तिसवाडी, स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त जुने गोवे ते रायबंदर रस्ता ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याने या मार्गावरील वाहतूक कदंब पठारावरील हमरस्त्यामार्गे वळविण्यात आल्याने या मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे.
परिणामी चिंबल नाक्यावर वाहतूक कोंडी होत असून सलग दुसऱ्या दिवशी वाहनचालक आणि प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
१० मार्च रोजी स्मार्ट सिटीच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू केले. हे काम पूर्ण करण्यासाठी ३१ मे अखेरची मुदत असल्याने ३० एप्रिलपर्यंत जुने गोवे ते दिवजा सर्कलपर्यंतचा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे कदंब पठारावरील मार्गावर वाहनांची गर्दी होऊन चिंबल नाक्यावर वाहतूक कोंडी होते. सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात.
दिवाडी फेरीमार्गावरही ताण :
जुने गोवे रस्ता बंद केला, तेव्हा रायबंदरवासीयांसाठी स्मार्ट सिटी व्यवस्थापनाने चारचाकी वाहनांसाठी पास व्यवस्था सुरू केली आहे. तसेच रायबंदर-चोडण फेरीबोट सेवाही सुरू ठेवली आहे. मात्र, सांपेद्र-दिवाडी फेरी बंद केल्याने दिवाडी बेटावर जाण्यासाठी जुने गोवे फेरी मार्गाने जावे लागते. त्यामुळे या फेरीमार्गावरही ताण आला आहे.
उतार धोकादायक...
चिंबल जंक्शनवर मोठा उतार असल्याने एखाद्या वाहनाचे ब्रेक फेल झाल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते.
बेशिस्त चालकांमुळे वाहतूक कोंडी
गेल्या सहा महिन्यांपासून चिंबल नाक्यावर खाडीवरील पुलाचे काम सुरू असून काही ठिकाणी रस्ता अरूंद आहे. त्यातच येथे सिग्नल सुरू झाल्यावर वाहतूक मंदावते.
बरेचजण लवकर जाण्याच्या गडबडीत वाहतुकीची शिस्त मोडतात. परिणामी वाहतूक कोंडी अधिकच दाट होते. या ठिकाणी पोलिस आणि होमगार्ड तैनात करूनही काही उपयोग होत नाही. कारण अनेकजण नियमांचे उल्लंघन करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.