Bicholim: डिचोलीत परप्रांतीयांचा बेकायदेशीर भरणा? पडताळणीकडे दुर्लक्ष केल्याचा संशय; ग्रामसभांत मुद्दा चर्चेत
Tenant Verification In Bicholim
डिचोली: भाडेकरू पडताळणी मोहिमेंतर्गत साडेनऊ हजार परप्रांतीयांची पडताळणी केली आहे. तरीही डिचोलीत खासकरून ग्रामीण भागात वास्तव्य करून असलेल्या काही परप्रांतीय भाडेकरूंनी पडताळणी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे, असा संशय व्यक्त होत आहे.
भाडेकरू पडताळणी मोहिमेला डिचोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेंतर्गत डिचोलीत ९ हजार ५१६ जणांची पडताळणी केली असल्याची माहिती मिळाली आहे. अलीकडेच पार पडलेल्या काही पंचायतींच्या ग्रामसभेत परप्रांतीय भाडेकरूंचा मुद्दा उपस्थित झाला होता.
राज्यात वाढणाऱ्या चोऱ्या आदी गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात भाडेकरू पडताळणी मोहीम सक्तीची केली होती. इतर भागाप्रमाणेच डिचोलीतही या मोहिमेला प्रतिसाद मिळला. घरमालकांना भाडेकरूंची तसेच बांधकामस्थळी राहणाऱ्या मजुरांविषयी कंत्राटदारांना पडताळणी अर्ज भरून माहिती सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते.
भाडेकरू आणि मजुरांविषयी माहिती देण्याचे घरमालक किंवा कंत्राटदारांनी टाळले, तर संबंधितांविरोधात कारवाई करण्याचे संकेतही सरकारकडून देण्यात आले होते. त्यामुळेच आवश्यक कागदपत्रांसह बहुतेक परप्रांतीयांनी पडताळणी अर्ज भरून दिले आहेत. तरीदेखील तालुक्यातील खासकरून ग्रामीण भागातून या मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
ग्रामसभेत मुद्दा चर्चेत!
अलीकडेच पिळगावसह कारापूर-सर्वण आदी काही पंचायतींच्या ग्रामसभेत परप्रांतीयांचा मुद्दा चर्चेत आला होता. काही परप्रांतीय बेकायदेशीरपणे भाडेकरू म्हणून राहतात, असा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. हा संशय खरा असल्यास पोलिसांसमोरही ते आव्हान असून, त्यादृष्टीने मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.