फोंडा : भटवाडी - शिरोडा येथे रविवारी पतीने गळा दाबून पत्नीची हत्या केल्याने या भागात खळबळ उडाली असून संशयित पतीला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. हे दाम्पत्य मूळ ओरिसा येथील असून सध्या गोव्यात मजुरीचे काम करीत होते. या खूनप्रकरणातील संशयित राजकिशोर नाईक याला चार दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संशयित राजकिशोर नाईक (वय 30) याने आपली पत्नी रिता बडाकिया (वय 24) हिचा गळा आवळल्याने तिचा मृत्यू झाला होता. हा खून करून पळण्याच्या बेतात असताना राजकिशोर याला फोंडा पोलिसांनी अटक केली होती. या दाम्पत्याचे दोन वर्षांचे मूल सध्या पणजीतील अपनाघरात ठेवण्यात आले असून राजकिशोर याच्या नातेवाईकांना यासंबंधीची कल्पना देण्यात आली आहे. राजकिशोरच्या नातेवाईकांकडे हे मूल सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती फोंडा पोलिस उपअधीक्षक सी. एल. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राजकिशोर नाईक हा सहा वर्षांपूर्वी गोव्यात आला होता व हल्लीच सात महिन्यांपूर्वी भटवाडी येथे भाड्याच्या खोलीत पत्नी व मुलासह राहत होता. पत्नीचे कुणाबरोबर तरी अनैतिक संबंध असल्याची शंका असल्याने रोजच या दांपत्यात भांडणे व्हायची, मात्र या भांडणाने काल परिसीमा गाठल्याने चिडलेल्या राजकिशोरने रिताचा गळा आवळला, त्यात ती मरण पावली. आपल्या हातून खून झाल्याचे लक्षात येताच राजकिशोर याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पकडले.
राजकिशोर याच्या नाईक आडनावावरूनही गोंधळ उडाला असल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली असता ओरिसा राज्यात नाईक आडनावाचे लोक असून संशयित आरोपीचे मूळ ओरिसा राज्यातील आधारकार्ड व निवडणूक ओळखपत्र तपासले असता त्यात नाईक हे आडनाव असल्याचे निदर्शनास आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. राजकिशोरला प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.