Mopa Airport : गोव्याच्या पर्यटन उद्योगात मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे महत्त्व काय?

मोपा विमानतळामुळे गोव्याच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बळकटी प्राप्त होईल. त्याचबरोबर येथील पर्यटन उद्योगाला अभूतपूर्व चालना मिळेल.
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak

Mopa Airport : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून रविवारी, 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते विमानतळाचे रीतसर उद्घाटन करण्यात येणार आहे. जागतिक दर्जाचे हे प्रतिष्ठित आणि अद्ययावत विमानतळ गोव्यात सुरू होत असल्यामुळे, हा प्रकल्प राज्याला वरदान ठरणार हे निश्चित. मोपा विमानतळामुळे गोव्याच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बळकटी प्राप्त होईल. त्याचबरोबर येथील पर्यटन उद्योगाला अभूतपूर्व चालना मिळेल.

कोरोना महामारीमुळे दोन वर्षे पर्यटन उद्योगाला जबर फटका बसल्याने, या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. तसेच बऱ्याच जणांचा रोजगार धोक्यात येऊन कित्येकांना कामाला मुकावे लागले. राज्यातील पर्यटन उद्योगाची फरफट झाली. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व शॅक्स तसेच टुरिस्ट टॅक्सीचालकांना आणि पर्यटनाशी संबंधित लोकांना सलग दोन वर्षे अग्निदिव्यातून जावे लागले. यंदाचा पर्यटन हंगाम बहरत असताना तसेच कोरोना संकट निवळल्याने, नवीन मोपा विमानतळ सुरू होत असताना पर्यटन व्यावसायिकांमध्ये उत्सुकता व सकारात्मक वातावरण निर्माण झालेले आढळते. पर्यटक नवीन जोमाने गोव्याकडे आकर्षित होतील असा ठाम विश्वास पर्यटन उद्योगातील जाणकार व्यक्त करतात. त्यामुळे, येथील पर्यटन उद्योगाची दोन वर्षांची चणचण संपुष्टात येईल. आज पर्यटन उद्योग गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक बनला आहे. राज्याच्या जीडीपीमध्ये पर्यटन उद्योगाचा 12 टक्के हिस्सा असून हजारो रोजगार या क्षेत्राशी जोडलेले आहेत. पर्यटन उद्योगात खासगी क्षेत्रातील उद्योजकांमार्फत प्रचंड गुंतवणूक झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यटन सुविधा व तारांकित हॉटेल्स निर्माण झाली आहेत. म्हणून पर्यटन उद्योगाने स्थिर असणे आणि वाढत्या आलेखासहित पुढची वाटचाल करणे, हे राज्याच्या आणि येथील जनतेच्या हिताचे आहे.

गोव्यातील पर्यटन उद्योग सुमारे चार दशकांच्या खडतर व दीर्घ प्रवासानंतर स्थिरावलेला दिसत आहे. 1970 च्या दशकात हिप्पी संस्कृतीने प्रभावित झालेले विदेशी पर्यटक पहिल्यांदाच गोव्यात दाखल झाले. ते समुद्रकिनाऱ्यावर व स्थानिक लोकांसोबत झोपड्यांमध्ये राहायचे. 1980 च्या दरम्यान राज्यात पर्यटन व्यवसाय मूळ धरू लागला. गोवा सरकारने पहिल्यांदाच शासनप्रणालीत स्वतंत्र पर्यटन खाते निर्माण केले. 1982 साली गोवा राज्य पर्यटन विकास महामंडळ स्थापन केले. या मार्फत पणजी, म्हापसा, मडगाव, वास्को, कळंगुट व अन्य ठिकाणी हॉटेल्स बांधून सुरू करण्यात आली. याच दरम्यान, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रमंडळ देशांच्या परिषदेवेळी होणाऱ्या चोगम रिट्रीटसाठी गोव्याची निवड केली. नोव्हेंबर 1983 मध्ये चोगम रिट्रीट कळंगुट येथील पंच तारांकित ताज फोर्ट आग्वादा रिसॉर्ट येथे संपन्न झाली. चोगम रिट्रीटचे वार्तांकन करण्यासाठी जगभरातील टीव्ही चॅनल्स व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी गोव्यात दाखल झाले. एकदम गोवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन केंद्र म्हणून प्रकाशझोतात आले.

गोव्याचे स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारे विदेशी पर्यटकांना भुरळ घालू लागले. नंतर 1998 साली सुरू झालेल्या कोकण रेल्वेमुळे देशी पर्यटकांना गोव्यात येण्यासाठी सुलभ वाहतूक व्यवस्था मिळाली. यामुळे देशी पर्यटकांची संख्या खूप वाढली आणि पर्यटन व्यवसाय बघताबघता गोव्यातील एक प्रमुख उद्योग म्हणून विकसित होऊ लागला. साल 2000 नंतर राज्यातील पर्यटन उद्योग प्रचंड वेगाने भरारी घेऊ लागला. यासाठी पूरक आणि मजबूत पायाभूत सुविधा आवश्यक असल्याने, त्यावेळच्या सरकारने याला प्राधान्य दिले.

