Goa Election 2022: कुंकळ्ळीत काँग्रेस सरकारची प्रतीक्षा

युरी आमदार बनणार आणि काँग्रेस सरकार स्थापन करणार असे सत्ताधारी नगरसेवकांनी सांगितले
Congress
CongressDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: कुंकळ्ळी पालिकेवर लक्ष्मण नाईक यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका मंडळ स्थापन झाल्यास वर्ष व्हायला आले. मात्र, या एका वर्षात पालिका मंडळाने नाव घेण्यासारखे एकही काम केल्याचे दिसत नाही. चौदा नगरसेवकांपैकी एक नगरसेवक नको ही भानगड म्हणत विदेशात गेले. उरलेले बारा नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी केवळ बैठका घेण्याशिवाय कोणतेच काम केले नसल्याचे आम्ही नव्हे नगरसेवकच सांगतात. विद्यमान आमदार क्लाफास डायस व सत्ताधारी पालिका मंडळातील वैरामुळे कुंकळ्ळीचा विकास खुंटला.

Congress
व्यावसायिक सलमान खानची गोव्यात अटक व सुटका

आता युरी आमदार बनणार काँग्रेस सरकार स्थापन करणार व नंतर पालिका मंडळ कामास लागणार असे सत्ताधारी नगरसेवक सांगतात. आता हे म्हणजे कोल्हा आणि बैलाच्या कथेसारखे झाले. त्यामुळे नगरसेवकांनी उगाच कोल्ह्याप्रमाणे बैलाच्या मागे पळू नये असे नागरिक बोलू लागले आहेत.

Congress
गोव्यात पोलिस भरती प्रक्रिया स्थगित ठेवा : काँग्रेस

सार्दिनसरांची मास्तरकी

काँग्रेस गोव्यात सत्तेवर आली, तेव्हा त्या मंत्रिमंडळात कुडतरीत शिक्षक असलेले फ्रान्सिस सार्दिन मंत्री झाले व त्यांना शिक्षण खाते मिळाले. नंतर त्यांच्याकडील ते खाते का काढून घेतले हा वेगळा व स्वतंत्र मुद्दा आहे. आता लोकसभा खासदार असलेल्या फ्रान्सिस सार्दिन यांनी शाळा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला घेतलेल्या आक्षेपावरून त्यांच्यातला शिक्षक व पालक दोघेही लुप्त झाले की काय अशी शंका शिक्षकच घेऊ लागले आहेत. दुसरीकडे महिला काँग्रेस अध्यक्षांपाठोपाठ खासदाराने केलेल्या विरोधामुळे काँग्रेसचा शाळा सुरू करायला विरोध आहे का असा मुद्दा चर्चिला जाऊ लागला आहे.

मताची किंमत बोला!

राज्यात टपाल मतांचा विषय बराच गाजत आहे. त्याचे पडसाद ताळगावतही पडत आहेत. टपाल मते मिळवण्यासाठी ताळगावातील काही उमेदवारांचे एजंट सध्या मतदारांचा शोध घेत आहेत. मताची किंमत त्यांनाच ठरवण्यास सांगून मतपत्रिका स्वतःकडे घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ताळगावात अटीतटीची लढत झाल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या मतांचा एकप्रकारे लिलाव सुरू आहे. कितीही किंमत मोजून ही मते मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. टपाल मतदारही किंमती ऐकून भारावून जात आहेत व आमिषाला बळी पडत आहेत. या मतदारांना पाच वर्षांनी एकदा आयतीच संधी चालून आली आहे.

रोख रक्कम किंवा वस्तूही देण्याचे आमिष दाखवले जात आहे. काहीजण उमेदवाराचा आशीर्वाद पुढे मिळावा यासाठी स्वतःच मतपत्रिका घेऊन जाऊन मतदान केल्याचे दाखवून एकनिष्ठ असल्याचे दाखवून देत आहेत. काहींनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबण्याचे ठरविले आहे. त्यामुळे मताची किंमत आणखी शेअरबाजाराप्रमाणे वाढेल अशी आशा त्यांना आहे.

सरकारी कारभार

‘आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं’ असे सरकारी कारभाराबाबत म्हटलं जातं. एक खातं काम हाती घेतं, पण दुसऱ्या विभागाला त्याचे काहीच पडून गेलेलं नसतं. यात सर्वसामान्य लोक मेटाकुटीस येतो. मडगावात त्याचा सध्या प्रत्यय येत आहे. रेल्वे उड्डाण पुलाची दुरुस्ती सुरू असल्याने नावेलीहून मडगावात येणारी वाहतूक रावणफोंड, आकेमार्गे वळविली आहे, पण वाटेत सर्व मार्गावर वाहने, शहर बसगाड्या उभ्या असतात. त्यामुळे या वाहनांचा मोठा खोळंबा होतो. ही वाहतूक वळविताना असा खोळंबा होणार नाही याची काळजी घेण्यास वाहतूक पोलिसांना सांगण्याची गरज होती, पण ते तर असतात दुचाकींच्या मागावर. मग ही समस्या सुटणार कशी?

