Goa News: राज्यात सध्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत सुभाष वेलिंगकरांनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे. वेलिंगरकांच्या अटकेसाठी ख्रिस्ती समुदयातील सामान्य नागरिकांसह राजकीय पुढारी रस्त्यावर उतरले आहेत. वेलिंगकरांच्या तात्काळ अटकेची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. डिचोली पोलिस ठाण्यात वेलिंगकरांच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
यापूर्वीही, वेलिंगकरांनी सेंट झेवियर यांच्या शवाची डीएनए चाचणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. वेलिंगकरांच्या वक्तव्यानंतर आता राज्यातील धार्मिक वातावरण गढूळ होत चालले आहे. राज्यातील काही हिंदू संघटनांनी वेलिंगकरांच्या वक्तव्याचे समर्थन करत सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या डीएनए चाचणीची मागणी केली. त्यांना अटक झाल्यास वाईट परिणाम होतील असे म्हणत सरकारच्या दडपशाहीचा वेलिंगकर यांच्या समर्थकांनी निषेध केला.
दरम्यान, वेलिंगकरांच्या विरोधात राज्यात सध्या आंदोलन सुरु आहे. राज्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये वेलिंगकरांना अटक करावी यासाठी निवेदने आंदोलकांकडून देण्यात आली आहेत. आंदोलकांच्या तीव्र मागणीनंतर पोलिसांनी वेलिंगकरांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
वेलिंगकरांना पकडण्यासाठी आता गोवा पोलिसांनी राज्यासह शेजारील महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शोध मोहीम सुरु केली आहे. आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सुभाष वेलिंगकर गायब आहेत. सीमावर्ती भागात पोलिसांनी ही मोहीम सुरु केली आहे. वेलिंगकरांच्या विरोधात राज्यात सध्या संतप्त भावना उमटत आहेत. गोव्यातील अनेक भागांमधून वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी करणारी निवेदने सादर केली जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.