फरारी चार्ल्स सोबराजाक गोयांत धरलो तेन्ना

When fugitive Charles Sobraj was caught in Goa …
When fugitive Charles Sobraj was caught in Goa …
Published on
Updated on

बातमीदाराच्या करिअरमध्ये स्कूप क्वचितच असतात. कधीतरी अचानक त्याला स्कूपचे घबाड मिळते आणि त्याची अविस्मरणीय बातमी होते. अशाच एका अवचित गवसलेल्या स्कूपविषयी. गोव्याच्या राजधानीच्या पणजी शहरात संध्याकाळी सातनंतर शुकशुकाटच असतो. १९८६ सालच्या  सहा एप्रिलच्या त्या रविवारच्या संध्याकाळी मी एका दैनिक वृत्तपत्रातच्या ऑफिसात क्राइम रिपोर्टरची  ड्युटी सांभाळत होतो. तेव्हा आमच्या या  इंग्रजी पेपरची आतल्या पानांसाठी संध्याकाळी सात ही डेडलाईन असायची. त्यानंतर फारच मोठी बातमी असली तर थेट संपादकांच्या परवानगीनेच ती पहिल्या पानावर जाई. या वृत्तपत्राचे पणजी मार्केटजवळ असलेले कार्यालय आणि आझाद मैदानापाशी असलेल्या गोवा पोलिसांचे मुख्यालय हे अंतर केवळ तीनशे मीटर. तेथील पोलीस स्टेशनवर ड्युटीवरच्या फौजदाराशी गप्पा मारून मी आलो होतो. 'सोगळे शांत हा मरे आज' असे नेहेमीप्रमाणे त्यांनी मला सांगितले होते. पण तरीही क्राईम रिपोर्टरला सतर्क राहावेच लागते म्हणून मी रुटीन राऊंडस घेण्याच्या तयारीत होतो. 

साधारणतः रात्री दहाच्या दरम्यान न्यूज रूममधील फोन खणखणला. 'पर्वरी येथे काही गडबड झाली आहे काय? तिथे का गर्दी जमली आहे?"  एक वाचक विचारत होता.  'हो का? मी चौकशी करतो' असे सांगून मी फोन खाली ठेवला आणि संबधित पोलीस स्टेशनकडे चौकशी केली. कुठे काही तणाव, गडबड नाही, असे मला सांगण्यात आले.  दहा-पंधरा मिनिटानंतर दुसऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. ''म्हापसा-पणजी रस्त्यावर काय चालले आहे, कुणा मोठया व्यक्तीला पकडले आहे काय?  कसलो बोबाळ असा तिंगा?'' या दुसऱ्या फोननंतर  मात्र मी दोन-तीन पोलीस स्टेशनना फोन लावले, वरच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. सर्वांनी काही मोठी घटना झाली आहे याचा इन्कार केला. त्यानंतर वाचकांकडून असे फोन येत राहिले आणि मी पुन्हापुन्हा अधिकाधिक सीनियर पोलीस अधिकाऱ्यांशी याविषयी खातरजमा करत राहिलो.

त्यावेळी त्या छोटयाशा न्यूजरूममध्ये स्पोर्टस रिपोर्टर जोव्हितो लोपीस आपल्या बातम्या  टाइपरायटरवर टाईप करत होता. आपल्या खास शैलीत केवळ एका तर्जनीने मात्र वेगात बातम्या टाईप करत असताना फोनवरील माझ्या संभाषणाकडे त्याचे लक्ष होते. रात्री उशिरा परत एका वाचकाचा फोन आला आणि मी थेट गोव्याच्या टॉप कॉपला म्हणजे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिसा यांना पुन्हा एकदा फोन लावला. पर्वरी येथे कोणी बडा मासा गळाला लागला आहे काय अशी विचारणा करणाऱ्या लोकांचे पुन्हापुन्हा फोन येत आहेत, आपण यासंदर्भात प्लीज पुन्हा चौकशी करताल का असे मी त्यांना विचारले.  "कामिल, यू सी, इफ समथिंग लाईक दॅट हॅपन्स, आय विल बी द फर्स्ट पर्सन टू नो दॅट! यो नो इट!" आयजीपींचे ते उत्तर खरेच होते पण ते स्वतः ती बातमी माध्यमांपासून दडपून ठेवत असले तर?

फोनवरचे माझे हे संभाषण जोव्हितोने ऐकले आणि तो आपल्या खुर्चीवरून उठला, आपली झालेली बातमी कंपोझिगला पाठवत तो म्हणाला, "कामिलो, लेटस नॉट वेस्ट टाइम...कम विल रश टू द स्पॉट."  जोव्हितो माझ्यापेक्षा अनेक वर्षांनी सीनियर होता. त्या एकमजली कौलारू ऑफिसाच्या लाकडी फळ्यांच्या जिन्याने धावतच खाली आल्यानंतर जोव्हितोच्या स्कुटरने आम्ही पर्वरीच्या दिशेने निघालो.