अतिउत्साह की महत्त्वाकांक्षा?

लुईझिन असो किंवा किरण कांदोळकर. त्यांची दीदींची तृणमूल ओळखण्यात गफलत झाली हे मान्य करायलाच हवे. नावेलीच्या लुईझिनचे एकवेळ ठीक आहे. कारण त्यांनी बहुतेक पदे भोगून झालेली आहेत व ते निवृत्तीकडेही झुकलेले आहेत, पण किरणरावांचे तसे नाही. अजून त्यांच्यात राजकारणाची खुमखुमी, हिंमत व त्यासाठी लागणारी ताकदही आहे. म्हणून तर त्यांनी भाजपशी पंगा घेऊन फॉरवर्डशी सोयरीक केली, पण तेथे राहून आपल्या सौना थिवीत उमेदवारी मिळेल याची खात्री वाटेनाशी झाल्यावर ते सरळ तृणमूलला जवळ करून मोकळे झाले. त्या दोघांना तिकिटेही मिळाल्या, पण परिणाम काय तर जी गत लुईझिनची तीच त्यांचीही. लुईझिन यांच्याकडे निदान राज्यसभा खासदारपद तरी आहे. किरण यांची गत ‘बाप्पाय ना, पुडवेय ना’ अशी झालीय. कारण पक्षाने ज्याअर्थी त्यांना राजीनाम्याची सूचना केली आहे असे सांगण्यात येते, त्याअर्थी त्यांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यातच जमा आहे. पक्ष बदलण्याचा अतिउत्साह त्यांना नडला असे म्हणायचे का?

Congress
मोपा लिंक रोडसाठी झाडांची अवैध कत्तल रोखण्याची मागणी

हे खरे लोकप्रतिनिधी

मतदान झाल्यानंतर अनेकजण प्रचार काळातील थकवा घालवायला श्रमपरिहाराला निघून गेले, तर अन्य काहींनी झालेल्या मतदानाचा आढावा घेण्यात धन्यता मानली आहे. काणकोणमधील काँग्रेस उमेदवार जनार्दन भंडारी हे एक वेगळेच रसायन. स्वस्थ बसणे त्यांच्या स्वभावात नाही. त्यामुळे भाटपाळ व बाब्रे पुलाचे निमित्त करून बंद केलेली प्रवासी बस वाहतूक व त्यामुळे तब्बल पंधरा कि.मी. अंतरातील प्रवासी व विद्यार्थी यांच्या गैरसोयीचा विषय घेऊन त्यांनी स्थानिक उपजिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडली, तेव्हा अनेकांनी हे खरे लोकप्रतिनिधी असे संबोधले. ∙∙∙

खाणीचे गाजर...

राज्यातील सर्वात मोठा व्यवसाय असलेला खाण उद्योग बंद झाल्यास दहा वर्षे लोटली, पण कायदेशीर मार्गाने अजून काही खाणी सुरू झालेल्या नाहीत. मागच्या काळात भाजप सरकारने प्रत्येक वेळेला केवळ फसवी आश्वासने दिली. आताही निवडणुकीवेळी प्रत्येक राजकीय पक्षांनी खाणी तीन ते सहा महिन्यांत सुरू करू अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली आहे. मतांसाठी काहीही... असा हा प्रकार झाला आहे. आतापर्यंत केवळ आश्वासनांच्या हिंदोळ्यावरच खाण अवलंबित झुलत आहेत.

खाणव्याप्त भागात काही लोकांची स्थिती काय आहे हे आश्वासने देणाऱ्या बहुतांश राजकारण्यांना माहीतच नाही. केवळ मतांसाठी खाण अवलंबितांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार चालला आहे हे पुरते अवलंबितही आता जाणून आहेत. शेवटी प्रश्न न्यायालयात आहे आणि खरे म्हणजे कुणालाच माहीत नाही खाणी कधी सुरू होणार ते.

एल्विस यांचे राजकीय भवितव्य काय?

