स्थलांतर करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार त्यांना तेथेच निवास बांधून द्यायचा की आणखी कोठे हे काही ठरले नाही.
परंतु महानगरपालिकेकडे नोंद असलेल्या नावांप्रमाणे त्यांची यादी तपासणीचे काम सुरू होते. कदाचित येत्या बैठकीत याविषयी निर्णय जाहीर होईल.
- संजीव नाईक, उपमहापौर.
कामराभाट येथील लोकांचे पुनर्वसन करण्याचा विषय काही महिन्यांपूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या बैठकीत चर्चेला आलेला होता. त्यावेळी महानगरपालिकेच्या नोंदीत असलेले 77 जण होते, परंतु आता ही संख्या दुप्पट झाली आहे.
त्यामुळे महानगरपालिकेकडे असलेल्या नावांप्रमाणे त्यांची तपासणी करावी, असे सूचविण्यात आले होते. त्याचे पुढे काय झाले? हे माहीत नाही.
- उदय मडकईकर, नगरसेवक.
पावसाचे पाणी झोपडीत?
गेल्या अनेक वर्षांत कामराभाटमध्ये पावसाळ्यात नाल्याचे पाणी झोपडपट्टीत घुसले. त्यांचा साहित्य पाण्यात वाहून जाते. तसेच मोठ्या प्रमाणात साहित्याचे नुकसान होते. लहान मुले, महिलांना या पाण्याचा खूपच त्रास सहन करावा लागतो.
प्रचंड पडणाऱ्या पावसामुळे होणारे नुकसान मोठे असूनही प्रत्येक वर्षी झोपडीत पाणी घुसण्याचे प्रकार घडतात. त्यासाठी या झोपड्याचे स्थलांतर होणे गरजेचे आहे, असे मत येथील ग्रामस्थांचे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.