नियम बसवले धाब्यावर! उत्तरेत किनारी भागांत अनिर्बंधपणे ध्वनिप्रदूषण; रात्री 10 नंतरही पार्ट्या

प्रशासन सुस्त : पोलिसांची डोळेझाक; खाण्या-पिण्यासह हुक्काही जोरात
Late Night Party on Goa Beach
Late Night Party on Goa BeachDainik Gomantak
Published on
Updated on

रात्री दहा वाजल्यानंतर किनाऱ्यावरील कर्णकर्कश ट्रान्स संगीत पार्ट्या बंद करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असतानाही या आदेशाचे उल्लंघन होतानाचे धक्कादायक चित्र शुक्रवारी (ता.२०) दिसून आले. मोरजी, आश्वे, मांद्रे आणि हरमल या किनारी भागात संगीत पार्ट्यांसह दारू-हुक्का पार्ट्या सुरू असल्याचे ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीला दिसून आले. हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने पर्यटन धोरणाच्या निकषाच्या आधारे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

हरमल आणि मोरजी येथे सूर्यास्तानंतर रेस्टॉरंट आणि बारचालक किनाऱ्यावरील रेतीवर टेबल मांडून खाण्या-पिण्याची आणि हुक्का ओढण्याची व्यवस्था करतात. अर्थात, किनाऱ्यावर दारू पिण्याला आणि हुक्का ओढण्याला बंदी असतानाही याचे सर्रास उल्लंघन झालेले दिसले.

स्थानिक नागरिकांचा सर्वाधिक आक्षेप आणि विरोध असतानाही ट्रान्स संगीताची वाजवले जाते. हरमल येथील ‘थिस इज इट’ या बार आणि रेन्टॉरंटला भेट दिली असता येथे रशियन डिजे पार्टी सुरू होती. मात्र, पोलिस येताच ती रात्री १० च्या सुमारास बंद करण्यात आली. मात्र ट्रान्स म्युझिक सुरूच होते. शिवाय किनाऱ्यावरील अनेक रेस्टॉरंटमध्येही ट्रान्स म्युझिक सुरू होते.

अजून शॅक उभारणी झालेली नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा न्यायालयाने रात्री ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करणाऱ्यांचे म्युझिक साहित्य जप्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. यात पोलिस, मामलेदार, उपजिल्हाधिकारी यांना न्यायालयाने तशी तंबी दिली आहे. याची सध्या तरी अंमलबजावणी दिसत आहे.

यासाठी मोरजी आणि हरमल किनाऱ्यावर साध्या वेशातील पोलिस फिरताना दिसतात. अर्थात त्यांचे या व्यावसायिकांशी संबंध कितीही मधुर असले तरी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावेच लागते. त्यामुळे या किनाऱ्यांवर दारूच्या पार्ट्या जोरात असून ट्रान्स म्युझिकही वाजत आहे.

मात्र, ते दहाच्या आत बंद होते किंवा कमी होते याचा अनुभव शुक्रवारी आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे म्युझिक साहित्य जप्त करा, असा सक्त आदेश प्रशासनाला दिला आहे. सध्या उत्तर गोव्यातील किनारी भागात त्याची कार्यवाही दिसून येत असली तरी काही ठिकाणी या ट्रान्स संगीतावर पर्यटक थिरकताना दिसत आहेत.

मोरजी, मांद्रे ‘सायलेंट झोन’

मोरजी किनारी दरवर्षी शेकडो कासवे पिलांना जन्म देतात. मांद्रे किनाऱ्यावरही हीच स्थिती आहे. म्हणून उच्च न्यायालयाने मोरजी आणि मांद्रे हे दोन्हीही किनारे ''सायलेंट झोन'' म्हणून जाहीर केले असून येथे पार्ट्यांचे आयोजन करता येत नाही.

...येथे सुरू होत्या रात्री दोनपर्यंत पार्ट्या

  • आमच्या प्रतिनिधीने मध्यरात्री १२ वाजता मोरजी किनाऱ्याला भेट दिली. येथील ‘ग्लेन ॲण्ड ग्रील’मध्ये शुक्रवारी रात्री पावणेदोन वाजेपर्यंत पार्टी सुरू होती. यात रशियन पर्यटकांचा भरणा अधिक होता.

  • म्युझिक वाजवणारे डिजेही रशियन होते. टेक्नो आणि ट्रान्स म्युझिक वाजवले जात होते हे नियमांचे उल्लंघनच आहे. याचा कर्णकर्कश आवाज मुख्य रस्त्यावर घुमत होता. आश्चर्य म्हणजे, याच रस्त्यावरून पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू होते.

