संपादकांच्या संगतीत : झंझावात

विरोधाभास हा त्यांच्या एकूणच जीवनाचा एक ठसठशीत विशेष होता. वरून ओबडधोबड काटेरी; पण आतून रसाळ, गोड फणसासारखे आठवल्यांचे व्यक्तित्व होते.
Narayan Athavale
Narayan AthavaleDainik Gomantak

(सुरेश वाळवे)

दत्ता सराफ यांच्यानंतर काही महिने वामन राधाकृष्ण यांनी दैनिक ‘गोमन्तक’चे प्रभारी संपादक म्हणून काम पाहिले. पण त्यात जान नव्हती. बहुधा मालकांनाही ते जाणवले असेल. म्हणून त्यांनी १९८० मध्ये मुंबईहून असा एक झुंजार पत्रकार आणला की, ज्याने दहा वर्षे ‘गोमन्तक’च नव्हे तर पुरा गोवा ढवळून काढला.

नारायण गजानन आठवले ‘लोकसत्ते’त उपसंपादक होते. पण हा गडी एका जागी टिकणाऱ्यांपैकी नव्हता. वास्तविक पिंड समाजवादी आणि राष्ट्र सेवा दलाशी जवळचा. तरी आठवले शिवसेनेचे समर्थक होते. कारण विरोधाभास हा त्यांच्या एकूणच जीवनाचा एक ठसठशीत विशेष होता. वरून ओबडधोबड काटेरी; पण आतून रसाळ, गोड फणसासारखे आठवले यांचे व्यक्तित्व होते.

मुंबईत त्यांनी ‘प्रभंजन’ नावाचे साप्ताहिक काढले होते आणि ते यशस्वीही झाले होते. नावाप्रमाणेच वादळी. पण आठवले यांना व्यवहार कधी जमला नाही. याचे कारण नसते वाद अंगावर घेण्याची खुमखुमी. ‘गोमन्तक’मध्ये येताच त्यांनी त्याला आक्रमक रूप दिले. पण त्यांची लेखणी लालित्यपूर्ण व नजाकतीने लिहिणारीही होती.

‘वेध’ नावाचे सदर ते ‘अनिरुद्ध पुनर्वसु’ या नावाने लिहीत, ते वाचनीय असे. ‘नारायणगाथा’ हे विडंबनात्मक ढंगाचे साप्ताहिक काव्यमय सदर लिहीत. त्याची एक झलक देण्याचा मोह आवरत नाही. ‘बालकांना उपदेश’ या काव्यात नारायणमहाराज म्हणतात:

लवकर निजे, लवकर उठे

तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती भेटे

तत्त्व जाणा साफ खोटे

माझ्या लाडक्या मुलांनो

लवकर उठतो दूधवाला,

पाववाला, पेपरवाला

सांगा मिळते कुठे तयाला

ज्ञान आणि संपत्ती?

(बहुधा यापासून प्रेरणा घेऊन सूर्यापुत्र वाघ ‘विष्णुपुराण’ लिहू लागले.)

१९८०मध्ये गोवा सरकार व पणजी पालिका यांनी पोर्तुगीज कवी कामॉइश याची चारशेवी जन्मशताब्दी साजरी करण्याचा घाट घातला. पणजीच्या ‘जार्दिना’तील अशोकस्तंभावर कामॉइशचा मुखवटा लावला, तेव्हा आठवले यांना उत्तम विषय सापडला आणि त्यांनी पहिले पानभर अग्रलेख लिहून जळजळीत विरोध नोंदवला.

त्यामुळे प्रचंड जनजागृती होऊन जुन्या गोव्यातील कामॉइशचा भव्य, देखणा पुतळा उडवून लावण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर कामॉइश साजरा करण्याचा विचार सोडून द्यावा लागला, हे सांगणे नलगे!

१९८६ साली सत्तारूढ कॉंग्रेसने कोकणी राजभाषेचा घाट घातला, तेव्हा आठवले यांनी मराठीची धुरा खांद्यावर घेतली. कोकणीला विरोध नाही, पण गोमंतकीय मनाचे सांस्कृतिक भरणपोषण करणाऱ्या मराठीलाही तेच स्थान मिळाले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती.

फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर

मराठीचा गजर सोडू नये

हा मंत्र घेऊन त्यांनी गोवा पिंजून काढला. महामेळावे घेतले. पुढे मराठी सहराजभाषा होऊ शकली, ती केवळ त्यांच्यामुळेच. त्यांनी गोव्यात मराठी सर्वांगांनी विकसित व्हाती या करता अकादमी स्थापनेचा निर्धार केला. ‘मराठी भवना’साठी खांद्याला भगवी झोळी अडकवून गावोगाव निधी गोळा केला. शशिकांत नार्वेकर, गोपाळराव मयेकर वगैरे शेकडो मराठीभक्तांची साथ त्यांना लाभली. पुढे अकादमी व भवन यांचे काय झाले, हे सारा गोवा जाणतो.

आठवल्यांचे कायमस्वरूपी कार्य म्हणजे लोकविश्‍वास प्रतिष्ठान आणि बांदिवड्यात मूक-बधिर मुलांसाठी सुरू केलेली शाळा. अनुप प्रियोळकर व सहकारी गेली कित्येक वर्षे तिचा भार वाहत आहेत. आठवल्यांच्या नावाने प्रतिष्ठान दरवर्षी एका पत्रकाराला पुरस्कारही देते. त्यामुळे त्यांची स्मृती चिरंतन राहण्यास मदत झाली आहे.

ऐंशीचे दशक गाजवून आठवले मुंबईत परतले आणि ९६ ते ९८ या काळात सेनेचे खासदार म्हणून लोकसभेत गेले. रमाकांत खलप तेव्हा केंद्रात मंत्री होते. मात्र त्याआधी ‘मलई खाणारे बोके’, असे आमदारांना म्हटल्याबद्दल गोवा विधानसभेचा हक्कभंग झाल्याने सभागृहात बोलावून त्यांना ताकीद देण्यात आली होती. १९९०मध्ये चर्चिल-बार्बोझा-खलप पुलोआ सरकार घडण्यामागे आठवल्यांचे आशीर्वाद होते.

आठवल्यांना ७८ वर्षांचे आयुष्य लाभले. फुल्यांवरील त्यांची कादंबरी गाजली. ‘आठवले तसे’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहायला घेतले. काही भाग प्रसिद्धही केले; पण पुढे थांबवले. याचे कारण कुणीतरी विचारले तेव्हा अनुराधावहिनींनी मिश्किलपणे उत्तर दिले, ‘अहो, त्यांना नको ते आठवायला लागले!’

एकदा पुण्यात शनिवारवाड्यासमोर प्रत्यक्ष आचार्य अत्र्यांवर चप्पल मारणारे आठवले म्हणजे ‘अ बुल इन द चायना शॉप’.(काचसामानाच्या दुकानात घुसलेला मस्तवाल सांड). ग. वा. बेहऱ्यांच्या ‘सोबत’मध्ये नाना वांद्रेकर या नावाने आठवले लिहीत आणि परिचितांत नाना म्हणूनच ओळखले जात. (समाप्त)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com