Smart City Rain : ‘स्मार्ट सिटी’त जागोजागी पाणीच पाणी; अर्धवट कामांचा फटका

Smart City Rain : रस्‍ते गेले पाण्‍याखाली; पादचारी, वाहनचालकांची धांदल
Smart City Rain
Smart City RainDainik Gomantak

Smart City Rain :

पणजी, शहरात शनिवारी अवकाळी पावसामुळे पाटो परिसरात कला व संस्कृती खात्यासमोरील रस्ता पाण्याखाली गेला होता. मळ्यातील नव्या पाटो पुलापासून कदंब बसस्थानकाकडे जाणाऱ्या मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पाजवळील मार्गावर पाणी साचून राहिले होते.

त्यामुळे दुचाकीस्वारांची मोठी धांदल उडाली. चारचाकी वाहने चालक वेगाने पाण्यातून नेत असल्याने उडणाऱ्या पाण्यापासून वाचण्यासाठी दुचाकीस्वारांना कसरत करावी लागली. शिवाय पीपल्स हायस्कूलकडे पाणी साचण्याचा प्रकार घडला.

Smart City Rain
Goa Accident Case : रस्‍ते अपघातांत वर्षाला सरासरी १०० तरुणांचा बळी

कंत्राटदार, सल्लागारांवर गुन्हा नोंदवा : मडकईकर

स्मार्ट सिटीच्या कामांवर सतत आवाज उठविणाऱ्या माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर यांनी जुन्या शिक्षण संचालनालयाच्या जवळून पणजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूच्या पदपथाच्या कामाचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल केले आहे.

हे स्मार्ट काम अवघ्या १५ दिवसांपूर्वी ठेकेदाराने केले होते. थोड्याशा पावसात कामाची ही अवस्था असेल तर देवच आपल्याला वाचवू शकतो. या उच्च दर्जाच्या कामासाठी कंत्राटदार आणि सल्लागार यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवावा, असे मडकईकर यांनी नमूद केले आहे.

गाळ पुन्‍हा नाल्‍यात गेल्‍यानेच समस्‍या

आम्ही स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालकासोबत बैठक घेतली होती. त्यांनी रस्त्यावर हॉटमिक्स केले आहे. मात्र, मुख्य गटारांची साफसफाई केलेली नाही. स्मार्ट सिटीसाठी एकत्रित काम करायचे आहे. त्यांनी मनात कोणताही दोष न ठेवता सर्वांचे ऐकले पाहिजे. आम्ही नाल्याची साफसफाई केली होती पण स्मार्ट सिटीच्या कामांमुळे सर्व गाळ पुन्हा नाल्यात गेला. त्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार घडले, असे महापौर रोहित मोन्‍सेरात यांनी सांगितले.

चिखलकाला, नव्हे, चिखल झाला!

चिखलकाला नाही हो, चिखल झाला. पहिल्याच पावसात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारतअंतर्गत केलेल्या गोव्यातील चिखलमय विकासाचे दर्शन घडवणाऱ्या भाजपच्या इमॅजिन पणजीचे अभिनंदन! कोट्यवधी रुपये खर्च करून भाजपने केलेला हा विकास आहे, अशी कोपरखळी हाणत कॉंग्रेसचे उत्तर गोवा मतदारसंघातील उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी सरकारचा निषेध केला.

दक्षिणेत असा विकास नकोच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेतून राजधानी पणजी शहरामध्ये हा स्मार्ट विकास साधला आहे. मात्र, दक्षिण गोव्यात असा विकास होऊ देऊ नका. या सर्वांना दूर ठेवूया, असे सांगून काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी भाजप सरकारच्या विकासकामांवर शरसंधान साधले.

खरा सिनेमा दोन महिन्‍यांत...

आज फक्‍त तीन तास पाऊस पडल्याने पणजीत जी स्‍थिती निर्माण झाली, तो फक्‍त एक ‘ट्रेलर’ आहे. खरा सिनेमा दोन महिन्‍यांत दिसणार आहे. भाजप सरकारचे राजधानीकडेही कसे दुर्लक्षित होते, हे यातून स्‍पष्‍ट होते.

या निवडणुकीत मतदान करताना लोकांनी शहराची ही दुर्दशा कशामुळे झाली आणि कुणी केली, याचा विचार करूनच मतदान करावे, असे गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com