विलास ओहाळ
पणजी,
राज्यातील एकमेव साखर कारखाना बंद पडल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांना शेजारील राज्यातील साखर कारखान्यांना ऊस पुरवठ्याची सोय राज्य सरकारने करून दिली. परंतु, तेथील कारखान्यांचा पट्टा पडण्यापूर्वीच टाळेबंदी लागल्याने राज्यातील सुमारे १६०० मेट्रीक टन ऊस पडून राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस क्षेत्र आणि सरासरी वजन लक्षात घेऊन त्यांना आर्थिक मदत करण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.
राज्य सरकारच्या मालकीचा एकमेव असलेला संजीवनी सहकारी कारखाना तांत्रिक कारणांमुळे यावर्षी ऊस गाळप करू शकला नाही. कारखाना ऊस गाळप करणार नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांचा ऊस शेजारील राज्यातील दोन साखर कारखान्यांना घालण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले. त्यानुसार कर्नाटकातील लैला शुगर्स प्रा. लि. आणि मे. रिलायबल शुगर्स प्रा. लि. या कारखान्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा ऊस उचलल्याने त्यांची चिंता मिटली आहे. दोन्ही कारखान्यांनी मिळून या हंगामात गोव्यातील २६ हजार ४४० मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यानुसार दोन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांना पहिला हप्ताही अदा केला असल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित रक्कमही काही दिवसांत शेतकऱ्यांना मिळणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम पूर्ण न झाला नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे १६०० मेट्रीक टन ऊस शेतात तसाच पडून राहिला. या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत करण्याचे योजले आहे. त्यासाठी कृषी खात्याच्यावतीने ऊस असलेल्या शेताचे सर्वेक्षण करून त्यांना राज्य सरकार मदत करणार आहे. त्यासाठी सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चाही केली असून, त्यांनी त्यास समर्थता दर्शविली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना ऊस कारखान्यास गेला नाही, याची चिंता होती त्यांना ही दिलासादायक बाब आहे. --------------------------------------------- -------------------------------------------- चौकट ऊस गाळप आणि उलाढाल...
एकूण गाळप झालेला ऊस -- २६,४४० मे. टन
गाळप होण्याचा राहिलेला ऊस ---१६०० मे. टन लैला साखर कारखान्याकडून उचल--- २४,७२४ मे. टन रिलायबल साखर कारखान्याकडून उचल--१,७१६ मे. टन लैला कारखान्याने अदा केलेली रक्कम-- १,१०,६४,०१४.०० रुपये. रिलायबल कारखान्याने अदा केलेली रक्कम.---- १४,००,०००.०० रुपये. शेतकऱ्यांना दिलेली रक्कम---- १,२८,९८,१४६.०० रुपये वाहतुकीसाठी खर्च -----८०,००,०००.०० रुपये
शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली रक्कम ३,७५,७३८५४.०० रुपये
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.