
Governor: राज्यभर म्हादई विषयावरून असंतोष पसरलेला असताना आज विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी आपल्या अभिभाषणात रस्ते बांधणी, पर्यटन, आयुष, मोपा, जी-20 सह अनेक मुद्यांवर भाष्य केले.
मात्र, महत्त्वाचा म्हादई विषय गायब झाल्याचे दिसून आले. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडत घेरले आहे.
राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या सर्वच क्षेत्रातील विविध प्रकारच्या विकासकामांची आणि पथदर्शी प्रकल्पांची माहिती राज्यपालांच्या अभिभाषणातून दिली जाते. प्रत्येक वर्षी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांकडून जनतेला ही माहिती देण्याचा प्रघात आहे.
आज विधानसभेच्या पहिल्या दिवशी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी विधानसभा सदस्यांसमोर आपले अभिभाषण केले.
शेतीला प्रोत्साहन; जनावरांचे लसीकरण
1. अग्निशामक दलाकडून आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासह आपत्कालीन व्यवस्थेमार्फत 80 लोकांचे आणि 532 जनावरांचे जीव वाचवण्यात यश आले असून 75 कोटी रुपयांच्या मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचवण्यात आल्या आहेत. शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 18.58 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
2. राज्यातील काजू, मानकुराद आंबा, मायडोळी केळी, कोरगुट भात उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यातील जनावरांना लंपी आजारापासून मुक्त ठेवण्यासाठी 21895 जनावरांचे लसीकरण केले आहे, आशी माहिती राज्यपालांनी दिली.
पर्यटकांची सुरक्षितता महत्त्वाची-
राज्यात होऊ घातलेल्या जी-२० परिषदच्या कार्यक्रमामुळे विकासाला मदत मिळणार आहे. राज्य सरकारसाठी स्थानिकांसह पर्यटकांचीही सुरक्षा आणि सुरक्षितता महत्त्वाची आहे. राज्यात घडत असलेल्या ८४ टक्के गुन्ह्यांचा शोध लावण्यात पोलिस खात्याला यश आले आहे.
याशिवाय अमली पदार्थ व्यवहारांवरही राज्य सरकारच्या वतीने अंकुश लावला जात आहे. राज्यातील अपघात टाळण्यासाठी पोलीस दलांकडून विशेष प्रयत्न केले जात आहे, असे राज्यपाल म्हणाले.
नागरी सुविधांसाठी कटिबद्ध-
राज्यात रस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी झुआरी पूल महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून 29 डिसेंबर रोजी निम्मा पूल खुला करण्यात आला आहे. यावर्षी अखेर पत्रादेवी-मडगाव वेस्टर्न बायपास पूर्ण करण्यात येईल.
उत्तर गोव्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला मोपा विमानतळ कार्यान्वित झाला असून प्रतिवर्षी 44 लाख प्रवासी आणि 25 हजार मेट्रिक टन कार्गो हाताळेल. केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेले आयुष रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत झाले आहे. त्याशिवाय पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, पर्यटन वृद्धी, वीजपुरवठा, कचरा व्यवस्थापन या क्षेत्रातही सरकार कार्यरत असल्याचे राज्यपाल म्हणाले.
सामाजिक, आर्थिक क्षेत्रात गोवा सरस-
इतर राज्यांच्या तुलनेत गोवा सामाजिक, आर्थिक निकषांमध्ये सरस आहे. सरकारकडून 2021-22 या अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
सरकारकडून केलेल्या खाणींच्या ई-लिलावातील बोलिधारकांकडून एकूण उत्पन्नाच्या 0.2 टक्के म्हणजेच 43.19 कोटी रुपये आगाऊ पैसे म्हणून जमा झाले आहेत, अशी माहिती राज्यपालांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.