Bicholim News : कुंकळ्ळीनंतर डिचाेलीतही तणाव; धोंडांबद्दल अपशब्द

Bicholim News : श्रेयाचा पाय खोलात; भाविकांची पोलिस स्थानकावर धडक
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

डिचोली, फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण देवस्थानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अटकेत असलेली श्रेया धारगळकर आता अन्य एका प्रकरणात अडचणीत सापडली आहे. शिरगावच्या श्री लईराई देवीच्या धोंड भक्तांबद्दल अपमानास्पद विधान केल्याने अनेकांच्‍या भावना दुखावल्‍या गेल्‍या आहेत.

त्‍यामुळे श्रेया धारगळकर हिला त्‍वरित अटक करा, अशी मागणी करत शेकडो भक्तगणांनी आज सोमवारी सायंकाळी डिचोली पोलिस स्थानकावर धडक दिली.

डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही पोलिस स्थानकावर उपस्थित राहून भक्तगणांना पाठिंबा दिला. ‘बोगस’ एनजीओंविरोधात कारवाई करण्यासाठी वेळप्रसंगी विधानसभेत आवाज उठविण्‍यात येईल, अशी ग्वाही दोन्‍ही आमदारांनी भक्तगणांना देऊन सोक्षमोक्ष लागेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येणार येईल, असे स्पष्ट केले.

दरम्‍यान, दोन्‍ही आमदारांच्या उपस्थितीत लईराई देवीच्या भक्तगणांनी डिचोलीचे पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांना सह्यांचे निवेदन दिले. भारतीय दंड संहितेच्‍या २९५ (अ) कलमाखाली गुन्हा नोंद करून श्रेया धारगळकर हिला अटक करा अशी मागणी त्‍यांनी लावून धरली. वरिष्ठांचा सल्ला घेऊन या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍‍वासन नाईक यांनी शिष्टमंडळाला दिले.

तडीपार करण्‍याची मागणी

श्रेया धारगळकर म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे. समाजात कलह निर्माण करून धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये करण्यातच त्या धन्‍यता मानतात. त्‍यामुळे तिला अटक करण्‍याबरोबरच तडीपार करणे योग्य ठरेल, अशी संतप्‍त भावना ॲड. पुष्पराज नावेलकर यांनी व्‍यक्त केली. यावेळी जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्षा अंकिता न्हावेलकर यांच्यासह मोहिनी जल्मी, उपेंद्र गावकर आदींनी श्रेया धारगळकर हिचा निषेध केला.

Bicholim
Goa Police: गस्त वाढवा, संशयास्पद व्यक्तींची धरपकड करा! वाढत्या चोरींच्या पार्श्वभूमीवर गोवा डिजीपींच्या पोलिसांना सूचना

श्रेया धारगळकर यांनी वादग्रस्‍त वक्तव्‍य करून भाविकांच्‍या भावना दुखावल्‍या आहेत. त्‍यापेक्षा खेदाची गोष्ट म्हणजे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लईराई देवीचा हा अवमान आहे. या प्रकरणी योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. भक्तगणांनी एकसंध रहावे. तमाम भक्तगणांच्या मी पाठीशी आहे.

- डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार (डिचोली)

जामीनअर्ज ठरविला रद्दबातल

कुंकळ्‍ळी पोलिसस्‍थानक परिसर केपे न्‍यायालयाच्‍या कक्षेत येत असल्‍याने प्रकरणे या न्‍यायालयात वर्ग केली जातात. मात्र श्रेया धारगळकर आणि नमिता फातर्पेकर यांनी आपल्‍याला जामीन मिळावा यासाठी मडगाव न्‍यायालयात अर्ज केला. त्‍यामुळे तांत्रिक कारणास्‍तव तो रद्दबातल ठरविण्‍यात आला. मिळालेल्‍या माहितीनुसार, या दोघींही आता उद्या मंगळवारी केपे न्‍यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाला अन्...

श्री लईराई देवीचे व्रतस्थ धोंड दारूच्या दुकानात बसून मद्यप्राशन करतात, असे वादग्रस्‍त वक्तव्‍य श्रेया धारगळकर हिने समाजमाध्यमांवर केले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच लईराईच्या भक्तगणांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. आज सायंकाळी त्‍यांनी डिचोली पोलिस स्थानकावर धडक देत श्रेया धारगळकर हिला अटक करा, अशी मागणी लावून धरली. यावेळी सुमारे चारशेहून अधिक भक्तगण उपस्‍थित होते.

धारगळकरला ४ दिवस पोलिस कोठडी; अचानक पोटदुखी, इस्‍पितळात दाखल

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण संस्‍थान तसेच महाजनांबाबत समाजमाध्‍यमांवर आक्षेपार्ह व्‍हिडिओ व्‍हायरल करून लोकांच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍याच्‍या आरोपाखाली अटक केलेल्‍या श्रेया धारगळकर आणि नमिता फातर्पेकर या दोघींना आज केपे न्‍यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मात्र पोटदुखीचे कारण पुढे केल्‍याने श्रेया हिला मडगावच्‍या दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले आहे. दरम्यान, तिच्‍या प्रकृतीबाबतचा सविस्‍तर अहवाल आपल्‍याला सादर करावा अशी मागणी आम्‍ही इस्‍पितळ प्रशासनाकडे केली आहे, असे कुंकळ्‍ळीचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांनी सांगितले. या प्रकरणातील तिसरा संशयित अनिकेत नाईक हा अद्याप फरार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com