Canacona Shigmotsav : होळी पेटवून परंपरेचे जतन गोमंतकीय नागरिक करताना दिसत आहेत. याला ना अपवाद सत्तरी आहे, ना काणकोणचा सीमावर्ती भाग. मात्र प्रत्येक ठिकाणच्या शिगमोत्सवात एक वैविध्य आहे, जे गोव्याच्या शिगमोत्सवाचं वेगळेपण अधोरेखित करते. आजकाल शहरी भागात बॉलिवूडच्या गाण्यांवर नाचत रंग खेळत धुळवड साजरी केली जाते, मात्र गोव्याच्या काही भागात आजही परंपरेचं जतन करत पूर्वापार चालत आलेला शिगमोत्सव आजही साजरा केला जातो, जतन केला जात असून त्याचा वारसा नवीन पिढीकडे दिला जात आहे.
दक्षिण गोव्यातील काणकोणमध्ये (Canacona) मल्लिकार्जुनाची तीन मंदिरा आहेत. आवे, श्रीस्थळ आणि गावडोंगरी येथे 'वीरामेळ आणि शीर्षारान्नी' हा शिगम्याचा प्रकार साजरा केला जातो. शिगम्याच्या या परंपरा आजवर सुरू आहेत आणि दरवर्षी दूरवरचे लोक याकाळात गोव्यात येत असतात.
शीर्षारान्नी :
या प्रथेमध्ये 3 भाविकांचा समावेश असतो. त्यांना तीन दिशांमध्ये झोपवून त्यांची डोके एकमेकांच्या डोक्याला लावून त्याची चूल तयार केली जाते. आणि डोक्यांनी तयार केलेल्या या चुलीवर भात शिजवला जातो. ही प्रथा पाहण्यासाठी भाविकांची अफाट गर्दी होते. ज्यावेळी भात शिजतो, त्यावेळी तीनही भाविक सुरक्षितपणे बाहेर येतात.
वीरामेळ :
वीरामेळमध्ये भाविक पारंपरिक शिगम्याच्या वेशात येऊन हातात तलवार घेऊन मिरवणूक काढतात आणि प्रत्येक घरोघरी जातात. या पारंपरिक वेशभूषेतील भाविकांना बघण्यासाठी गावकरी गर्दी करतात.
आदिवासी लोक होळी ‘शिगमो’ म्हणून साजरी करतात, तर जंगलात राहणार्या जमातींमध्ये हाच सण ‘शिकमो’ म्हणून साजरा केला जातो. हे दोन्ही शब्द संस्कृत शब्दापासून तयार झालेले आहेत. ‘सुगिम्हा’ म्हणजेच आनंददायी उन्हाळ्याचा काळ. सुगिम्हा’ या शब्दापासूनच ‘शिगमो’ आणि ‘शिकमो’ हे दोन्ही शब्द बनलेले आहेत.
काणकोणच्या आदिवासी वस्त्यांमधील लोक डोंगराच्या पायथ्याशी असलेली त्यांची घरे सोडून डोंगरमाथ्यावर गेली आहेत. यादरम्यान डोंगरमाथ्यावर वेळ्ळीचे आदिवासी पुरुष लोकनृत्य सादर करतात आणि त्यांच्या पूर्वजांपासून चालत आलेले जंगली शाकाहारी भोजन करतात.
मांड :
गोव्यात ‘मांड’ या प्रथेला खूप मोलाचे महत्व आहे. ‘मांड’ म्हणजे जिथे सोहळ्यादरम्यान धार्मिक विधी, लोकनृत्य किंवा लोकसंगीत साजरे केले जाते ती जागा. वेळ्ळीच्या जंगलांमध्ये राहणारे लोक येथे लोकनृत्य आणि लोकसंगीत सादर करत सणाचा आनंद घेतात.
गोव्यात खूप गावांमध्ये शिगम्याच्या काही दिवस आधीपासूनच उत्सवाला सुरुवात केली जाते. सांगेच्या नेत्रावली अभयारण्याजवळ असलेल्या नुने या गावामध्ये होळीच्या पाच दिवस आधीच धार्मिक कृत्य केले जाते; यामध्ये प्रामुख्याने उजव्या हातात एक जुनी तलवार घेतली जाते आणि तालवाद्य आणि झांजांच्या तालावर धार्मिक विधी केला जातो. तर यामध्येच पाच भाविक रात्री दूरवर नृत्य करत असतात.
नुने हे गोव्यातील असे एकमेव गाव आहे, जिथे हाणपेठ हे नृत्य केले जाते. असे म्हटले जाते की, भूतकाळात यावेळी भाविकांनी हातात तलवारी घेऊन धार्मिक नृत्य सादर करत प्रतीकात्मकरीत्या पृथ्वी मातेला अभिवादन करण्यासाठी आणि आपले रक्त अर्पण करण्यासाठी तलवारीने स्वत:ला जखमा केल्या होत्या. हे नृत्य करणारे भाविक हे बेधुंद होऊन लोककला सादर करत असतात.
तालगडी या नृत्य प्रकारांमध्ये पुरुष नर्तक हे ड्रमच्या सहाय्याने आणि लोकसंगीताच्या तालावर नृत्य करत असतात. लोककलेसाठी यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो.
मुळातच गोव्यात शिगमोत्सव हा अनेक कलाप्रकार आणि विविध परंपरेने साजरा केला जातो. त्यात काणकोणमधील गावांमध्येही वैविध्य आणि कलासंस्कृतीची श्रीमंती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गावातील उत्सव, लोकसंस्कृती, लोकसंगीत आणि नृत्य यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो.
गोव्यातील शिगमा हा प्रत्येक गावातील लोकनृत्य, संगीत आणि लोककला दाखवण्यासाठी गावकऱ्यांना उस्फूर्तपणे वाव देतो. गावकऱ्यांच्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी त्यांना एक मंच प्रदान करतो. सणानिमित्त लोकांना मौजमजा आणि गमतीजमतीच्या माध्यमातून आपली संस्कृती सादर करण्याचा आणि भूतकाळापासून जपलेल्या विधी आणि परंपरांचे दर्शन करण्याची संधी मिळते.
गोव्यातील सर्व भागांमध्ये दरवर्षी शिगम्यासाठी जंगलातील एक झाड राखीव ठेवले जाते. त्याला शिगम्याचे झाडही म्हणतात. त्या लांबलचक झाडाला गावातील ज्याठिकाणी धार्मिक, लोकनृत्य सादर करतात अशा ठिकाणी ठेवले जाते. शक्यतो गावातील ग्रामदैवताच्या मंदिरासमोर ते खोड आणून त्याला आंब्याची पाने बांधली जातात, आणि त्याठिकाणी त्या खोडाला उभे केले जाते. जिथे हे खोड असते त्याठिकाणी शिगम्याचे धार्मिक विधी, आणि लोककला साजरी करण्यात येते. शक्यतो हे विधी रात्रीच्या वेळी केले जातात आणि या विधींचा मागे धार्मिक पवित्र आत्म्यांचे आभार मानणे हा हेतूदेखील असतो.
शिगम्यादरम्यान गोव्यातील हिंदू समुदाय आपल्या धरणीमातेचे आभार मानतात त्याचप्रमाणे पवित्र आत्म्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.