राजकारणात शहाणी व हुशार माणसे चालत नाहीत म्हणतात ते खरे. अन्यथा या देशाचा शिक्षणमंत्री विद्यापीठाचा डीन बनला असता आणि आरोग्यमंत्री डॉकटर, तर क्रीडामंत्री क्रीडापटू बनला असता. मात्र, तसे होत नाही. या देशात काही अपवाद सोडले, तर हुशार व शिक्षित लोक राजकारणात यशस्वी होत नाहीत. एल्विस गोम्स यांनी राजकारणात येण्यासाठी आयएएस पदाची नोकरी सोडली. आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित झाले, पराभूत झाले, आता काँग्रेस पक्षाने त्यांना पणजीत लढण्यास पाठविले होते. उत्पल व बाबुश यांच्या भांडणाचा फायदा एल्विसना होणार अशी भाबडी आशा त्यांच्या समर्थकांना आहे. मात्र, एल्विस साहेब हरले तर? त्यांचे राजकीय भवितव्य काय? एल्विस साहेब जिंकले, तर मंत्री होणार आणि हरले तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनणार असे एल्विस समर्थक सांगतात. एल्विस यांच्या भवितव्याचा विचार तुम्हाला नको असेही एल्विस समर्थक म्हणतात. आता पाहूया काय होते ते दहा तारखेला.

कोणाची होणार सरशी?

काविळ झालेल्यांना सगळेच पिवळे वाटते तशी गत आजच्या राजकारण्यांची झाली आहे. आपला पराभव होणार हे कोणीच स्वीकारायला तयार नाहीत. आठपैकी सातजण हरणार हे जनतेला नक्कीच माहिती आहे, पण सांगेच्या बाबतीत कोणी हार मानायला तयारच नाही. प्रत्येकजण मीच जिंकणार म्हणून परत परत दुसऱ्यांना कमी मते पडणार. कशी विभागणी केली तर आपण कागदावर जिंकणार ते करण्यासाठी वेळ वाया घालवू लागले आहेत. लोकही या गोळा बेरीजची मजा लुटताना आता काही दिवस मीच जिंकणार या धुंदीत उमेदवार राहू देत असे म्हणू लागले आहेत. एकदा निकाल लागला की आठपैकी सातजणांची काविळ चटकन उतरणार आहे.

सावित्री ‘किंगमेकर’ बनल्या तर!

तसे राजकारण जर तर वर चालत नाही हे सगळेच जाणतात, तरीही काही तथाकथित राजकीय विश्लेषक आपल्यापरीने राज्यात 14 तारखेला पार पडलेल्या निवडणुकीचे गणित मांडत आहेत. सांगे मतदारसंघातील सावित्रीभक्त त्रिमूर्ती तर मॅडमच जिंकणार असा दावा करीत आहेत. एकवेळ बाबू हरणार. मात्र, सावित्री मॅडम जिंकणारच असा दृढ विश्वास या त्रिमूर्तीला आहे. खरेच बाबू हरले आणि सावित्री जिंकल्या तर? तर सावित्री जनता दरबार भरविणार व बाबू देवधर्म करणार असे आम्ही नव्हे तेच सावित्रींचे त्रिकुट म्हणत आहे. आता सावित्रीच्या नशिबात राजयोग व बाबूच्या नशिबात देवकार्य लिहून ठेवले आहे की आणखी काय हे निकालानंतरच कळणार आहे.

मतांची लाखोंची उड्डाणे

राज्यात सध्या पोस्टल मतदानाची चर्चा जोरात असून काही मतदारसंघांत लढत अत्यंत चुरशीची बनल्याने आतापर्यंत पोस्टल मतांची किंमत हजारोंत होती, ती आता लाखोंत गेल्याची चर्चा सरकारी कर्मचारी आणि पोलिसांत रंगू लागली आहे. निवडणुका विमुक्त वातावरणात आणि निःपक्षपातीपणे व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोग कटाक्षाने प्रयत्न करत आहे. मतासाठी आमिष दाखविणे, भेटवस्तू आणि पैशाच्या स्वरूपात लाच घेऊन मत विकणे कायदेशीर गुन्हा असताना शिक्षित कर्मचारी वर्गच या मतांच्या बाजारात गुंतल्याचे दिसून आल्याने आता आयोगालाच कारवाईची नोटीस काढावी लागली आहे.

दलालांनो सावधान...

दलाली खाणारे काहीही व कशाचीही दलाली खातात आणि ढेकरही देत नाहीत. आपण बांधकाम, जमीन विक्री या क्षेत्रात दलालीची माहिती ऐकली असणार. आता राजकारणातही दलाली खाणारे तयार झाले आहेत. ‘आपण अमकी मते तुमच्या पारड्यात टाकतो, अमकी दलाली द्या’ असे सांगणारे अनेक आहेत व अशी मोठी दलाली अनेकांनी खाल्ली आहे. मात्र, दलाली घेतलेली मते पडली नाही, तर तुमची खैर नाही. असा संदेश म्हणे दलाली दिलेल्यांनी त्या लोकांकडे पाठविला आहे. कोणाला किती दलाली दिली याचा हिशोब म्हणे त्या उमेदवाराकडे आहे. जर मते कमी मिळाली, तर दलालांच्या पाठीवर चाबूक बसणारच असा संदेश म्हणे त्या अमीर उमेदवारांनी पाठविला आहे.

