गोव्यात विधानसभा निवडणुका होऊन एक वर्ष आणि दोन महिने झाले आहेत. राज्य सरकारचा हा सुरवातीचा कार्यकाळ आहे. राज्यात भाजप सत्तेत असल्याने साखळी व फोंडा नगरपालिकेत त्यांना फायदा झाला, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.
जर सरकारचा शेवटचा कार्यकाळ असता तर निकाल वेगळाच लागला असता, असेही सरदेसाई यांनी पुढे सांगितले. साखळी व फोंडा नगरपालिका निकाल तसा महत्त्वाचा नाही.
स्थानिक प्रश्न घेऊन झालेल्या या दोन्ही शहरांतील नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आपलीसुद्धा या दोन्ही निवडणुकांमध्ये कसलीही भूमिका नव्हती. मी तिथे प्रचाराला किंवा कुणाला भेटायला सुद्धा गेलो नव्हतो, असेही सरदेसाई यांनी सांगितले.
रविवारी साखळी व फोडा पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. साखळी पालिका निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप गटाने पूर्ण बहुमत प्राप्त केले तर फोंडा पालिका निवडणुकीत भाजप पुरस्कृत आमदार रवी नाईक यांच्या नेतृत्वाखालील फोंडा नागरिक समितीचे आठ नगरसेवक निवडून आले.
दोन बिनविरोध नगरसेवक निवडून आल्यानंतर एकूण दहा प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व दहाही जागा भरघोस मतांनी जिंकून भाजपने साखळी मतदारसंघातील अधिराज्य सिद्ध केले आहे.
रवी नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर आपला करिष्मा कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले असून फोंडा पालिकेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.