
गेल्या कित्येक महिन्यांपासून फातोर्डाचे विजयबाब मडगावमध्ये प्रवेश करणार, अशा बातम्या पसरविल्या जात आहेत. कदाचित फातोर्डा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाला, तर उषा मॅडम फातोर्डातून व विजयबाब मडगावातून आगामी निवडणूक लढवतील, अशी शंका सुद्धा व्यक्त केली जाते. सध्या तरी विजयबाब आमदार दिगंबरबाबवर टिका करण्याची एकही संधी सोडीत नाहीत. मडगावचे काही नगरसेवक सुद्धा विजयबाबच्या संपर्कात आहेत, असेही बोलले जाते. आता विजयबाब स्वतः मडगावहून निवडणूक लढविणार की आपला उमेदवार ठेवणार याबद्दल सुद्धा चर्चा सुरु आहे. चिराग नायक हे विजयबाबसाठी चांगले ऑप्शन असू शकतील, असेही बोलले जाते. चिरागने आपण कॉंग्रेस प्रवेश करणार, असे काही महिन्यांपूर्वी म्हटले होते. पण अजून हे प्रत्यक्षात घडलेले नाही. चिरागबाबसुद्धा ‘सेफ गेम’ खेळत आहेत. पण विजयबाब व चिराग यांची जवळीक पाहता चिराग ओप्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण काही गोष्टींना योग जुळून यायला पाहिजे. याच योगाची तर मडगावकर आतुरतेने वाट पाहतात नक्की. ∙∙∙
शनिवारपासून पुढील तीन दिवस धारगळमध्ये सनबर्न या ईडीएम महोत्सवाची धामधूम सुरू राहणार आहे. या महोत्सवाबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. सनबर्नला पेडण्यातील एका लोकप्रतिनिधीने लोकांना विश्वासात घेत जोरदार विरोध दर्शविला होता. मात्र, याच आमदाराचे बॅनर महोत्सवस्थळी लागलेले दिसताहेत. त्या बॅनर्सचा फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोवर कोकणी भाषेत कॅप्शन लिहिण्यात आली आहे ती म्हणजे, ‘हाका म्हणतात खरो विरोध’. आता आमदार साहेबांचा हा विरोध नेमका कशासाठी लोकांच्या डोळ्याला पाने पुसण्यासाठी होता की आपले वैयक्तिक ‘आर्थिक’ स्वार्थ साध्य करण्यासाठी? काहीही असले तरी या बॅनर्समुळे लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर तसेच हेतूवर संशय व्यक्त केला जातोय, एवढे नक्की.∙∙∙
यंदा जुने गोवेत शवप्रदर्शन असल्यामुळे यंदाचे फेस्त कधी सुरू झाले आणि कधी संपणार? हेच सर्वसामान्यांना समजले नाही. त्यामुळे बरेच जण फेस्त कधी संपणार? २०२४ मध्ये सुरू झालेले फेस्त २०२५ मध्ये संपणार आहे. त्यामुळे येथील फेरीत शनिवार, रविवारी येणाऱ्यांना पुन्हा पुन्हा यायला मिळत आहे. पण खरेदी तरी काय करणार? बरेच साहित्य राज्यातील जत्रोत्सव, कालोत्सवातही मिळू लागले आहे. त्यामुळे फेस्त फेरीत कधी कोणीच फिरकत नाहीत, त्यामुळे विक्रेतेसुद्धा ‘कब खत्म होगा’ हे फेस्त असे म्हणू लागलेत. सुरक्षेसाठी असलेले पोलिसही थोडे सुस्तावल्याने रात्रीच्या वेळी ‘वन-वे’तून अनेकजण गाड्या हाकतात. त्यावर नियंत्रण हवे. बाहेरून फेस्ताला येणारे लोक कमी झाले असून पर्यटकच शवप्रदर्शनला भेट देत आहे, तेही म्हणतात ‘ओल्ड गोवा में कितने दिन फेस्त है?’ अशी वेगवेगळी चर्चा फेस्ताबाबत सुरू आहे. ∙∙∙
गोव्यातील पर्यटनाविषयी एका नेटकऱ्याने एका संस्थेचा अहवाल देऊन वास्तव समाजासमोर आणले. हे वास्तव खोटे असल्याचा दावा करीत पर्यटन खात्याने त्या नेटकऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचे हत्यार उपसणार असल्याचे जाहीर केले. मात्र, केवळ एका घटनेने कोणाकोणावर सरकार कारवाई करणार आहे. कारण सध्या समाजमाध्यमांत गोव्यातील पर्यटक संख्या घटण्यामागील कारणे ही स्थानिक वृत्तांचा आधार घेऊनच नेटकऱ्यांनी तयार केलेले व्हिडिओ व्हायरल होत आहेत. वर्षाच्या शेवटी