रुंद रस्ते, नवीन पूल उभारणी, नवीन हॉटेल्स बांधकाम, विस्तारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, टॅक्सी खरेदी योजना, समुद्र किनाऱ्यावर पर्यटक सुविधा, आयनॉक्स निर्मिती आणि अशा विविध व्यवस्था निर्माण करण्यात आल्या. तसेच या दरम्यान सुरू झालेल्या चार्टर विमानसेवेमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन उद्योग झपाट्याने वाढत गेला. मात्र, राज्याला स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळाची उणीव भासू लागली. नौदलाच्या ताब्यात असलेल्या दाबोळी विमानतळाच्या मर्यादित विमान उड्डाण व्यवस्थेमुळे राज्य सरकारच्या पुढे मोठे आवाहन होते. वाढत्या पर्यटन उद्योगाला दाबोळी विमानतळ अपुरा पडू लागला. 2013-14 या वर्षी राज्यात एकूण 1,128 चार्टर विमान उड्डाणे सुमारे 2.62 लाख विदेशी पर्यटक घेऊन गोव्यात दाखल झाली. परंतु, गेल्या पाच सहा पर्यटन हंगामात गोव्यातील विदेशी पर्यटकांची संख्या रोडावल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

2018-19 साली 813 चार्टर विमाने 2.19 लाख विदेशी पर्यटकांसहित राज्यात दाखल झाली. म्हणजेच चार्टर उड्डाणे तसेच विदेशी पर्यटक कमी झाले. याचे एक प्रमुख कारण म्हणजे गोव्यातील विमानतळाचे अनियमित उड्डाण वेळापत्रक. दुसरे म्हणजे दाबोळी विमानतळावरून नाममात्र विमान सेवा कंपन्या मोजक्याच प्रमुख शहरांना थेट विमानसेवा पुरवतात. देशी पर्यटकांना गोव्यात येण्यासाठी मर्यादित स्वरूपात विमानसेवा उपलब्ध असते. गोव्यातील पर्यटन उद्योग विकास व व्यवसाय वृद्धीसाठी चोवीस तास कार्यरत आंतरराष्ट्रीय विमानतळाची सक्त गरज होती. म्हणूनच मोपा विमानतळ प्रकल्प पर्यटन वाढीसाठी राज्याला मोठे वरदान ठरणार आहे.

Mopa Airport
St. Francis Xavier : गोव्याचे ख्रिस्तीकरण आणि संत फ्रान्सिस झेवियर

आज देशांतर्गत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तमिळनाडू , दिल्ली, राजस्थान ही राज्ये पर्यटन उद्योगात अग्रेसर असून सगळ्यात जास्त देशी व विदेशी पर्यटक या राज्यांमध्ये दाखल होतात. २०१९ साली पर्यटन हंगामात गोव्यात तीन लाख विदेशी पर्यटक आले. या बाबतीत अन्य राज्यांच्या तुलनेत गोवा दहाव्या क्रमांकावर राहतो. भारतात येणारे फक्त 5 ते 6 टक्के विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होतात. तसेच देशी पर्यटकांच्या बाबतीत अन्य राज्यांच्या तुलनेत गोवा सतराव्या नंबरवर पोहोचला असून, 2019 साली एकूण तीस लाख पर्यटक आकर्षित करू शकला. पर्यटनदृष्ट्या अग्रेसर राज्यांत उत्तम विमान व रेल्वे सेवा, तसेच अद्ययावत हायवे व बंदर व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 59 विमान सेवा कंपन्यांमार्फत 97 प्रमुख शहरांना थेट विमान उड्डाणे उपलब्ध आहेत. या विमानतळाने 2021-22 या वर्षात 393 लाख विमान प्रवासी हाताळले. तसेच चांगल्या व सुसज्ज विमानतळामुळे हैदराबाद शहर झपाट्याने विकसित होत आहे. येथील विमानतळावरून 20 विमान-सेवा कंपन्यांमार्फत 32 ठिकाणी थेट विमान सेवा सुरू असून प्रवासी वाहतूक सुमारे 124 लाखांपर्यंत पोहोचली आहे. सुदैवाने हे दोन्ही विमानतळ जीएमआर कंपनीमार्फत कार्यरत असून गोव्यातसुद्धा जीएमआर कंपनी नवीन मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ अशाच पद्धतीने विकसित करणार याबद्दल पूर्ण खात्री वाटते.

वरील नमूद केलेल्या काळात दाबोळी विमानतळ जेमतेम 52 लाख विमान प्रवासी हाताळू शकला, कारण येथून फक्त 12 प्रमुख शहरे थेट जोडलेली असून जेमतेम 9 विमान सेवा कंपन्या येथून कार्यरत आहेत.मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर राज्याचा पर्यटन उद्योग भरारी घेणार हे निश्चित.

जीएमआर इन्फ्रास्ट्रकचर कंपनीने गेली वीस वर्षे विमानतळ सेवा क्षेत्रात एक अग्रगण्य आस्थापन म्हणून नावलौकिक मिळविला असून त्यांच्यामार्फत मोपा विमानतळ उत्तमरीत्या विकसित केला जाईल. या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे दिल्ली व हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, आज विमान प्रवाशांच्या पहिल्या पसंतीची प्रवास केंद्र बनली आहेत. येणाऱ्या काळात मोपा विमानतळाचा विस्तार होत जाणार आणि पुढच्या दहा वर्षांत हा विमानतळ प्रतिवर्षी 131 लाख प्रवासी हाताळू शकणार. त्यामुळे गोव्यातील पर्यटन उद्योग प्रचंड वाढेल. मात्र, राज्य सरकारने पर्यटन उद्योग बहुआयामी आणि संपूर्ण राज्य व्यापक करण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. तसे झाल्यास गोवा देशातील ‘पर्यटन हब’ म्हणून पर्यटकांचे पहिल्या पसंतीचे पर्यटन स्थळ बनू शकते. या सगळ्यात मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ राज्यातील पर्यटन उद्योगाला नवीन चेतना व ऊर्जा निर्माण करेल अशी अपेक्षा करूया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com