Panaji News : सुदिन, माविनना भाजपचा धक्का; ढवळीकरांना सरकारमधून हटवा : कार्यकर्ते

Panaji News : दक्षिण गोव्यातील पराभवानंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करावा, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. नुव्याचे आमदार तथा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष्य बनले आहेत.
Sudin Dhavalikar
Sudin Dhavalikar Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, पल्लवी धेंपे यांच्या पराभवासाठी धर्मगुरू जबाबदार असल्याचे भाजपच्या मताशी असहमती दर्शविणारे वीजमंत्री सुदिन ढवळीकर आणि पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांना भाजपने २४ तासांत जबरदस्त धक्के दिले आहेत.

मडकईच्या भाजप मंडळाने जाहीरपणे वीजमंत्री ढवळीकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर केंद्रीय वस्तू व सेवा कर परिषदेवरून सरकारने गुदिन्हो यांना तडकाफडकी हटविले आहे. यावर ढवळीकर यांनी आपल्या विधानाचा विपर्यास झाला, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असून गुदिन्हो यांना सरकारचा निर्णय गुपचूपपणे स्वीकारावा

लागला आहे.

दक्षिण गोव्यातील पराभवानंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करावा, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. नुव्याचे आमदार तथा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष्य बनले आहेत. शिवाय आता गुदिन्हो आणि ढवळीकर यांनाही हटवावे, असे भाजप कार्यकर्त्यांना वाटते.

त्यातच या पराभवाचे खापर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि त्यांच्या पाठोपाठ प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर आणि आमदार संकल्प आमोणकर यांनी धर्मगुरूंवर फोडल्यानंतर ढवळीकर आणि गुदिन्हो यांनी ते मत नाकारले होते. ढवळीकर यांनी त्याही पुढे जात दोन्ही बाजूच्या धर्मगुरूंनी मार्गदर्शन केले होते, असे सांगत भाजपलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. भाजपने आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही त्यांनी न मागता दिला होता.

गुदिन्हो यांनी तर आता निवडणूक संपली आहे, त्यामुळे अशा विश्लेषणाची गरजच नसल्याचे सांगितले होते. आम्ही सारे जनकल्याणासाठी कार्यरत होऊ या, असे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले होते. भाजपच्या नेत्यांना आपल्याच मंत्रिमंडळातील दोन ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या कानपिचक्या खुपल्या होत्या. त्यामुळे या नेत्यांबाबत पुढे काय होते, याविषयी उत्सुकता होती.

प्रदेश नेतृत्वाचा आशीर्वाद : मडकई भाजप मंडळाची पत्रकार परिषद ही ढवळीकर हटाव मोहिमेची सुरवात असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपची राज्यातील कोणतीही पत्रकार परिषद किंवा निवेदन हे प्रदेश पातळीवरील परवानगीशिवाय दिले जात नाही. त्यामुळे मडकईतील घडामोडींना प्रदेश नेतृत्वाचा आशीर्वाद आहे, हे स्पष्ट होते.

नवा पर्याय पुढे येण्याची शक्यता

ढवळीकरांच्या वक्तव्याला २४ तास होण्याआधीच मडकई भाजप मंडळाने ढवळीकर यांच्यावर मतदानाची आकडेवारी फेकत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. खरे तर दक्षिण गोव्यातील निवडणुकीत फोंड्यात ढवळीकर यांच्या मगोपच्या मतांची मदत होईल म्हणूनच ढवळीकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिले होते. आता ती गरज राहिली नसल्याने मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करा अन्यथा पायउतार व्हा, असा पर्याय भाजपकडून ढवळीकर यांना दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

गुदिन्हो यांना मागील एका प्रकरणात हटवावे, असे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे जुळवून आणण्यासाठी गुदिन्हो यांना मंत्रिमंडळात ठेवले. भाजप अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजासोबत आहे, असा संदेश त्यातून द्यायचा होता. गुदिन्हो यांचा भाजपला दक्षिण गोव्यात उपयोग झाला नाही. त्यांच्या दाबोळी मतदारसंघातही ते अपेक्षित मताधिक्य देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.

Sudin Dhavalikar
North Goa Court: मंत्री बाबूश आणि माविन यांच्‍या विरोधातील खटले उत्तर गोव्‍यातील न्‍यायालयात वर्ग

मुख्यमंत्री करणार प्रतिनिधित्व : केंद्रीय वस्तू व सेवा कर परिषदेवरून माविन यांना हटवून सरकारने त्यांना योग्य तो संदेश दिल्याचे सध्या भाजपचे कार्यकर्ते मानत आहेत. गेली सहा वर्षे गुदिन्हो हे राज्याच्या अर्थमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या परिषदेवर कार्यरत होते. आता अर्थमंत्री या नात्याने खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच त्या परिषदेवर गोव्याचे प्रतिनिधित्व करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com