व नूतन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, आता वर्षाच्या शेवटचे चार-पाच दिवस राहिलेले असताना अशा प्रकारचे व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत असल्याने त्याचा परिणाम नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. काहींनी गोव्यातील महागाईचा फटका पर्यटनाला बसतोय, हा पर्यटनाशी संबंधित घटकांचा आहे तो मात्र नाकारता येणार नाही हे नक्की आहे. याचा विचार सरकारने करायलाच हवा कारण अजून वेळ गेलेली नाही. ∙∙∙
धारगळमधील सनबर्नमध्ये दिल्लीतील एका युवकाचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. वास्तविक न्यायालयाच्या निर्देशानुसार सनबर्न महोत्सव व्हायला हवा होता, पण तसा तो होत नाही, हे या बळीने सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे सनबर्नचे आकर्षण केवळ पर्यटकांनाच नव्हे तर गोमंतकीय युवायुवतींनाही आहे. सनबर्नच्या ठिकाणी तैनात पोलिसांच्या ओळखीने गोमंतकीय युवक युवती सनबर्नमध्ये सहभागी होत असतात, हे आता लपून राहिलेले नाही. आपण अमूक एका गेटवर उभा आहे, तेथे ये, असा संदेश पाठवला जातो. या युवक-युवतीत शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील युवक-युवतींचाही समावेश असतो, असे खुद्द पोलिस खाजगीत बोलताना सांगतात, त्यामुळे सनबर्न महोत्सव म्हणजे सगळी अंदाधुंदी असल्याचेच स्पष्ट होत आहे. ∙∙∙
देशात तसेच परदेशात प्रसिद्ध असलेल्या सनबर्न ईडीएम फेस्टीव्हल हा नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. एक वर्ष वगळता २००७ पासून गोव्यात सनबर्न सुरू आहे. नेहमीच सनबर्नवरून गोव्यात विरोध होतो. प्रकरण उच्च न्यायालयात जाते. त्याला जोरदार विरोध होतो, मात्र सरकारच या सनबर्न आयोजकांच्या बाजूने असल्याने तसेच अटींचे पालन करण्याची हमी आयोजक देऊन एकदा कसा तरी हा फेस्टीव्हल पूर्ण करण्यास यशस्वी होतात. या फेस्टीव्हलमध्ये अनेकदा ट्रान्स संगीत किंवा ड्रग्ज सेवनामुळे काहींना जीव गमवावा लागला आहे. कालपासून सुरू झालेल्या सनबर्न फेस्टीव्हलच्या पहिल्याच दिवशी एका तरुणाचा मृत्यू झाल्याने फेस्टीव्हललाच गालबोट लागले. फेस्टीव्हलवेळी संगीत आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. मात्र तेथे उपस्थित असलेल्या ध्वनी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ध्वनी मर्यादा ओलांडल्याचा कोणताही अहवाल दिलेला नाही. त्यामुळे तेथे आवाजाच्या मर्यादेवर देखरेख ठेवण्यासाठी असलेले अधिकारी सक्रिय आहे, की नाही, याबाबतच स्थानिकांनी संशय व्यक्त केला आहे. ∙∙∙
अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे एफडीएने कळंगुट येथे अस्वच्छ ठिकाणी बिर्याणी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून सुमारे २ हजार किलो बिर्याणी नष्ट केली होती. परंतु आज पुन्हा तेच विक्रेते १०० रूपये प्रति प्लेट बिर्याणी विक्री करताना दिसल्याचे व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे एफडीएची धास्ती राहिलेली नाही, त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे, असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे. कळंगुटमध्ये सध्या सर्व नियम धाब्यावर बसून काम करण्याची पद्धत सुरू झाली आहे. म्हणूनच आमदार मायकल लोबो यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली जात असल्याची चर्चा ऐकू येते. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.