खरी कुजबुज: तन्‍वीने लाटलेले पैसे गेले कुठे?

Khari Kujbuj Political Satire: जुने गोवे येथे आमदार राजेश फळदेसाई यांनी जे कार्यक्रम मागितले ते पर्यटन खात्याने दिले आहेत. सरकारी पातळीवरील हे कार्यक्रम असल्याने फळदेसाई हे सतत पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांचे कौतुक करीत होते.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

तन्‍वीने लाटलेले पैसे गेले कुठे?

सध्‍या कुडचडेत गाजत असलेल्‍या तन्‍वीच्या पैसे हडप प्रकरणामुळे लोकांचे ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्यांवरून लक्ष दुसरीकडे गेले आहे हे नक्‍की. अरेबियन नाइट्समधील गोष्‍टींना शोभावे असे एका मागोमाग एक तन्‍वीचे सुरेल किस्‍से उघडकीस येत असून लोकांसाठीही तो एक कुतूहलाचा विषय बनलेला आहे. मात्र, तन्‍वीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर जी माया जमा केली ती नेमकी गेली कुठे? याबद्दल मात्र पोलिस काही सांगत नाहीत. ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्यात पोलिस काही राजकारण्‍यांना वाचवू पाहतात असा आरोप केला जातो. तन्‍वी कांडातही पोलिस तेच करू पाहत नाहीत ना? अशी चर्चा होत आहे. ∙∙∙

फळदेसाई आणि सनबर्न

जुने गोवे येथे आमदार राजेश फळदेसाई यांनी जे कार्यक्रम मागितले ते पर्यटन खात्याने दिले आहेत. सरकारी पातळीवरील हे कार्यक्रम असल्याने फळदेसाई हे सतत पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांचे कौतुक करीत होते. यापूर्वी त्यांनी ‘सनबर्न’ जुने गोवेत व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती, परंतु आता ते यावर काहीही बोलत नाहीत किंवा मागणीही करण्याचे सोडून दिले आहे. कदाचित राज्यभरातून त्याला होत असलेला विरोध पाहून फळदेसाई यांनी माघार घेतलेली दिसते. विधानसभा अधिवेशनाच्या काळात जुने गोवे येथील शवदर्शन सोहळ्याचे ते कारण देत सनबर्न आम्हाला नको म्हणून सांगत त्यांनी ‘यू टर्न’ घेतला होता. कदाचित हा सोहळा संपल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून मागणी झाल्यास ते विचारही करतील आणि मिनी सनबर्नसाठी प्रयत्नही करतील असे त्यांच्याच निकटच्या सहकाऱ्यांना अधूनमधून वाटते. ∙∙∙

चर्चिलच्‍या पुस्‍तकाचे काय झाले?

चर्चिलचे राजकीय गॉड फादर असलेले लुईझिन फालेरो यांनी तीन पुस्‍तकांचे लेखन केल्‍यामुळे असेल की काय माहीत नाही, पण चर्चिल आलेमाव यांनाही लेखक व्‍हायची हुक्‍की आली होती. कोकणी आंदोलनाच्‍यावेळी आपण केलेले काम यावर आपण पुस्‍तक लिहिणार असे वर्षभरापूर्वी चर्चिल यांनी जाहीर केले होते. मात्र, चर्चिलचे हे पुस्‍तक अजून तयार झालेले नाही. आता या आत्‍मचरित्रपर पुस्‍तकात अजून काही नवीन भर घालायची आहे म्‍हणून चर्चिलनी आपला हा प्‍लॅन स्‍थगित ठेवला की नको असलेल्‍या भानगडी त्‍यामुळे बाहेर येतील असे वाटल्‍याने त्‍यांनी तो रद्द केला हे काही कळत नाही बुवा! ∙∙∙

नाटकांची स्पर्धा की फोनवर बोलण्याची?

फोंड्यात ऐतिहासिक नाट्य स्पर्धा सुरू आहे. चांगल्या नाट्य शाळेचे स्नातक असलेले एक परीक्षक कायम अधूनमधून फोनवर कुजबुजत असतात. फोन बंद करण्याची सूचना आम्हालाच का म्हणत प्रेक्षकांनीही फोनवरून बोलणं चालू ठेवलं आहे. आता स्टेजवरील गणोजी व औरंगजेब फोनवर बोलण्याचे बाकी आहेत असे चर्चिले जात आहे. शांता शेळकेंचा शिस्त विषयावर एक लेख आहे. त्याचं पालन करणार कोण? दरम्यान, अशुद्ध उच्चार ऐकून बेशुद्ध व्हावं असंही अनेकदा होतं. ऱ्हाज्यात (राज्यात), घडावर (गडावर)... असे अनेक उच्चार सोसवत नाहीत. नाटकाच्या आरंभी संस्था प्रमुखांना गुलाबपुष्पं दिली जातात. त्या तीन वाक्यांची उद्घोषणा करताना संस्थेचे कर्मचारी अपवाद सोडल्यास, चिटोरा वाचतानाही गडबडतात, अडखळतात. त्या परीक्षकाचं व प्रेक्षकांचंही फोनवरील बोलणं बंद व्हायला आयोजकांनी शिस्त लावणं गरजेचं आहे असं रसिक लोक बोलतात. ∙∙∙

