Shri Damodar Temple Zambaulim : गोव्यातल्या धर्म जीवनात ‘दामोदर’ या दैवताचे पूर्वापार महत्त्वाचे स्थान आहे. पोर्तुगिजांनी सासष्टी महाल जिंकून घेण्यापूर्वी दामोदराचे मंदिर मडगावात होते. विष्णू सहस्रनाम म्हणून दामोदराचा उल्लेख वैष्णव धर्म परंपरेत आढळतो नेपाळातील मुक्तनाथाच्या मंदिरापासून काही अंतरावरती दामोदर कुंड असून, त्यात शाळिग्राम सापडतात. शिवरात्री यात्राप्रसंगी नेपाळातल्या या दामोदर कुंडाची यात्रा करण्याची परंपरा आहे. संपूर्ण भारतभर दामोदर हे नाव उच्चारल्यावर भाविकांच्या नजरेसमोर श्रीविष्णू किंवा श्रीकृष्णाची मूर्ती उभी राहते. परंतु गोव्यात दामोदर हे दैवत शिवशंभोचे रूप म्हणून पूजनीय ठरलेले आहे.
आषाढापासून ते कार्तिक या चार महिन्याच्या कालखंडाला ‘चातुर्मास’ ही संज्ञा असून, कार्तिकातल्या एकादशीला श्रीविष्णू योगनिद्रेतून चार महिन्यांनंतर जागा होत असल्याने हा दिवस देशभर ‘प्रबोधिनी एकादशी’ म्हणून साजरा होतो आणि या महिन्याला ‘दामोदर मास’ असेही म्हटले जाते. बालवयात नानाविध खोड्या करणाऱ्या श्रीकृष्णाला यशोदा मातेने दोऱ्याने बांधला आणि त्यामुळे त्याचा उल्लेख दामोदर असा होत असल्याचे मानले जाते.
गोव्यात एकेकाळी शिवोपासक शैव आणि विष्णू उपासक वैष्णव यांच्यातला संघर्ष पराकोटीचा विकोपाला गेला होता आणि त्यामुळे मठग्रामात शैव आणि वैष्णवांना एकत्र आणण्यासाठी शिवस्वरूपी लिंग आणि श्रीविष्णूचे नाव प्रदान करून दामोदर या दैवताची प्रतिष्ठापना करण्यात आली असावी. सह्याद्रीतल्या श्रद्धा, परंपरा, जाती, दैवते यांच्या उद्गमानविषयी ऊहापोह करणार्या सह्याद्री खंड ग्रंथातून या परिसराची माहिती मिळते. कोकणाख्यान या ग्रंथात गोव्यात संदर्भात माहिती असून, त्यातल्या ‘सासष्टी महिमा’मध्ये दामोदराचा उल्लेख पाहायला मिळतो.
सासष्टदेशी मुख्य सदर। जोहार ग्राम मा थोर ।
तेथे देव दामोदर । महिमा अपार तयाचा।
जोहारग्राम, मठग्राम म्हाडग्राम आदी नावांनी मडगाव परिचित असून, जोहार अरबी भाषेत जवाहीर तर फारशीत अग्निदिव्य त्याचप्रमाणे नमस्कार अशा अर्थाने येत असल्याचे ‘गोमंतकाची सांस्कृतिक घडण’ या ग्रंथाचे लेखक काशिनाथ नायक यांनी नमूद केले आहे.
व्यापार, उद्योगाच्या भरभराटीमुळे सासष्टी महालातले आणि साळ नदीवाटे देशविदेशातल्या जलमार्गाशी जोडले गेल्याने मडगाव नावारूपास आले होते. या शहरातल्या देव दामोदराच्या नावातून असंख्य श्रद्धा, परंपरांचे दर्शन घडते. दामोदर या नावात जो ‘दाम’ शब्द आहे त्याचा अर्थ सोन्याचे नाणे असा होतो. कालांतराने दाम हे तांब्याचे लहानसे नाणे निर्माण झाले. तर मुगल काळात सरकारी वसूल दामात मोजीत आणि त्यामुळे दामोदर हा शब्द निर्माण झाला का? हे निश्चित सांगणे कठीण. पोर्तुगीज दफ्तरात मडगावातल्या होली स्पिरिट चर्च क्या ठिकाणी माकाजी किंवा माकाजन, माड्डा येथे दामोदर, बोर्डा येथे चामुंडेश्वरी आणि फातोर्डा येथे दामोदर लक्ष्मी नारायणाचे मंदिर असल्याचे उल्लेख आढळतात. विष्णू, नारायण आदी देवतांच्या पाषाणी मूर्ती मडगावात आढळल्या होत्या. ‘हिंदू टेम्पल्स अँण्ड डेअटीज’ या ग्रंथात मडगावातले माकाजी दामोदराचे मंदिर देसाईंच्या पुत्राचे असल्याचा उल्लेख आहे. केळशीतल्या गावकरांच्या मुलीशी विवाहबद्ध होऊन मडगावात येणाऱ्या माकाजी दामोदर आणि त्याच्या वधूची भाडेकरू खुन्यांद्वारे हत्या करण्यात आली. नववधू आणि वर यांच्या हत्येच्या एकूण पापक्षालनातून जेथे हत्या झाली त्या जागी दामोदराचे मंदिर बांधण्यात आले असे मानण्यात येते. सोळाव्या शतकात जेव्हा सासष्टी महालावरती पोर्तुगिजांची सत्ता स्थापन झाली, तेव्हा भाविकांनी आपल्या दामोदर देवाचे स्थलांतर कुशावती नदीच्या तीरावरच्या रिवण ग्रामसंस्थेच्या जांबावलीत केले आणि तेव्हापासून मडगावकर मंडळी आपल्या देवाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी जांबावलीत ये-जा करू लागली. जेव्हा दामोदर देवाचे स्थलांतर जांबावलीत करण्यात येत होते तेव्हा ज्या धनिकांच्या घरी काही काळ देव ठेवण्यात आला, ती जागा ‘दामोदर साल’ म्हणून ओळखण्यात येऊ लागली.
