Mopa Airport : दाबोळीसाठी ‘मोपा’ बनतोय शाप; अवघ्या ७० किमीसाठी लागतात ४ तास

Mopa Airport : दक्षिण गोव्‍यातून ‘मोपा’साठी त्रासदायक प्रवास : टॅक्‍सी भाड्यातही चारपट वाढ
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Mopa Airport :

मडगाव, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्‍यांनंतर आता स्‍पाईस जेट या देशी विमान कंपनीनेही दाबोळीला ‘राम राम’ ठोकून मोपाला स्‍थलांतर करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

त्‍यामुळे फक्‍त पर्यटन व्‍यावसायिक आणि व्‍यवसायावर जगणाऱ्यांनाच त्रास होणार असे नसून जे प्रवासी दक्षिण गोव्‍यातून मोपापर्यंत जाणार त्यांनाही याचा फटका बसतो आहे. ७० किमीच्या अंतरासाठी वाहतूक कोंडीमुळे त्यांना किमान चार तासांचा प्रवास करावा लागत आहे. त्‍यामुळे या प्रवाशांच्‍या चिंतेतही भर पडली आहे.

सध्‍या कुणालाही विमानाने पुण्‍याला जायचे असेल तर दाबोळीहून पुण्‍याला जायला विमान कमी आहेत. नियमित पुण्‍याला प्रवास करणारे संतोष पाटील यांनी सांगितले की, मडगावहून मोपाला जाण्‍यासाठी सध्‍याच्‍या परिस्‍थितीत किमान तीन ते साडेतीन तास प्रवास करावा लागतो. ज्‍यावेळी पर्वरी ओव्‍हरब्रिजचे काम सुरू हाेईल त्‍यावेळी हा विलंब आणखीन वाढण्‍याची शक्‍यता आहे.

पाटील म्‍हणाले, कित्‍येकवेळा आम्‍ही मडगावहून पुण्‍यातील नातलगांना मोपा विमानतळावर पोहोचवितो. मात्र, आम्‍ही घरी पोहोचण्‍याच्‍या पूर्वीच आमचे नातलग पुण्‍याला पाेहोचलेले असतात. अशा परिस्‍थितीत सगळ्‍याच विमान कंपन्‍या जर मोपाला वळविल्‍या गेल्‍या तर दक्षिण गोव्‍यातील लोकांसाठी विमानाने प्रवास करणे म्‍हणजे एकप्रकारे दिव्‍यच असेल.

दक्षिण गोव्‍यातून उत्तर गोव्‍यात जाताना सध्‍या वाहनचालकांना वेर्णा येथे जे दोन सिग्‍नल्‍स आहेत त्‍यामुळे बराच वेळ अडकून पडावे लागते. त्‍यामुळे पणजीपर्यंत पोहोचण्‍यासाठी किमान २० मिनिटे वेळ होतो. आता पर्वरी येथेही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. तिथे कित्‍येकवेळा तासन्‌तास वाहने खोळंबून पडतात.

अशा स्‍थितीत वाहतूक ज्‍यावेळी जास्‍त असते त्‍यावेळी जर मोपाला जाऊन विमान पकडायचे असेल तर त्‍या प्रवाशाला किमान पाच तासांपूर्वी घरातून बाहेर पडावे लागेल. समजा सायंकाळी ४ वा.चे विमान असेल तर मडगावहून सकाळी ११ वाजता घरातून निघावे लागेल. काणकाेणसारख्‍या भागातील लोकांना सकाळी १० वाजता बाहेर पडावे लागेल.

Mopa Airport
Goa Weather Update: राज्यात हवामान कोरडे; पणजी, मुरगावात सर्वाधिक तापमानाची नोंद

केंद्र सरकारने दाबोळी विमानतळाच्‍या विस्‍तारावर आतापर्यंत ८६० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्‍यामुळे दाबोळी बंद होणार असे मला वाटत नाही. मात्र, जर काही निर्णयामुळे दाबोळीची विमाने हलविली जातात तर त्‍यावर तोडगा काढणे आवश्‍‍यक आहे. गोवा सरकारनेही त्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत, असे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांनी सांगितले.

टॅक्‍सीचा खर्च परवडेना : वॉरन आलेमाव

वार्का येथील सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी सांगितले की, तीन ते चार तास प्रवास ही तर डोकेदुखी आहेच. पण वार्काहून मोपाला जाण्‍यासाठी टॅक्‍सीचा खर्च किमान साडेतीन हजार रुपये असतो. पूर्वी दाबोळीहून आमचे लोक जायचे ते केवळ ९०० रुपयांत. आता त्‍यांना तीनपट जास्‍त पैसे द्यावे लागतात. कतार एअरवेज जूननंतर आपला पूर्ण व्‍यवहार मोपावरून करणार आहे. याचा सर्वांत जास्‍त फटका जर कुणाला बसेल तर तो गोव्‍यातील खलाशांना.

आमच्‍यावर जीव देण्‍याची वेळ!

‘मोपा’वर विमाने वळू लागल्‍याने दक्षिण गोव्‍यातील किनारपट्टी भागातील व्‍यावसायिकांवर त्‍याचा परिणाम दिसू लागला आहे. कोलवा परिसरात वॉटरस्‍पोर्ट्‌स ऑपरेटर असलेले पेले फर्नांडिस यांनी या स्‍थितीबद्दल सांगितले की, ही स्‍थिती जर अशीच चालू राहिली तर आमच्‍यावर समुद्रात जीव देण्‍याची वेळ येईल. कोलवा, बाणावलीतील शॅक्‍स पर्यटकांअभावी ओस पडले आहेत.

दाबोळी संपवण्याची सरकारकडून सुपारी!

माेपा विमानतळ सुरू झाला तरी दाबोळीचे अस्‍तित्‍व कायम राहील, असा गोवा सरकार जो दावा करत होते त्‍यातील फोलपणा आता उघड होऊ लागला आहे. या सरकारने दाबोळी संपविण्‍याची सुपारी घेतली आहे, असेच वाटते. सध्‍या काही कंपन्‍यांनी मोपाला आपले बस्‍तान हलविल्‍याने दक्षिण गोव्‍यातील हॉटेल उद्योग आताच कोलमडू लागले आहेत, असे वार्का येथील वॉरन आलेमाव यांनी सांगितले.

Mopa Airport
Goa Government: सुदृढ, कुशल गोव्यासाठी सरकार कटिबद्ध; मुख्यमंत्री सावंत

दाबोळी विमानतळावर विमाने उतरविण्‍यास सकाळच्‍यावेळी जागा मिळत नाही म्‍हणून त्‍या काळात विमान कंपन्‍यांनी आपली विमाने मोपाला वळवली तर आमची काही हरकत नाही. मात्र, दाबोळी विमानतळाचे शुल्‍क मोपापेक्षा जास्‍त असल्‍याने जर विमान कंपन्‍या मोपाला जात असतील तर त्‍यावर तोडगा काढणे आवश्‍‍यक आहे. यासंबंधी मी लवकरच दाबोळी विमानतळाच्‍या संचालकांशी चर्चा करेन.

- फ्रान्‍सिस सार्दिन, दक्षिण गोवा खासदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com