पर्वरीला 'ओ कोकेरो'  या हॉटेलपाशी आल्यानंतर तेथे सामसूम दिसली. मात्र तेथे आलेले साध्या वेशातील पोलीस काही वेळापूर्वीच म्हापशाला गेले असे  कळले आणि आम्ही म्हापशाकडे कूच केले. तिथे चौकशी करण्याची गरज भासली नाही कारण त्या शहरात प्रवेश करताच सिटी बस स्टॅण्डसमोर असलेल्या म्हापसा रेसिडेन्सी या गोवा पर्यटक विभागाच्या हॉटेलसमोर मोठी गर्दी जमलेली दिसत होती.

हॉटेलमधून काही माणसे बॅगा घेऊन बाहेर असलेल्या टॅक्सीच्या डिकींमध्ये भरत होते. साध्या वेशात असले तरी ते सर्व जण पोलीस होते हे कळत होते. त्यांचे हॉटेलमधून चेक-आऊट चालले होते आणि काय घडले आणि घडते आहे याची मी आणि जोव्हितो त्या गडबडीत चौकशी करत  होतो. त्यांच्यापैकी कुणीही तोंड उघडायला वा प्रेस रिपोर्टेरशी बोलायच्या मनस्थितीत नव्हता. तरीही आम्ही दोघांनीं त्यापैकी काहींना बोलते केले आणि जे ऐकले ते धक्कादायकच होते. 

समोर टॅक्सींमधून निघण्याच्या तयारीत असलेले हे लोक मुंबई पोलिसांची टीम होती आणि काही तासांपूर्वीच त्यांनी दिल्लीतील तिहार तुरुंगातून पळालेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचा खतरनाक गुन्हेगार चार्ल्स सोबराजला पर्वरीच्या हॉटेलातून पकडले होते. 

महिलांवर बलात्कार करून नंतर त्यांचे खून केल्याचा आरोपावरून चार्ल्स सोबराज या फ्रेंच नागरिकाला भारतात सजा होऊन त्याला तिहार तुरूंगात ठेवण्यात आले होते. अशाच प्रकारचे अनेक गुन्हे त्याने इतर देशांतही केल्याने त्या देशांतही त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. विशेष म्हणजे तिहार येथील त्याची सजा पूर्ण होण्यास थोडासाच कालावधी बाकी असतानाच तेथून चार्ल्सने पलायन  केले होते. त्याकाळात म्हणजे १९८०च्या दशकातही तिहार एक अभेद्य तुरुंग समजला जाई. इतर देशांनाही हवा असणारा हा कुख्यात गुन्हेगार तिहार तुरुंगातून पळाल्याने त्यावेळी मोठी खळबळ माजली होती. देशातील अनेक राज्यांतील पोलिसांनीं त्याला पकडण्यासाठी जोरदार मोहीम राबविली होती. मात्र त्यांना यश येत नव्हते. त्या रात्री पर्वरी येथील 'ओ  कोकेरो' या एका बंगलेवजा पण  नामांकित हॉटेलात मधुकर झेंडे या पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील मुंबई पोलिसांच्या तुकडीने चार्ल्सच्या अक्षरश:  मुसक्या बांधण्यात  यश मिळवले होते. अनेक दिवस शोधमोहीम राबवून मुंबई पोलिसांनीं चार्ल्सचा मागे काढला होता. साध्या वेशात आपल्या सहकाऱ्यांसह त्या हॉटेलात बसलेल्या पोलीस इन्स्पेक्टर झेंडे यांनीं शिताफीने पकडले होते. त्यावेळी चार्ल्सबरोबर एका पिस्तूलही होते. दोरखंडाने चार्ल्सची गठडी आवळून त्याला टॅक्सीत टाकून पोलिसांनी त्याला ते मुक्कामी असलेल्या म्हापशातील हॉटेलात आले होते. तेथून आपले सामान घेऊन आता ते मुंबईला निघाले होते. 