1892 साली स्वामी विवेकानंदांचे मडगावात आगमन झाले तेव्हा त्यांनी दामोदर सालाला भेट दिली होती. पोर्तुगीज राजवटीत मडगावातल्या नायकांच्या वास्तूतल्या ज्या जागेत दामोदर देव स्थानापन्न झाला होता, ते दामोदर साल शहरासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक संचित झाले. मडगावपासून 22 कि. मी. अंतरावरच्या जांबावलीचा समावेश नव्या काबिजादीत सुरक्षित स्थळी असला तरी तेथील दामोदराच्या मंदिराला वारंवार भेट देणे दळणवळण आणि वाहतुकीच्या साधनांच्या आजच्यासारख्या पर्यायाअभावी त्याकाळी सहजासहजी शक्य नव्हते. त्यामुळे शहरातल्या भाविकांसाठी दामोदराचे साल हे श्रद्धास्थान ठरले होते. दामोदर दैवताशी निगडित भाविक जेथे जेथे उद्योग धंद्यानिमित्त स्थायिक झाले, तेथे तेथे त्यांनी आपले ऋणानुबंध कायम ठेवले. वास्को म्हणजेच पूर्वाश्रमीच्या मुरगाव शहरात दहा तपांपूर्वी प्लेग महामारीची साथ पसरून लोक मृत्युमुखी पडू लागले, तेव्हा शहरातील निवडक मंडळी जांबावलीत दामोदराच्या मंदिरात प्रार्थनेसाठी गेले आणि देवातर्फे प्रसाद म्हणून देण्यात आलेल्या श्रीफळाच्या सान्निध्यात भजनी सप्ताह साजरा करू लागले. तेव्हापासून जेथे ही परंपरा सुरू झाली ते स्थळसुद्धा भाविकांना मंदिर ठरले. मडगाव आणि वास्को या गोव्यातल्या दोन्ही शहरांतल्या केवळ हिंदू धर्मीयांसाठीच नव्हे तर अन्य पंथांतल्या लोकांना जांबावलीतील दामोदराचे मंदिर भक्तिभावाचे अपूर्व केंद्र ठरले. त्यामुळे वर्षातल्या महत्त्वपूर्ण अशा सण-उत्सवप्रसंगी भाविक जरी पोर्तुगिजांच्या गुलामगिरीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत जांबावलीला भेट देत असले, तरी फाल्गुनातल्या शिगम्याच्या समारोपाला संपन्न होणाऱ्या गुलालोत्सावाला मोठ्या संख्येनं आणि उत्साहाने न चुकता सहभागी होतात.
व्यापार उद्योगासाठी मडगावाला पोर्तुगीज राजवटीत सत्ताधीशांशी जुळवून स्थायिक झालेल्या लोकमानसाने आपल्या भरभराटीला कष्ट, मेहनत जबाबदार असली तरी श्री दामोदराचे कृपाशीर्वाद धारण करून जीवन समृद्ध करण्यात धन्यता मानली. त्यामुळे, शिशिराचा निरोप घेत वृक्षवेलींवरच्या नवपल्लवांचे दर्शन घेणाऱ्या लोकमानसाने ग्रीष्म ऋतूला सामोरे जाण्यापूर्वी गुलालोत्सवात तन, मन, धन अर्पण करून सहभागी होण्याला प्राधान्य दिले. दामोदर हे श्रीविष्णूचे नाव असले तरी गर्भगृहात पवित्र लिंग हे शिवस्वरूप मानले आणि त्यामुळे नृत्य, नाट्य, गायन यांच्या अधिष्ठात्र्या नटराजाला गुलालोत्सवाबरोबर नाना विविध कला, संस्कृतीचा विलोभनीय आविष्कार घडवून प्रसन्न करणे हे मडगाववासीयांनी व्रत स्वीकारलेले आहे. त्यामुळे, शिगम्याच्या उत्साहात रंगगंधांची मनसोक्त उधळण करणारे हात पाय तितक्याच तन्मयतेने मंदिराच्या सभागृहात संपन्न होणार्या कलाविष्कारात भाग घेतात. एके काळी ‘पापनाशिनी’ म्हणून नावारूपास आलेल्या आणि सह्याद्री पर्वतरांगांतल्या बुंदे गावातल्या नासा डोंगरातून उगम पावणाऱ्या कुशावतीला ‘अघनाशिनी’ मानले होते. त्यामुळे गुलाल उधळून झाल्यावरती भाविक या नदीत पवित्र स्नान करतात.
जुन्या काबिजादीतल्या सासष्टी महालातल्या आपल्या देवदेवतांचा, पवित्र श्रद्धास्थानांचा अपरिमित असा जो विद्ध्वंस पोर्तुगिजांनी मांडला होता, त्याविषयीच्या भयाशी सामना देत दामोदर देवाविषयीच्या श्रद्धा, भक्तिभावाचे त्यांनी आत्मीयतेने जतन केले होते आणि त्यामुळेच नानाविध परंपरा, रीतीरिवाज याद्वारे गोव्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक संचितांचे दर्शन या मंदिरात घडते.
-राजेंद्र केरकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.