येणारी राजवट कुणाची?

26 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत गोव्यात ‘किंक मोमो’ची राजवट असणार आहे. मात्र, 10 मार्चनंतर येणारी राजवट कुणाची असेल हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. भाजप म्हणते आहे आपले सरकार येणार, कॉंग्रेस म्हणतेय आमचेच सरकार येणार. मात्र, पुढील पाच वर्षांसाठी गोव्यात कुणाची राजवट असेल ते 10 मार्च रोजीच कळेल. मात्र, त्यापूर्वी मोमोच्या राजवटीत सहभागी होऊन खाऊया पिवूया मजा करूया.

स्वप्नातील उड्डाणे...

विधानसभेसाठी मतदान एकदाचे पार पडले, परंतु मी मी म्हणणाऱ्या अनेक उमेदवारांचे आतापासूनच धाबे दणाणले आहेत, त्यामुळे उसने अवसान आणून काही उमेदवार आपणच जिंकणार असा कांगावा करून मंत्री बनण्याची स्वप्ने रंगवत आहेत. प्रत्यक्षात मात्र १० मार्चला निकाल लागेल तेव्हा बऱ्याच प्रस्थापितांच्या स्वप्नातील ही विमान उड्डाणे झरकन खाली येतील अशी चर्चा सध्या रंगत आहे. काहीजण तर म्हणत आहेत, सत्तेवर असताना ज्यांनी कुकर्मे केली आहेत, त्यांना त्याचे फळ मिळणार आहे आणि त्याबरोबरच त्यांची राजकीय कारकीर्दही संपुष्टात येईल.

ती कोण?

सार्वजनिक बांधकाम घोटाळा प्रकरणानंतर आता विरोधकांनी पोलिस भरती घोटाळा प्रकरण उजेडात आणले आहे. खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातही पोलिस भरतीसाठी उमेदवारांकडून 18 ते 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांनी केला आहे. एक महिला हे पैसे गोळा करत फिरत होती असा आरोप त्यांनी केला आहे. ही महिला कोण असे विचारले असता ते तुम्हीच शोधून काढा असे कामत पत्रकारांना सांगतात. कोण असेल बरे ही महिला? ∙∙∙

दलालांनो सावधान...

दलाली खाणारे काहीही व कशाचीही दलाली खातात आणि ढेकरही देत नाहीत. आपण बांधकाम, जमीन विक्री या क्षेत्रात दलालीची माहिती ऐकली असणार. आता राजकारणातही दलाली खाणारे तयार झाले आहेत. ‘आपण अमकी मते तुमच्या पारड्यात टाकतो, अमकी दलाली द्या’ असे सांगणारे अनेक आहेत व अशी मोठी दलाली अनेकांनी खाल्ली आहे. मात्र, दलाली घेतलेली मते पडली नाही, तर तुमची खैर नाही.

असा संदेश म्हणे दलाली दिलेल्यांनी त्या लोकांकडे पाठविला आहे. कोणाला किती दलाली दिली याचा हिशोब म्हणे त्या उमेदवाराकडे आहे. जर मते कमी मिळाली, तर दलालांच्या पाठीवर चाबूक बसणारच असा संदेश म्हणे त्या अमीर उमेदवारांनी पाठविला आहे.

अतिउत्साह की महत्त्वाकांक्षा?

लुईझिन असो किंवा किरण कांदोळकर. त्यांची दीदींची तृणमूल ओळखण्यात गफलत झाली हे मान्य करायलाच हवे. नावेलीच्या लुईझिनचे एकवेळ ठीक आहे. कारण त्यांनी बहुतेक पदे भोगून झालेली आहेत व ते निवृत्तीकडेही झुकलेले आहेत, पण किरणरावांचे तसे नाही. अजून त्यांच्यात राजकारणाची खुमखुमी, हिंमत व त्यासाठी लागणारी ताकदही आहे. म्हणून तर त्यांनी भाजपशी पंगा घेऊन फॉरवर्डशी सोयरीक केली, पण तेथे राहून आपल्या सौना थिवीत उमेदवारी मिळेल याची खात्री वाटेनाशी झाल्यावर ते सरळ तृणमूलला जवळ करून मोकळे झाले. त्या दोघांना तिकिटेही मिळाल्या, पण परिणाम काय तर जी गत लुईझिनची तीच त्यांचीही. लुईझिन यांच्याकडे निदान राज्यसभा खासदारपद तरी आहे.

किरण यांची गत ‘बाप्पाय ना, पुडवेय ना’ अशी झालीय. कारण पक्षाने ज्याअर्थी त्यांना राजीनाम्याची सूचना केली आहे असे सांगण्यात येते, त्याअर्थी त्यांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यातच जमा आहे. पक्ष बदलण्याचा अतिउत्साह त्यांना नडला असे म्हणायचे का?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com