Sanguem News : नेत्रावळीतील धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना बंदी

Sanguem News : वन खात्याचा आदेश : पर्यटक, स्थानिक व्यावसायिकांमध्ये नाराजी
Sanguem
Sanguem Dainik Gomantak

Sanguem News :

सांगे, मतदारसंघातील नेत्रावळी गाव हा खाण बंदीनंतर पूर्णतः पर्यटनावर अवलंबून आहे. नेत्रावळीत असलेले अनेक धबधबे स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देत; पण पाऊस सुरू होताच वन खात्याने पर्यटकांना धबधबे पाहण्यापासून वंचित करण्याचा आदेश काढल्यामुळे पर्यटक, तसेच पर्यटनावर रोजीरोटी चालविणाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी नेत्रावळीतील मैनापी धबधब्यावर एकाच वेळी दोन पर्यटक बुडण्याची घटना घडल्यानंतर वन खात्याने पर्यटकांना प्रवेश बंदी केली होती. ती बंदी बऱ्याच काळानंतर उठविण्यात आली होती. शिवाय पर्यटकांना धबधब्यात उतरण्यास अटकाव केला जात होता. केवळ अभयारण्य क्षेत्रात जाऊन धबधब्यांचा मनमुराद आनंद लुटता येत होता. नेत्रावळीतील सर्व धबधबे बारमाही असल्यामुळे पर्यटकांची वर्दळ सुरू राहिल्यास रोजगार निर्मिती होत असे; पण आता बंदीचे संकट निर्माण केल्यामुळे परत एकदा नेत्रावळी गाव पर्यटकांविना सामसूम होणार आहे.

बंदीचा आदेश मुख्य वनसंरक्षक यांनी काढला असून परिस्थितीचा आढावा घेण्याची सूचनाही या आदेशात करण्यात आली आहे. त्यात ही बंदी किती कालावधीसाठी असेल याचा उल्लेख नसल्याने पर्यटक आणि नेत्रावळीतील दुकानदार हिरमुसले आहेत. कडक सुरक्षा व्यवस्था उभारून पर्यटकांना पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यास सवलत दिली गेल्यास लहान सहान दुकानदारांना त्याचा फायदा झाला असता, अशा प्रतिक्रिया येथील व्यावसायिकांनी व्यक्त केल्या.

समाजकल्याणमंत्र्यांनी लक्ष घालावे!

१ पावसाळा नसतानाही गोव्यातील अनेक ठिकाणी पर्यटक बुडून मृत्यू होण्याची घटना होत असते. शिवाय समुद्रात आंघोळीसाठी जाणारे पर्यटक बुडून मरतात म्हणून शासनाने समुद्रावर आंघोळीसाठी जाणाऱ्यांवर कधी बंदी घातलेली नाही. असे असताना धबधबे पाहण्यास बंदी घालणे चुकीचे आहे.

२ एकीकडे नेत्रावळीत पर्यटन व्यवसायास चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू असताना धबधब्यांवर बंदी म्हणजे व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्यासारखा हा प्रकार असल्यामुळे सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी या प्रकरणात लक्ष घालून बंदी हटविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी नेत्रावळीतील व्यावसायिक करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com