
Velsao residents protest railway project
वास्को: वेळसाव येथे रहिवाशांच्या घरालगतचे मातीचे ढिगारे रेल्वे विकास निगमने त्वरित हटवावेत तसेच वहिवाटीचा अधिकार बहाल करावा, अशी मागणी वेळसांवच्या रहिवाशांची सोमवारी (ता. २४) झालेल्या बैठकीत केली. रेल्वेने रेलमार्ग दुपदरीकरणाचा आराखडा आमच्यासमोर ठेवावा. आम्ही त्यासंबंधी चर्चा करून निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
वेळसांवच्या सरपंच डायना गौव्हेआ यांनाही रेल्वेने त्यांचा आराखडा सादर करावा. त्यानंतर आम्ही संबंधित रहिवाशांची बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे सांगितले. निर्णय होईपर्यंत काम बंद ठेवण्याची सूचना करण्यात आल्याचे सरपंचांनी सांगितले. या बैठकीत रेल्वे विकास निगम लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी त्या जमिनीच्या भूसंपादनासंबंधीचे किंवा अधिकारसंबंधीचे कागदपत्रे दाखविण्यास असमर्थता व्यक्त केली.
वेळसांव येथे रेलमार्ग दुपदरीकरण आरंभापासून वादात सापडले आहे. दुपदरीकरणामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. तसेच सदर जमिनीचे मालक आम्ही असताना रेल्वे घुसखोरी करून तेथे रेलमार्ग घालण्याची दादागिरी करीत असल्याचा दावा जमीनमालक, घरमालक करीत आहेत.
अलिकडेच दुपदरीकरणासाठी रेल्वे विकास निगमच्या कंत्राटदाराने काही रहिवाशांच्या वहिवाटेवर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव घातल्याने तेथे वाद निर्माण झाला होता.तथापि पोलिस बंदोबस्तात त्या कंत्राटदाराने आपले काम सुरूच ठेवले होते. त्यामुळे संबंधित रहिवाशांची वहिवाट बंद झाली. त्यांची वाहने अडकून पडली आहेत.
उंच ढिगारा चढून रस्त्यावर यावे लागत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.याप्रकरणी भू सर्वेक्षण खात्यासमोर सदर प्रश्न नेला आहे. २८ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तथापि या दरम्यानही कंत्राटदाराने आपले काम सुरूच ठेवल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे.
कंत्राटदाराने वहिवाट मोकळी करून द्यावी, यासंबंधी सोमवार, २४ रोजी सरपंच डायना यांच्यासह रेल्वे विकास प्राधिकरणाचे प्रतिनिधी, संबधित रहिवाशी यांची संयुक्त बैठक झाली. याप्रसंगी रहिवाशांनी त्यांना सोसाव्या लागणाऱ्या समस्यांची यादीच ग्रामस्थांनी समोर ठेवली. आम्ही त्या जमिनीचे मालक असूनही रेल्वेने त्या जमिनीवर रेलमार्ग घालण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जर त्या जमिनींसंबंधी वाद आहे, तर रेल्वे तेथे काम कसे करते, अशी विचारणा करून ढिगारे हटवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
सरपंच डायना यांनी सदर बैठकीमागील उद्देश स्पष्ट केला. रेल्वे विकास प्राधिकरणाने आराखडा दिल्यावर त्यासंबंधी चर्चेसाठी पुन्हा बैठक बोलाविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वेच्या कंत्राटदाराने तेथील पायऱ्या तोडल्याने लोकांना रेलमार्ग ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तेथील माती हटवून वहिवाट पूर्वीप्रमाणे करा अशी लोकांची मागणी आहे. आम्ही आता कायदेशीर लढाई करणार आहोत. रेल्वेकडे कोणतीही कागदपत्रे नसतानाही रेल्वे त्या जमिनीवर आपला अधिकार गाजवित असल्याचे चित्र दिसत आहे.
ओर्विल दोरादो, सामाजिक कार्यकर्ते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.