भंडारी समाजातील राजकारण

भंडारी समाजात सध्या तांडव सुरू असून केंद्रीय समिती विरोधात लढाई न्यायालयात पोहोचली आहे. त्यात समितीने आडमार्गाने निवडणूक करून स्वतःचा मनमानी कारभार दाखवून दिला. भारतीय संविधानाने दिलेले नियम पायदळी तुडवत आपल्या नवीन संविधानानुसार निवडणूक घेऊन टाकली. त्यामुळे समाजात कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. खास करून युवा वर्गाला भंडारी समाजाच्या कामकाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेल्याची भावना पसरली आहे. समाजातील लोकांना जागृत करून केंद्रीय समितीला कायमची अद्दल घडविण्यास बैठकांचा सपाटा होत असल्याची चर्चा ऐकू येते. समाजात निर्माण झालेली दरी मिटवण्यासाठी प्रयत्न केले जात असले, तरी केंद्रीय समितीतील सदस्यांची मनमानी चालू देणार नाही अशा हालचाल सुरू असल्याचा विषय चर्चेचा केंद्र बिंदू झाला आहे. ∙∙∙

दिगंबरांचा कृषी क्षेत्रातील अनुभव

आमदार दिगंबर कामत यांचे वडील नारळांचा व्यवसाय करायचे. त्यामुळे त्यांना लहानपणापासून नारळ उत्पादनाची व त्यातील व्यवहाराची माहिती आहे. आज कृषी खात्याने आयोजित केलेल्या खरेदीदार व विक्रेते यांच्या प्रदर्शनावेळी त्यांच्या अनुभवाचा नमुना पाहायला मिळाला. त्यांना कृषी उत्पादनाबद्दल व लहान शेतकऱ्यांबद्दल किती आत्मीयता आहे, हेसुद्धा अनेकांच्या लक्षात आले. त्यांनी आपल्या वडिलांच्या नारळाच्या व्यवसायाचा उल्लेख आपल्या भाषणातही केला. जे वेगवेगळ्या प्रकारचे कृषी उत्पादन तिथे ठेवले होते, त्याची माहिती व त्याचे फायदे तसेच त्याचे काय काय पदार्थ होऊ शकतात हे त्यांना ठाऊक असल्याचेही उपस्थितांच्या लक्षात आले. त्यांना ते लवकरच मंत्रिपदी आरूढ होणार असे संकेत मिळत आहेत. अशावेळी त्यांनी कृषी खाते सांभाळावे व गोव्यातील शेतीला गतवैभव प्राप्त करून द्यावे असे उपस्थित बोलताना दिसले. ∙∙∙

Khari Kujbuj
Banavali Crime: आधी विश्वास संपादन केला, मग ‘हात की सफाई’, 3 कारागिरांनी पळवले ७२ लाखांचे सोने

मागील आणि आत्ताची सजावट!

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त (इफ्फी) पणजीतील आयनॉक्स परिसरात सजावट केली जाते. मागील दोन-तीन इफ्फीत करण्यात आलेली सजावट खास नागरिकांसाठी ठेवण्यात आली होती. यावर्षी सजावटीसाठी म्हणे मनोरंजन सोसायटीने ज्या कोट्यवधी रकमेची निविदा काढली होती, ती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. काही झाले तरी सजावटीचे काम खर्चीक आहे, हे मान्य आहे. परंतु मागील काही इफ्फीतील सजावट नागरिकांना खुली ठेवली जात असल्याने यावर्षीही ती खुली राहील असे काहींना वाटले होते. परंतु इफ्फीचा समारोप होताच सजावट हटवण्यास सुरवात झाली. कदाचित करण्यात आलेली सजावट रसिकांना भावली नसावी का? त्यामुळेच ती नागरिकांसाठी ठेवण्यात आली नसावी, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. असो पुढील ५६ व्या इफ्फीतील सजावट वेगळी असेल आणि ती दोन दिवस नागरिकांसाठी खुली असेल, अशी आशा. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com