चार्ल्स सोबराजची गठडी आवळून त्याला रात्रीच मुंबईला नेण्याची त्यांची धावपळ मी समजू शकत होते. कुणाही व्यक्तीला अटक केल्यानंतर चोवीस तासांच्या  कालावधीत त्यास न्यायालयासमोर हजर करावे लागते. चार्ल्सला मुंबईच्या तुरुंगात ठेवण्यासाठी आणि तिथल्याच न्यायालयात हजर करण्यासाठी ते लगेचच गोव्यातून निघत होते. मुंबई पोलिसांनी चार्ल्स सोबराजच्या अटकेबाबत गोवा पोलिसांना पूर्णतः अंधारात ठेवले होते आणि त्यांना याबाबतचे कुठलेही श्रेय न देण्यासाठी मुंबई गाठण्याची त्यांची घाई चालू होती.       

रात्रीचे अकरा वाजले होते. मुंबई पोलिसांनी भाड्याने घेतलेल्या त्या पाचसहा टॅक्सींनी म्हापसा सोडून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला तसे जोव्हितो आणि मीसुद्धा विरुद्ध दिशेने  म्हणजे पणजीकडे निघालो. ही बातमी घेण्यासाठी आमच्या संपादकांनी म्हणजे बिक्रम व्होरा यांनी 'स्टॉप द प्रेस' आदेश दिला होता, तरी लवकरात लवकर ही स्टोरी फाईल करणे जरुरीचे होते. जोव्हितोने वेगाने टाईप केलेली ती स्टोरी दुसऱ्या दिवशी 'जोव्हितो लोपीस अँड कामिल पारखे' या जोड बायलाईनने त्या दैनिक वृत्तपत्रातच्या पहिल्या पानावर आठ कॉलममध्ये प्रसिद्ध झाली. आमच्या वृत्तपत्राबरोबर एका प्रतिस्पर्धी इंग्रजी वृत्तपत्रानेही ती बातमी विस्तृत स्वरूपात छापली होती. ती बातमी आम्हालाही मिळाल्याने संपादक व्होरा, वृत्तसंपादक एम एम मुदलीयार  हे दोघेही जोव्हितो आणि माझ्यावर खूष होते. माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतील ती एक मोठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची बातमीही ठरली. 

बातमीदाराच्या कारकिर्दीत स्कुप किंवा एक्स्ल्युसिव्ह बातम्या फार क्वचितच असतात. हे सर्वच स्कुप अगदी ठरवून, नियोजन करून मिळत नसतात. कधीतरी अचानक बातमीदाराला स्कुपचे घबाड मिळते आणि त्याच्या/तिच्या करियरमधील एका खूपच स्मरणीय बातमी होते. यात कधी नशिबाचाही वाटा असतोच. दरदिवशी प्रत्येक रिपोर्टरला आपापल्या ठरलेल्या बीट किंवा क्षेत्रातील बातम्यांचा रतीब घालावाच  लागतो, त्यापैकी काही एक्स्ल्युसिव्ह असणे साहजिकच असते. पत्रकारितेत अनेक वर्षे घालविलेल्या पत्रकारांच्या बॉसला म्हणजे संपादकांनाही याची कल्पना असते. त्यामुळे एखादी अगदी रुटीन पण महत्त्वाची बातमी चुकली तर त्याचा फारसा बाऊ केला जात नाही. मात्र समाजावर मोठी इम्पॅक्ट असणारी बातमी चुकली तर संबंधित बातमीदारासह संपादकालाही त्याची किंमत चुकवावी लागते. चार्ल्स सोबराजला पकडल्याची बातमी त्या रात्री आम्हाला मिळाली नसती तर दुसऱ्या दिवशी आमच्या ऑफिसात काय झाले असते याची कल्पनाही  करता येत नाही. 

भारतातील तुरूंगातून १९९७ साली सुटल्यानंतर चार्ल्स पॅरिसला स्थायिक झाला होता.  देखणे व्यक्तिमत्व, अत्यंत बुद्धिमान असलेला आणि सुंदर तरुणींना भुरळ लावण्याची कसब लाभलेल्या या 'सेलेब्रिटी क्रिमिनल' चार्ल्सने आपले हे गुण  कायम वाईट कर्मे करण्यासाठी वापरले. अनेक तरुणींचे खून केल्याचे आरोप त्याच्यावर होते. त्यामुळे त्याने आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे  या दुष्कर्मांसाठी सजा भोगण्यासाठी खर्च केली. काही वर्षांपूर्वी तो नेपाळला पर्यटक म्हणून आला असता कुणी तरी त्याला ओळखले आणि  पोलिसांना कळवले.  नेपाळ येथील एका जुन्या खुनासंदर्भात चार्ल्सला पुन्हा अटक झाली. वयाची ७४ वर्षे पूर्ण केलेला चार्ल्स आजही नेपाळ येथे जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे.

[कामिल पारखे यांच्या 'बदलती पत्रकारिता' या पुस्तकातील एक प्रकरण (सुगावा प्रकाशन,पुणे २०१९ )]

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com