पर्यटकांसोबत अरेरावी : क्लब आणि रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी १ ते २ हजार रुपयांपर्यंत प्रवेश फि आकारली जाते. एरव्ही हे हॉटेल सर्वांसाठी मोफत असते. मात्र, फि च्या देवाणघेवाणीवरून नेहमीच खटके उडतात. सुरक्षेसाठी नेमलेले खासगी बॉक्सर पर्यटकांना अरेरावी करतात आणि याचे स्वरूप नंतर मारहाणीत होते, असा अनुभव शुक्रवारी रात्री मोरजी क्लबच्या दारात पर्यटकांना आला. सुरक्षा रक्षकाने केलेल्या मारहाणीनंतर हे पर्यटक मुकाटपणे निघून गेले.

स्थानिकांचा रोष

ज्या किनाऱ्यांना लागून लोकवस्ती आहे, अशा ठिकाणी स्थानिक नागरिक सतर्क असतात. ते तातडीने पोलिस आणि प्रशासनाला फोनाफोनी करतात आणि मग पोलिसांची पळापळ सुरू होते. मग तातडीने त्या पार्ट्या बंद केल्या जातात, असे धाकू हरमलकर यांनी ‘गोमन्तक’शी संवाद साधताना सांगितले. ते म्हणाले की, सध्या पर्यटक कमी आहेत. नोव्हेंबरपासून पार्ट्यांना जोर येईल.

युरोपियनांची पाठ

उत्तर गोव्यातील बहुतांश किनाऱ्यावर युरोपियन पर्यटकांनी पाठ फिरवल्याची दिसून येते. अर्थात अद्यापही पर्यटन हंगाम सुरू झालेला नाही. तो सुरू झाल्यानंतर युरोपियन पर्यटन येतील, असा पर्यटन खात्याचा अंदाज आहे. सध्या रशियन पर्यटक दिसत असले तरी त्यांच्यावरही युक्रेन-रशियन युद्धाचा परिणाम झाल्याचे जाणवते.

कॉन्स्टेबलपासून उपअधीक्षकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्यास ही परिस्थिती निर्माण होणार नाही. न्यायालयाने निर्देश देऊनही त्याचे सर्रास उल्लंघन होत असेल तर याला प्रशासन आणि पोलिस यंत्रणाच जबाबदार आहे. या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास अशा बेकायदा बाबींवर नक्कीच निर्बंध येतील.

- ॲड. प्रसाद शहापूरकर,

सामाजिक कार्यकर्ते.

पर्यटकांसाठी रस्सीखेच ः राज्यात अद्यापही म्हणावा तसा पर्यटन हंगाम सुरू झालेला नाही. पर्यटकांची संख्याही खूपच कमी आहे. त्यामुळे अनेक बार- रेस्टॉरंट मोकळे असून मिळेल त्या पर्यटकाला पकडून आपल्या बार आणि रेस्टॉरंटमध्ये नेण्यासाठी कामगार आणि वेटर सक्रिय असल्याचे दिसते. आपलेच मासे आणि जेवण उत्तम असल्याचेही ते ठासून सांगतात.

मध्यरात्रीनंतर ‘मसाज’

उत्तर गोव्यातील मोरजी आणि हरमल किनाऱ्यावरील मसाज व्यवसाय तेजीत आहे. हा व्यवसाय प्रामुख्याने उत्तर भारतीयांकडून चालवला जात असून येथे क्रॉस मसाज दिला जातो. यासाठी खास मुली आहेत. त्यासाठी १ हजार ते दीड हजार रुपये आकारले जातात. अर्थात हे मसाज करणारे प्रशिक्षित असतात का? हा प्रश्न कायम असला तरी किनाऱ्यावर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मसाज पार्लरना परवानगी आहे का, असा प्रश्न कायम आहे. या मसाज पार्लरमध्ये काहींची फसवणूकही केली जाते.

हे क्लब अजूनही बंदच

उत्तर गोव्यात ‘टेक्नो ॲण्ड आणि ट्रान्स म्युझिक’साठी मोरजी येथील तलाश, गावडे वाड्यावरील मारबेला, हणजुणेजवळील क्लब कबाना यासारखे म्युझिक क्लब विविध कारणांमुळे सध्या बंद आहेत. हंगाम सुरू झाल्यानंतर तेही सुरू होण्याची शक्यता असल्याचे स्थानिक सांगतात. यापूर्वी या क्लबवर पोलिसांनी छापे टाकले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com